Home > मॅक्स रिपोर्ट > आजपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी

आजपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी

आजपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी
X

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे. कर्जमाफीची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात कर्जमाफी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी करण्यात आली. सुरुवातीला 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पाहिल्या टप्प्यात लाभ मिळेल, असा दावा सरकारने केला आहे

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पडला. या प्रसंगी काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्रही देण्यात आले. या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळाल्यावर मनोगत मांडले. निसर्गाची अवकृपा झाल्याने उत्पन्न घटले, त्यामुळे कर्ज परत करता आले नाही, शेतीमधील भांडवल गुंतवणुकीचे मार्ग बंद झाले, पण आता कर्जमाफी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असा विश्वास पालघरमधील शेतकरी चंद्रकांत दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफीच्या प्रमाणपत्रानंतर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील २० लाख हेक्टर जागा सिंचनाखाली आणली, असा दावा त्यांनी केला. शेतीचा विकास दर उणे होता, मात्र आता तो १२ ते १२.५ टक्क्यांवर पोहोचला, उत्पन्नही ४० हजार कोटी रुपयांनी वाढले असा दावा त्यांनी केला. यापूर्वीही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली, मात्र शेतीमध्ये गुंतवणूक न केल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला. मात्र आम्ही कर्जमाफी करतानाच शेतीमध्ये गुंतवणूक करत आहोत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.कर्जबाजारी शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा कर्ज मिळत नाही, मग तो सावकाराच्या दुष्टचक्रात अडकतो. म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्जाची घोषणा केली, त्यावेळी आमच्यावर टीका झाली. पण जनतेचा पैसा वाचला पाहिजे, बँकांच्या चुकीच्या खात्यात पैसे जाऊ नये यासाठीच ऑनलाईन अर्जाचा निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले. मुंबईत शेतकरी असू शकतात, पण त्यांचे प्रमाण कमी असेल. मात्र यादीत मुंबईतही ८१३ शेतकरी असल्याचे समोर आले. याची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांनाही प्रोत्साहन देण्याची गरज होती, त्यांना २५ हजाराची प्रोत्साहन रक्कम देणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. निकषांमध्ये बसणारा शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या निधीचा वापर केल्याचे वृत्त होते. मात्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा फेटाळला. सामाजिक न्याय विभागाचा एकही पैसा कर्जमाफीसाठी घेतला नाही, असे त्यांनी सांगितले.

Updated : 18 Oct 2017 11:12 AM GMT
Next Story
Share it
Top