Home > मॅक्स किसान > यूपीत कर्जमाफी, तामिळनाडूत कोर्टाचे आदेश, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काय?

यूपीत कर्जमाफी, तामिळनाडूत कोर्टाचे आदेश, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काय?

यूपीत कर्जमाफी, तामिळनाडूत कोर्टाचे आदेश, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काय?
X

उत्तर प्रदेशात सत्तेत येताच भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातल्या तब्बल अडीच कोटी शेतकऱ्यांच कर्ज आता माफ केलं जाणार आहे. 1 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे. त्यासाठी तब्बल 36,000 कोटींचा निधी देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या नव्या मंत्रिमंडळाची मंगळवारी पहिली बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

तर तिकडे मद्रास हायकोर्टानं तामिळनाडूतील ५ एकर पेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्ज माफ करा असे आदेश तामिळनाडू सरकारला दिले आहे. सरकारमध्ये आल्यानंतर निवडणुकांच्या काळात जयललिता यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर केली. पण ती फक्त ५ एकरपर्यंतच देण्यात आली होती. त्याविरोधात कावेरी शेतकरी संघटनेनं हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे. आता कोर्टाच्या आदेशानंतर कर्जमाफीसाठी तामिळनाडू सरकारला किमान ६००० कोटींचा खर्च येणार आहे.

महाराष्ट्रात मात्र अजूनही बळीराजा कर्जमाफीच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे. शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा मंगळवारी पनवेलमध्ये समारोप झाला. त्यावेळी विरोधकांनी फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केला. भाजप दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. तर यापुढे सुद्धा शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार सर्व नेत्यांनी समारोपाच्या सभेत व्यक्त केला आहे.

Updated : 4 April 2017 3:07 PM GMT
Next Story
Share it
Top