शिवसेनेचा ‘उप’मर्द!

‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मी मर्द आहे’, अशी गर्जना करून उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रं खऱ्या अर्थाने हाती घेतली. त्यानंतरच्या निवडणूकांमध्ये सातत्यपूर्ण यश संपादन करून उद्धव ठाकरे यांनी आपलं राजकीय कौशल्य वेळोवेळी सिद्ध केलंय. काँग्रेस-राष्ट्रवादी नंतर उद्धव ठाकरे मोठ्या हिमतीने भारतीय जनता पक्षाशीही लढतायत.

मुंबई महापालिकेच्या सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या समोरच हातात कमळ घेऊन भाजपच्या नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान करून ‘मोदी मोदी’ अशी नारेबाजी केली. उद्धव ठाकरेंचा उपमर्द करण्यात आला. मात्र काही का असेना सत्ता मिळाली म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घोषणा देण्यासाठी ही शिवसेनेच्या नगरसेवकांचा आवाज निघाला नाही.

२०१४ नंतर उद्धव ठाकरे यांना सतत अपमानाचा सामना करावा लागत आहे.  उद्धव ठाकरे यांना ‘औकात’ दाखवण्याची एकही संधी भारतीय जनता पक्षाने सोडलेली नाही. मंत्रिमंडळातील सहभाग ते मुंबईच्या महापौरांची निवडणूक. विशेष म्हणजे नेहमी स्वाभीमानाच्या गप्पा करणाऱ्या शिवसेनेला आणि शिवसैनिकांना या अपमानाची सवय झाली म्हणून असेल किंवा वरिष्ठ नेतृत्वाला हा अपमानच वाटत नसेल म्हणून असेल पण शिवसैनिक भारतीय जनता पक्षाकडून होणाऱ्या कुठल्याच अपमानाने पेटून उठलेला दिसत नाही. याउलट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्त कडवटपणा दिसून येतोय.

सत्तेसाठी सध्या शिवसेना तडजोड करतेय की किरीट सोमय्या आणि आशिष शेलार यांच्या धाकाने गप्प आहे, हे न समजल्याने शिवसैनिकही गोंधळलेल्या स्थितीत आहेत.