Home > मॅक्स रिपोर्ट > चहाच्या कपात वादळ

चहाच्या कपात वादळ

चहाच्या कपात वादळ
X

मुंबईच्या महापौरपदावर भाजपनं दावा करताच शिवसेनेनं पुन्हा एकदा सरकार पाडण्याची तयारी सुरू केली. मात्र भाजपनं महापौरपद सोडल्यानंतर शिवसेनेनं पुन्हा नेहमी प्रमाणे आपल्या तलवारी म्यान केल्या. त्यावर कडी म्हणजे रामदास कदम यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे शिवसेनेच्या भूमिकेची केलेली थट्टाच म्हणावी लागेल. त्यामुळे सरकार पाडण्याचा शिवसेनेचा आव आणि डाव आता भाजपनं दिलेल्या चहाच्या कपातलं वादळ ठरलंय.

युतीची व्हॅलें’टी’न पार्टी

नाही म्हणायला तसा व्हॅलेंटाईन डे फेब्रुवारी महिन्यात असतो. पण महाराष्ट्रानं तो ५ मार्चच्या रविवारी अनुभवला. नवऱ्याचं लफडं माहीत पडल्यावर सोडून गेलेली बायको नवऱ्याच्या माफीनंतर जशी परत येते तसं राजधानी मुंबईत घडलं. महापालिका निवडणुकांमध्ये दोघांचं होतं नव्हतं ते सगळा काढल्यानंतर शिवसेना-भाजपचं रविवारी असं काही मनोमिलन झालं की सर्वच जण अचंबित झाले. निमित्त होतं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या टी पार्टीचं (चहापानाचं). वरचा फोटो पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल. आपल्यात कधी काही वादच नव्हता. वाद जनतेतच होता आणि अर्थातच जनता मुर्ख आहे अशा आविर्भावात शिवसेना-भाजपचे नेते कॅमेरासाठी पोज देत होते.

त्यावेळी मुखमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यातल्या युती सरकारला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याच त्यांनी सांगितलं. इतकच कशाला सध्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे खिशातून बाहेर काढून बाजूला ठेवल्याचं शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी म्हंटलं. पण, असं असलं तरी शिवसेना पक्षप्रमुखांनी आदेश दिला, तर राजीनामे जिथे पाठवायचे तिथे पाठवू असं सांगून त्यांनी सेनेची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही पक्षांमधली दरी कमी झाली असल्याचंही त्यांनी जाहीर करून टाकलं. जनतेनं विरोधकांच्या विरोधात मतदान करुन शिवसेना आणि भाजप युतीलाच कौल दिल्याचा अजब तर्क मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडला. तसंच जनमत विरोधात गेलेले विरोधक नैराश्याच्या गर्तेत गेल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला.

Updated : 5 March 2017 5:02 PM GMT
Next Story
Share it
Top