Home > मॅक्स रिपोर्ट > चळवळ की भाकर ?

चळवळ की भाकर ?

चळवळ की  भाकर ?
X

कबीर कला मंचातल्या, सिद्धार्थ-अनुराधाची फरफट सुरूच..!

नक्षलवादाच्या आरोपावरून 2011 साली कबीर कला मंचातल्या काही तरुणांना अटक झाली होती, तर काहीजण फरार झाले होते. अटक झालेल्यांमध्ये दोन वेगळी नावं होती ज्या नावांची फारशी चर्चा कधी झाली नाही. परंतू त्यांनी भोगलं मात्र खूप. आणि आजही ती दोघ रस्त्यावरच आहेत. ती नावं आहेत सिद्धार्थ भोसले आणि अनुराधा सोनुले. जामिनावर सुटल्यानंतर आता या दोघांचा संसार सुरुय. पण क्रांतीची ती आग मात्र अजूनही विझलेली नाही. दुर्लक्षितांच्या वेदनांनसाठी क्रांती बीज पेरणाऱ्या पण जगण्यासाठी दुर्दैवाचे दशावतार भोगणाऱ्या या जोडगोळीची ही चित्तरकथा. पत्रकार दत्ता कानवटे यांचा रिपोर्ट.

साल 2011... ठिकाण चांदवड-श्रीरामपूर रस्ता... चांदवडहून श्रीरामपूर कडे येणाऱ्या एका वऱ्हाडाच्या टेम्पोला पोलिसांच्या पाच ते सहा गाड्या घेरतात. काय झालं या भीतीने चिल्लेपिले गपगार होतात. तर मोठ्या माणसांची धांदल उडते. बायबापड्या घाबरून मेल्यागत होतात. तोच ATS चे अधिकारी हातात रिव्हॉल्वर घेऊन खाली उतरतात आणि टेम्पोत बसलेल्या सिद्धार्थ भोसले उर्फ रवी याच्या कपाळावर बंदूक ताणली जाते... कुणाला काही कळण्याच्या आत सिद्धार्थला टेम्पोतून खाली खेचलं जातं, जमिनीवर आडवं करून दोन्ही हातात बेड्या ठोकल्या जातात. नि पुन्हा बंदुका ताणून एका गाडीत कोंबल जातं. पोलिसांच्या गाड्या धुरळा उडवत निघून जातात. एव्हाना इकडे रस्त्यावर जमलेल्या गर्दीत कुजबुज सुरु होते. कुणीतरी आंतराष्ट्रीय आतंकवादी असावा नाहीतर एका माणसासाठी एवढे पोलीस थोडेच येतात? पण त्या गर्दीतल्या कुणालाही माहिती नसतं की सिद्धार्थ हा दशतवादी नसून गाणी गाणारा आणि कविता लिहणारा फक्त एक शाहीर आहे. ज्याने कधीही हातात शस्त्र घेतलेलं नाही आणि इथं तो आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी आला आहे. तिथून पुढे महाराष्ट्रभर चर्चा सुरु होते की शहरी भागातून नक्षलवाद्यांच्या हस्तकांना अटक आणि बरंच काही... पुढे सिद्धार्थ भोसले नावाचा हा 23 वर्षीय तरुण शाहीर ऑर्थर रोड कारागृतल्या अंडा सेलमध्ये तब्बल दोन वर्षे काढतो.

कोण होता हा सिद्धार्थ भोसले?

श्रीरामपूर तालुक्यतल्या दारू कारखान्यात काम करणाऱ्या आणि अठराविश्व दारिद्र्य भोगणाऱ्या भगवान भिवाजी भोसले नावाच्या दलिताचा मुलगा. ज्याने आयुष्यभर अस्पृश्यतेच्या झळा सोसल्या. सिद्धार्थ सांगतो त्याच्या लहानपणीच्या आठवणी. कारखान्यावर भिंतीच्या आत तत्सम ब्राम्हण उच्चवर्णीय अधिकाऱ्यांची काँक्रीटची घरं तर भिंतीबाहेर दलितांची पत्र्याची घरं... त्यातल्याच एका पत्र्याच्या घरात सिद्धार्थच्या वडिलांचा संसार... लहानपणी त्या भिंतीच्या आत असलेल्या सवर्णांच्या घराकडे जायला या दलितांना परवानगी नव्हती. आत नळाला चोवीस तास पाणी पण, तेही प्यायची परवानगी नाही... कधी कधी सिद्धार्थ जायचाच त्या नळाला, तर सिद्धार्थला मार मिळायचा...तर तिकडे? नळाचं शुद्धीकरण व्हायचं...! पुढे पुढे सिद्धार्थ आपल्या अजोबांबरोबर लाकडं तोडायला जायचा, तेंव्हा जंगलात तहान लागली तर ते पाणी प्यायला कुणाच्यातरी शेतावर जायचे. पण, तेंव्हा त्यांना विहिरीत उतरू दिलं जायचं नाही. तर ते शेतकरी विहीर बाटु नये म्हणून स्वतःच पाणी काढून याना ओंजळीत उंचावरनं पाणी टाकायचे. बालवयात सिद्धार्थला ते पाणी पिता यायचं नाही परिणामी तहान विझायचीच नाही. आणि हीच न विझलेली तहान एका सुप्त ओढीनं सिद्धार्थला थेट पुण्यापर्यंत आणि कबीर कला मंचापर्यंत घेऊन आली....

पुण्यातल्या एरवड्यातील आंबेडकर कॉलेजला असताना सिद्धार्थ हा अमरनाथ चांदेलिया आणि सागर गोरखे या कबीर कला मंचातील शाहिरांच्या संपर्कात आला. तिथून पुढे तो सोलापूरला विद्रोही साहित्य संमेलनाला गेला आणि नंतर कबीर कला मंचाचा पूर्णवेळ कार्यकर्ता झाला. मंचात गाणे म्हणणं, कविता लिहिणं, तरुणांना संघटित करणं, त्यांच्यात जागृती करणे याबरोबर तो साम्राज्यवाद अन्याय अत्याचार वर्णभेद जातीयता यावर बोलू लागला. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण त्यांनी मेधा पाटकरांबरोबर लवासा विरोधी आंदोलनात उडी घेतली आणि इथेच माशी शिंकली. मुळशी तालुक्यतल्या गरीब आदिवासींना गाण्याच्या आणि शाहिरीच्या माध्यमातून एकत्र करायला सुरुवात केली. गाण्यांचा परिणाम खोलवर झाला. लवासा विरोधी आंदोलनाचा भडका उडाला आणि पुढे पुण्यातल्या नक्षल समर्थकांची यादी जाहीर झाली. ज्यात बाबा आढावा, मेधा पाटकर यांचीही नावं होती. मग सिद्धार्थ सारख्यांची काय सोय. पुढे सिद्धार्थला चांदवड इथे एका आंतराष्ट्रीय गुन्हेगारासारखी अटक झाली आणि पुढे सिद्धार्थ तब्बल 2 वर्षे तुरुंगात होता...

निव्वळ संशयावरून कुणाला तरी ताब्यात घ्यायचं, अटक करायची आणि वर्षानुवर्षे त्यांची पिळवणूक करायची हे काही बरोबर नाही. याबाबत सरकारनं नेमकी भूमिका घेऊन प्रकरणाचा निकाल लावला पाहिजे. सातत्याने होणारा छळवाद थांबवला पाहिजे. तसंच समाजानेही या कलाकारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मदत करायला पाहिजे. - बाबा आढावा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

साल 2004 - 05 असावं विधार्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका... शेतकरी आत्महत्यांचा आगडोंब उसळलेला. या विरोधात कुणी काहीच बोलायला तयार नाही. सरकारी यंत्रणा ढिम्म बसलेली. पण, अशा परिस्थितीत कुणी तरी अस्वस्थ होतं असतंच. अशाच स्थितीत होते मनोज सोनुले आणि अनुराधा सोनुले ही दोन भावंडं...त्यानी अनेक दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्ती युवा मंचची स्थापना केली. चंद्रपूर जिल्ह्यात गाव चलो अभियानाची सुरुवात केली. ज्यात शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला. गावोगाव फिरून जनजागरण सुरू झालं. यात फॅक्ट फाइंडींग ही नवी संकल्पना आणून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला आणि तो अहवाल शासनाला सुपूर्द केला. गाव चलो अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

शिक्षणाच्या बाजारीकरणाला विरोध करून हजारो विद्यार्थी युवकांना संघटीत केले. त्यामुळे प्रशासन यंत्रणा आतून हादरली तर राजकारण्यांनीही धसका घेतला. त्यांनतर मनोज आणि मंच्याच्या इतर कार्यकर्त्यांवर नक्षलवाद समर्थक असल्याचा ठपका ठेऊन अटक करण्यात आली. विषण्ण झालेल्या अनुराधाने चंद्रपूर सोडलं आणि पुणे गाठलं. पण दुर्दैवाने इथेही तिची पाठ सुटली नाही. इथे आल्यावर तिने कबीर कला मंच जॉईन केलं आणि शाहिरी सुरु झाली. पण इथेही जेव्हा कबीर कला मंचाकर कारवाई झाली तेव्हा तिला अटक करण्यात आली. सिद्धार्थच्या एक दिवस आधी अनुराधाला अटक झाली. गडचिरोली पोलिसांनी अनुराधा गांधींवरील खोट्या केसेस या अनुराधा सोनुलेवर टाकल्या. या केसेस मधून तिची निर्दोष सुटका झलेली आहे. पण अनुराधाने तब्बल 3 वर्षे 2 महिने भायखळा तुरुंगात काढली.

आता सिद्धार्थ आणि अनुराधा दोघंही जामिनावर सुटलेत. जेलमध्ये असताना अनुराधा आणि सिद्धार्थ तारखेच्या न्यायालयात भेटायचे, तिथेच त्यांच्या प्रेमाने आकार घेतला. सुटल्यानंतर या दोघांनी लग्न केलं. सध्या ते कोंढव्याच्या एका सामान्य वस्तीत पत्र्याच्या खोलीत राहतात. त्यांच्या प्रेमवेलीवर एक सुंदरस फुल उगवलंय ज्याचं नावही त्यांनी कबीर ठेवलंय. पण, जगण्याची मारामार मात्र सुरु आहे. सिद्धार्थ सध्या पेंटींग आणि कारपेंटींगची काम करतोय.

सिद्धार्थला LLB करायचं होतं तर अनुराधाला जर्नालिजम. पण, पैशांअभावी दोघांनाही दोघांच्या इच्छांचा बळी द्यावा लागलाय. अनुराधा सांगते “आता जरा बर चाललंय. पण, लग्न केलं ते वर्ष मात्र खूप वाईट गेलं, आंतरजातीय विवाह असल्याने घरच्यांनी मान्य केलं नाही... सिद्धार्थकडे काहीच पैसे नव्हते पण मी जेलमध्ये काम करून पाच हजार जमवलेले. त्या पाच हजाराची पुस्तक विकत घेऊन रस्त्यावर विकायला सुरुवात केली. दिवसाला दोनशे तीनशे रुपये मिळायचे त्यात काही भागायचं नाही. उपासमार व्हायची. शेवटी सिद्धार्थने पेंटिंग सुरु केली आता महिन्याला आठ दहा हजार मिळतात. भागतं कसंबसं त्यात” पण चळवळीसाठी मात्र आता सिद्धार्थला आता वेळ मिळत नाही. मनातून सिद्धार्थ कोलमडून जातो पुन्हा उभा राहतो. सध्या त्याच्या समोर एकाच प्रश्नाचा कोलाहल सुरु असतो तो म्हणजे. भाकर की चळवळ. माहीत नाही या दोघात कोण जिंकेल ते...पण, त्यांनी भोगलेल्या दिवसांच्या आठवणी अंगावर शहारा निर्माण करून जातात.

  • दत्ता कानवटे, पत्रकार

Updated : 2 March 2017 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top