Home > मॅक्स रिपोर्ट > घाटकोपर इमारत दुर्घटना, ढिगाऱ्याखाली शिवसेना

घाटकोपर इमारत दुर्घटना, ढिगाऱ्याखाली शिवसेना

घाटकोपर इमारत दुर्घटना, ढिगाऱ्याखाली शिवसेना
X

घाटकोपर येथील इमारत कोसळल्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. स्थगन प्रस्ताव मांडून बाकीचे कामकाज बाजूला सारून या विषयावर चर्चा करण्याची मागणी विरोधीपक्षांनी केली. ही मागणी फेटाळल्याने विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. विधानपरिषदेतही सभागृह एकदा तहकूब झाले. मात्र, या विषयावर अल्पकालीन चर्चा घेण्याचे मान्य केल्याने कामकाज पून्हा सुरू झाले. सभागृहातल्या सर्वच सदस्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत मांडल्या मात्र, या सर्व सदस्यांचा रोख मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि सत्ताधारी नगरसेवकांचा मनमानी कारभार याकडेच होता. त्यामुळे विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपानेही या प्रश्नावरून शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही.

घाटकोपरची साईदर्शन इमारत कोसळून १७ निष्पाप रहिवाशांचा झालेला मृत्यू हा अपघात नसून मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट व्यवस्थेने घात लावून केलेली हत्या आहे, त्याबद्दल संबंधीत पालिका अधिकाऱ्यांवर कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मुंबई महापालिकेतील बिल्डर, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचार साखळीवर श्वेतपत्रिका काढण्यात यावी, तसेच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख व जखमींनी ३ लाख रुपये देण्याची मागणीही मुंडे यांनी सभागृहात केली. तसेच त्यांनी भाजपला पहारेकरी आहात हे आता सिद्ध करा असे आव्हानही केले. या प्रकरणातील संशयित सुनिल सितप याला अटक करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांनी पालिकेच्या भ्रष्टाचाराचा पाढाच या निमित्ताने वाचला. पालिका सर्वसामान्यांना त्रास देवून बिल्डर आणि कंत्राटदारांना कशी मदत करते याचे अनेकांनी दाखले दिले.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा असून लायसन्स आणि बिल्डींग विभाग हे भ्रष्टाचाराचे बालेकिल्ले असल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी शिवसेनाच याला जबाबदार असून त्यांच्यामुळेच ही प्रवृत्ती बोकाळल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. तर या दुर्घटनेची चौकशी पालिका आणि सरकारी स्तरावर होत असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभु यांनी सांगितले. पक्षाच्या स्तरावर कोणतीही चौकशी करण्यात येणार नसून त्यासाठी पालिका सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले. एकुणच या दुर्घटनेनंतर शिवसेनेला घेरण्याचे काम भाजपा आणि विरोधीपक्षांनी केल्याचे सभागृहात दिसत होते.

Updated : 26 July 2017 11:49 AM GMT
Next Story
Share it
Top