हावामान बदल आणि महिला

‘हवामान बदलाच्या संदर्भात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या गरजा’ या विषयावर न्यूयॉर्कमध्ये एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. सिकीडिकॉन या भारतातील संस्थेने जागतिक महिला आयोगातील कार्यक्रमाचा भाग म्हणून १५ मार्चला या परिसंवादाचे आयोजन केले होते. यात शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे, अपर्णा सहाय, विभुती जोशी, आणि ईथाओपियाचे केह्विन नासिमेंटो यांनी विचार मांडले. या परीसंवादाला विविध देशांतील ५० प्रतिनिधी उपस्थित होते. ज्यात जपान, अमेरिका, द.आफ्रिका, थायलंड, चीन, इंग्लड आणि इतर देशातील प्रतिनिधींचा सहभाग होता.

यावेळी नीलम गोऱ्हे यांनी वेगवेगळे मुद्दे मांडून त्यांचा उहापोह केला. गेल्या काही वर्षातील अवकाळी पाऊस, वीजा कोसळणे, गारपीट, दुष्काळ या आव्हानांसोबतच शेतीमालाला भाव नसणे हे प्रश्न व शेतकरी आत्महत्या याबाबतची परीस्थिती मांडली. २०१५ मध्ये भारतात झालेल्या एकूण ८००७ शेतकरी आत्महत्यांपैकी ३०३० म्हणजेच ३७.८% आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. महिला शेतकऱ्यांचा विचार केला तर जमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या नावाची नोंदणी नाही. अशा परीस्थितीत शहरांकडे स्थलांतर अपरिहार्य असले तरी शहरातही घनकचरा व्यपस्थापन, हवेतील प्रदूषण व हवामान बदलामुळे येणारी संकटे आणि त्यातून एकूण स्त्रियांची व विशेषत: एकल महिलांची परिस्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर महिला संघटन व सहाय्य योजना गरजेच्या आहेत. यासह इतर मुद्दे नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

सरकारने हवामान बदल आणि पॅरीस कराराबाबत तयारी केली असली तरी सामान्य माणसाला व शेतकऱ्यांना पाण्याच्या स्त्रोतांचे व नद्यांचे प्रदूषण या समस्यांनी त्रस्त केले आहे. अन्नसुरक्षा योजना, लातूर आणि महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था करत आहेत. याची त्यांनी माहिती दिली. अपर्णा सहाय यांनी महिला आरोग्यावर झालेला परिणाम स्पष्ट केला. तर विभूती जोशींनी स्थलांतरामुळे मलींची सुरक्षितता धोक्यात येऊन मुलींचा व्यापार केल्याची ऊदाहरणे सांगितली.