Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांच्या कर्जफेडीसाठी तो विकतोय शेतजमीन!

शेतकऱ्यांच्या कर्जफेडीसाठी तो विकतोय शेतजमीन!

शेतकऱ्यांच्या कर्जफेडीसाठी तो विकतोय शेतजमीन!
X

खरंच काही करण्याची इच्छा असेल तर काहीच अशक्य असं नाही. हे सरकार आणि विरोधकांनी विनायकराव पाटील यांच्याकडून शिकावं. आपल्या इतर शेतकरी बांधवांना कर्जाच्या दरीतून बाहेर काढण्यासाठी विनायकरावांनी त्यांच्याकडची 15 पैकी 10 एकर शेती विकण्यासाठी काढली आहे.

रविवारच्या दैनिक लोकमतमध्ये आलेली ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल आहे. शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी धावून आलेल्या एका शेतकऱ्यानं स्वतःचं शेत विकण्यासाठी ही जाहिरात दिलीय. विनायकराव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या कवठा या गावचे. त्याचं शेत सुद्धा याच गावात आहे. सध्या त्यांच्याकडे 15 एकर शेती आहे. ती सुद्धा तेरणा नदीच्या काठी. त्यामुळे जमीन बारमाही ओलीताखाली आहे. मराठवाड्यात तशी बारमाही ओलीताखालची जमीन कमीच. पण, विनायकराव तशे नशिबवान. पण, आपल्या इतर शेतकरी बांधवांवर सतत ओढावणाऱ्या संकटांनी त्यांच मन हेलावून गेलंय.

गेली 10 वर्ष ते कर्जबाजारी, गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी झटत आहेत. कधी स्वखर्चानं छोटेखानी कृषी प्रदर्शन घेणं. कधी शेतकऱ्याला मोफत बियाणं वाटणं. तर कधी जनावरांसाठी चारा छावणी चालवणं. अशी कामं ते करत आहेत.

पण, सध्याच्या शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणामुळे ते हावालदील झाले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी दोघं सुद्धा त्यावर राजकारण करत आहेत. प्रत्यक्षात कुणीही गंभीर नसल्याचं लक्षात येताच, त्यांनी त्यांच्या परिनं पाऊल उचललं आणि स्वतःची 15 पैकी 10 एकर शेती विकण्यासाठी काढली. त्याची रितसर जाहिरातच त्यांनी पेपरमध्ये दिली.

महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या एकुलच्या एक मुलानं सुद्धा त्याच्या या पावलाला पाठिंबा दिला आहे. त्यांचा मुलगा सध्या पुण्यात बीकॉम शिकत आहे. पत्नीचं निधन झालंय. तर मुलगी अकोल्याला दिली आहे. एकटे विनायकराव सध्या शेतातच राहतात. ते सुद्धा शेटनेटमध्ये. त्यावर “जगणं सोपं करणं आपल्या हातात असतं” असं उत्तर ते देतात. “झेडपीमध्ये एक-एक सदस्याचा घोडेबाजार करायला कोट्यवधींचा खेळ होतो. पण, तुरीला भाव मिळत नाही” अशी खंत सुद्धा ते व्यक्त करतात. विनायकराव यांनी अण्णा हजारेंबरोबर सुद्धा काम केलं आहे. सध्या विनायकराव यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. जमीन विकून आलेल्या पैशांच आणखी काय काय करता येऊ शकतं याचा आढावा घेत आहेत.

- नीलेश धोत्रे

Updated : 2 April 2017 1:33 PM GMT
Next Story
Share it
Top