Home > मॅक्स रिपोर्ट > 'कलाकार' अभियंता गायकवाड कुणाच्या आशीर्वादाने पुन्हा सेवेत

'कलाकार' अभियंता गायकवाड कुणाच्या आशीर्वादाने पुन्हा सेवेत

कलाकार अभियंता गायकवाड कुणाच्या आशीर्वादाने पुन्हा सेवेत
X

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निलंबित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अनिलकुमार गायकवाड यांचं निलंबन रद्द करून राज्य सरकारने त्यांची राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता पदावर वर्णी लावली आहे. या नियुक्तीवरून राज्यातील कारभारात नितीन गडकरी यांचा हस्तक्षेप वाढल्याचं स्पष्ट झालं असून येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील शीतयुद्ध शीगेला पोहोचण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनिलकुमार गायकवाड यांची कारकीर्द राज्यातील सर्व अधिकारी, नेते आणि कंत्राटदारांना माहीत आहे. त्यामुळे एमएसआरडीसी वरची त्यांची नियुक्ती फडणवीसांच्या स्वच्छ प्रशासनाच्या दाव्यांचा फोलपणा ठरलीय.

एमएसआरडीसी, म्हणजेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कामांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विशेष रूची आहे. त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल आजही त्यांची तारीफ केली जाते. गडकरींच्या टोल धोरणावर आज टीकाही केली जाते. मात्र तरी सुद्धा गडकरींचा धडाका कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिलकुमार गायकवाड यांच्या नियुक्तीसाठी गडकरींचा शब्द कामी आला असून यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधातील देवेंद्र फडणवीस यांचा आवाज दुबळा ठरण्याची शक्यता आहे.

अनिलकुमार गायकवाड नितीन गडकरी, छगन भुजबळ यांच्या जवळचे समजले जातात. गायकवाड यांनी राज्यातील अनेक नेत्यांना निवडणुकीचा फंड सुद्धा पुरवला होता, अशी सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी कॅग आणि लोकलेखा समितीने सार्वजनिक बांधकाम खात्यावर ताशेरे ओढलेले आहेत. त्यामुळे अशा 'कलाकार' मुख्य अभियंत्याला देवेंद्र फडणवीसांनी का जवळ केलं हा खरा प्रश्न आहे?

राज्यातील रस्त्याच्या विकासासाठी अंदाजे १० हजार कोटींची तरतूद येत्या काळात करण्यात येणार आहे. यातील काही रक्कम सार्वजनिक बांधकाम खाते तर जवळपास ६ हजार कोटींची रक्कम एमएसआरडीसी मार्फत खर्च होणार आहे. अशा वेळी गायकवाड यांच्या सारख्या अभियंत्याची नेमणुक या ठिकाणी झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही आता या नेमणूकीबाबत खुलासा करावा लागणार आहे.

Updated : 10 April 2017 7:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top