Home > मॅक्स ब्लॉग्ज > गडचिरोलीतील चालती-बोलती झाडं...

गडचिरोलीतील चालती-बोलती झाडं...

गडचिरोलीतील चालती-बोलती झाडं...
X

झाडांना पाय नसतात, झाडांना हात नसतात, झाडांना मेंदू नसतो, झाडे विचार करत नाहीत, झाडे बोलत नाहीत, झाडांना वस्त्रांची गरज नसते, झाडे आजारी पडली की दवाखान्यात जात नाहीत, झाडांची मुले शाळेत जात नाहीत, अ,ब,क,ड शिकत नाहीत, झाडांच स्वत:च घर नसत, झाडे स्वत:वर येणारा प्रत्येक वार निमुटपणे सहन करतात. झाडे दुष्काळाविरोधात आंदोलन करत नाहीत, पाउस पडला नाही अशी तक्रार करत नाहीत. झाडांना कोणत्या रस्त्यांची गरज नसते. अशा समान वैशिष्ट्य असणाऱ्या अनेक झाडांच मिळून जंगल बनतं अशा या समान वैशिष्ट्य असणाऱ्या जंगलाचा माणसाच्या जीवनावर सुधा परीणाम होतो.

पुल्लीगुडम! हे एक असंच गडचिरोली जिल्ह्यातील झाडांच्या कुशीत वसलेले एक गाव. ‘मावा नाटे मावा सरकार’ म्हणत या गावाला सुद्धा पेसा कायद्याद्वारे सरकारचा दर्जा मिळाला. पण सरकार असणाऱ्या या गावात अजून ही भारत सरकारची बससेवा पोहोचली नाही. गावात जाण्यासाठी झाडांच्या मधून एक गाडीवाट आहे. जी नाल्यांमुळे मध्ये मध्ये अडली जाते. येथुन कशी बशी टु व्हीलर जाउ शकते. गावात जाताना मध्ये नाल्यावर अर्धवट असलेल्या पुलाच बांधकाम दिसून येते. हा रस्ता पावसाळयत बंद असतो.

रात्री अपरात्री एखादा माणूस आजारी पडला तर त्याला बैलगाडीतून जवळच्या रस्त्यावर न्यावं लागतं. अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करण्यासाठी फोन सेल्फी काढायला चेहऱ्यासमोर धरल्याप्रमाणे धरावा लागतो. तेथुन मग तालुका ग्रामीण रुग्णालयात पोहोचवावं लागतं. इथं अत्याधुनीक उपचार मिळतील अथवा नाही हा देखील मोठा प्रश्नच आहे. हे सांगताना स्थानिक महिला सांगत होती.

बैलबंडीतन माणसाला दवाखान्यात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्यात तो जगला तर जगला न्हायतर देवावर बोल

गावात बहुतांशी स्त्रियांची बाळंतपण ही गावातच होतात. दवाखान्यात न्यायच असेल तर बैलगाडीत तनीस (एक प्रकारचे मउ गवत) अंथरले जाते. व त्यातून तिला दवाखान्यात पोहोचवले जाते. या प्रक्रीयेत बऱ्याचदा बैलगाडीतच स्त्री बाळंत होते. गावातील सुईन बुगीबाई यांनी आतापर्यंत पन्नास पेक्षा जास्त बाळंतपणं गावातच केली आहेत. गावात आरोग्य विभागाचं छोटेसं केंद्र आहे ते सदैव बंद असते. त्याचा गावासाठी काहीच उपयोग नाही. बहुतांश आजारपणं ही अंगावरच काढली जातात.

गावातील शाळा जास्तीत जास्त वेळा बंद असते. शाळेच्या अनियमिततेमुळे पालकांनी आपली मुलं जवळच्या निवासी शाळांमध्ये दाखल केली आहेत. आता शाळेत केवळ दोनच मुले असून शाळा बंद पडन्याच्या मार्गावर आहे.

गावातील पाण्याची समस्या प्रचंड आहे दोन हातपंप बंद स्थितीत आहेत. एका विहीरीवरुन खांद्यावरून वाहून पाणी न्यावं लागतं. गावात तेंदुपत्ता हंगामात तेंदुपत्ता गोळा केला जातो. धानाची शेती होते. इतर वेळी लोकांना रोजगार उपलब्ध नसतो. लोक मजुरीसाठी तेलंगना राज्यात जातात. गावात गाई बैलांची संख्या जास्त असून त्यांच्या दुधाचे प्रमाण अतिशय कमी आहे. भाकडजानावरे विकता न आल्याने त्याचा केवळ शेणाचाच फायदा होतो.

गावात रोडिओ सुद्धा नाही

गावात मनोरंजनाची साधने उपलब्ध नाहीत. गावात अजून रेडीयो सुद्धा पोहचला नाही. हे सगळ लोकं निमुटपने सहन करतात. आदीवाशी नृत्यावर ताल धरणारी, गोटुलमध्ये जमणारी ही दोन पायाची झाडं या समस्यांची कुठेच तक्रार करत नाहीत. हे सगळ निमुटपणे सहन करतात. असेल त्या परीस्थितीत जगण्याचं जंगलाच वैशिष्ट्य या हसणाऱ्या बोलणाऱ्या झाडांनी धारण केलंय.

सागर गोतपागर, गडचिरोली

Updated : 11 Feb 2017 6:22 AM GMT
Next Story
Share it
Top