सरणासाठी आता ‘अॅग्रोवूड’

365

मुंबईतील भांडुप या पूर्व उपनगरातील ‘गुजराती सेवा मंडळ’ गेली  जवळपास पन्नास वर्षे स्मशानभूमीचे व्यवस्थापन करीत आहे. या मंडळाचे विश्वस्त आणि कार्यकर्ते बच्चूभाई गाला यांच्या पुढाकाराने ‘अॅग्रो वूड’ या पर्यावरण स्नेही सरणाचा वापर सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना बच्चूभाई गाला म्हणाले,  या मंडळातर्फे  १९५५ पासून आम्ही या स्मशानभूमीचे व्यवस्थापन करीत आहोत. परंतु हे करत असतानाच पर्यावरणाचा समतोल सातत्याने ढासळत असल्याचे लक्षात येत होते. परंतु त्यावर काही ठोस पर्याय सापडत नव्हता. यातूनच आमच्या मंडळाने दहनासाठी इतर पर्यायांचा विचार सुरु केला.

एका सर्वेक्षणानुसार मुंबई महानगर पालिकेला  स्मशानभूमीच्या वापरासाठी वर्षाला २० लाख टन लाकडाची गरज लागते. यासाठी सुमारे ८५०० रुपये प्रत्येक टनमागे पालिकेला खर्च करावे लागतात. यासाठी जवळपास २ लाख झाडे तोडावी लागतात. एक प्रेत जाळण्यासाठी नऊ वर्षे जुनी दोन झाडे लागतात तर जवळपास ३०० किलो लाकूड लागते. त्यासाठी पालिकेला प्रत्येकी २५०० ते २६०० रुपये खर्च येतो. पर्यावरणाचा ऱ्हास होतो तो वेगळा. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च आणि झाडांचा विनाश आपण करीत आहोत यावर आमच्या मंडळात चर्चा होत असे. त्यातून पालिकेतर्फे विद्युत दाहीनी आणि गॅस दाहिनीचा पर्याय समोर आला. गेली काही वर्षे आमच्या स्मशानभूमी मध्ये पारंपरिक दाहिनीसोबत विद्युत आणि गॅसच्या दाहिनीचा वापर सुरु आहे. पालिकेतर्फे नागरिकांसाठी गॅस आणि विद्युत दाहीनी मोफत पुरवले जात असले तरीही मुळात हा पर्याय खूप महाग आहे. विद्युत दाहिनीमध्ये प्रेत जाळण्यास सुमारे प्रत्येकी जवळपास २५०० रुपये खर्च येतो. तर गॅस दाहिनीला सर्वसाधारपणे ६०० रुपये खर्च येतो. आजही भारतीय मानसिकता विद्युत किंवा गॅस दाहिनीच्या वापरासाठी सहज तयार होत नाही. आमच्या स्मशान भूमीमध्ये फक्त १० ते १५ टक्केच या पर्यायाचा वापर करतात, असा आमचा अनुभव आहे. यातूनच नवीन अधिक स्वस्त, पर्यावरण स्नेही आणि पारंपारिकतेच्या जवळ जाणाऱ्या पर्यायाच्या शोधात असताना आम्हाला अॅग्रोवूडचा पर्याय डोळ्यासमोर आला.

नागपूर येथील विजय लिमये या पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्याने अॅग्रोवूडचा वापर करीत असल्याचे आम्हाला कळले.  यावर अधिक माहिती देताना गाला म्हणाले अॅग्रोवूड म्हणजे अॅग्रो वेस्ट आहे. शेतकऱ्याने पिकवलेले धान्य काढल्यानंतर उरलेली साले, टरफले तसेच जनावरे खात नसलेली गवत आणि इतर तंतू जे भारतातील शेतकरी शेताच्या आजूबाजूला जाळून टाकतात. शेतातील या टाकाऊ वस्तूपासून अग्रो वूड तयार केले जाते. यासाठी शेतकऱ्याकडून १ रुपया किलो दराने शेतावरच विकत घेतले जाते. त्याचा लगदा करून त्यापासून हे अॅग्रोवूड तयार केले जाते. महाराष्ट्रात नागपूर येथे अॅग्रोवूडचा कारखाना आहे. सध्या साधारण ६ रुपये किलो या दरात हे अॅग्रोवूड उपलब्ध असुन एक प्रेत जाळण्याकरिता फक्त २५० किलो अॅग्रोवूड लागते. तर पारंपरिक पद्धतीने जाळण्यास साधारण दोन तास वेळ लागतो तर याअॅग्रोवूडमुळे फक्त दीड तास अवधी लागतो.  तसेच या पासून कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही. तसेच झाडाची होणारी कत्तल कमी होते. शेतकऱ्यांना फुकट जाणाऱ्या वस्तूसाठी पैसे मिळतात. गेले वर्षभर या अॅग्रोवूडचा आमच्या स्मशानभूमीत वापर करीत असल्याचे बच्चूभाईंनी सांगितले. मुंबईसारख्या शहरांमधून या पर्यावरण स्नेही आणि पारंपरिक पद्धतीला कुठलाही धक्का न लावणाऱ्या या पर्यायाचा प्रसार व्हावा यासाठी बच्चूभाई गाला यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. संपर्क ९८१९५५६९४६