‘स्वच्छता अभियान’ राबवले म्हणून पगार रोखला

487

देशभर सुरु असलेल्या स्वच्छ भारत अभियानाला, गेल्या महिन्यात औरंगाबादेत मोठा झटका बसला. सकारात्मक अहवाल देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आलं. परिणामी 56 इंच की छाती सांगणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या प्रामाणिक कारभारावर घाव घातला गेला. पण हाच घाव घालणाऱ्या अधिकारी जयश्री कुलकर्णी गेल्या चार महिन्यापासून पगाराविनाच आहेत.

या आहेत जयश्री कुलकर्णी, पेशाने डॉक्टर. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी औरंगबाद महापालिकेत आरोग्य प्रमुख म्हणून काम पाहिलंय. डेंग्यू निर्मूलनापासून ते बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटरला टाळे ठोकण्यापर्यंतची अनेक बेधडक कामं यांनी केलीयेत. त्यांच्या प्रयत्नामुळे औरंगाबादमध्ये मुलींच्या जन्मदारात तब्बल 100 टक्क्यांनी वाढ झालीय. याची दखल थेट आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन त्यांचा सन्मानही केलाय. पण कधी कधी हरणाची सुंदर शिंगंच त्याचा कर्दनकाळ ठरतात.

जयश्री कुलकर्णी यांची ही धडाकेबाज कारवाई, शहरातल्या राजकारण्यांचे हितसंबध दुखावून गेली. अनेक राजकारण्यांनी त्यांच्यावर राजकीय दबाव आणला. पण, त्या बधल्या नाहीत. त्यातच आणखी एक प्रकार घडला. औरंगाबादमधल्या भाजपच्या एका बड्या नेत्यानं शहराच्या मध्यवर्ती भागात बेकायदेशीर इमारत बांधली. ज्या इमारतीला फक्त तीन माजल्याची परवानगी होती, तिथे उभे राहिले तब्बल सात मजले. आणि विशेष म्हणजे या इमारतीच्या सातव्या मजल्यावर, नर्सिंग होमसाठी परवानगी देण्याचा जणू आदेशच जयश्री कुलकर्णी यांना देण्यात आला. पण, स्वभावाप्रमाणे जयश्री कुलकर्णी यांनी ती परवानगी नाकारली. आणि त्या बड्या राजकारण्याची खप्पा मर्जी झाली.

थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत फोन गेले आणि मिस्टर क्लीन मुख्यमंत्र्यांनीही प्रकरणात भाजप नेत्याच्या बाजूनंच लक्ष घातलं. आणि जयश्री कुलकर्णी यांना द्रोहीच ठरवण्यात आलं. तो द्रोह म्हणजे लोकप्रतिनिधींशी उद्धट वागण्याचा. याच आरोपाखाली महापालिकेच्या स्वायत्त सभागृहानं जयश्री कुलकर्णी यांना थेट निलंबित करण्याचा निर्णय घेतला. पण, निलंबनाची कारवाई सक्तीच्या रजेत बदलली. जयश्री कुलकर्णी रजेवर जाताच, त्यांच्या जागेवर अत्यंत मर्जीतील अधिकारी बसवण्यात आला. त्याला आज तब्बल 14 महिने झालेत. 11 महिने जयश्री कुलकर्णी या घरीच बसून होत्या. त्यानंतर त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला. तेंव्हा कुठे जाग्या झालेल्या प्रशासनानं त्यांना रुजू करून घेतलं. पण, तेही एका असंवैधनिक पदावर. हे पद म्हणजे स्वच्छ भारत अभियान समन्वयक.

लाचखोर अधिकारी शैलेंद्र बंजानिया

या पदाचा कारभार हाती घेताच महापालिकेच्या स्वच्छतेची अनेक कामे पूर्ण झाली. इतिहासात कधी नव्हे ते स्वच्छतेचं डॉक्यूमेंटेशन पूर्ण झालं. आणि सुरू झाली स्वच्छतेची पाहणी, यासाठी थेट नरेंद्र मोदींच्या गुजरातहून पथक आलं. आणि या पथकानं पाच लाखाची लाच मागणी केली. कुलकर्णींनी प्रकार आयुक्तांच्या कानावर घातला. आयुक्तांनी एँटी करप्शनचा मार्ग सांगितला. जयश्री कुलकर्णींनी त्यावर अंमल केला. लाचखोर अधिकारी जाळ्यात सापडले. पण शिक्षा मात्र जयश्री कुलकर्णी यांच्या नशिबी आलीय. त्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगारच देण्यात आलेला नाही.

आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनानं त्यांना जॉईन तर करून घेतलं खरं, पण, अकाउंट विभाग त्यांचा पगार काढायला तयार नाही. कारण, त्यांच्या मूळ पदावर एक व्यक्ती आधीच कामकरतेय, त्याला पगार सुरु आहे. आणि जयश्री कुलकर्णी काम करत असलेले पद हे संवैधानिक नाही. त्यामुळे त्या पदाचा पगार काढता येत नसल्याचं लेखा विभाग सांगतो. परिणामी उत्तुंग कामगिरी करूनही ही निर्भिड अधिकारी पगाराविनाच आहे.