मॅरेथान धावपट्टुचा रेल्वेतून पाय घसरून मृत्यू

313

बडोद्यात झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत लोकेश वाघमारेचा दुसरा क्रमांक आला होता. घरी जाऊन कधी आपल्या आईला ट्रॉफी दाखवतो असं त्याला झालं होतं. स्वराज्य एक्सप्रेसनं तो मुंबईला येण्यासाठी निघाला. गाडी वसई स्थानकात आली. खरंतर ही गाडी इथं थांबतच नाही, पण, गाडीचा वेग मात्र कमी झाला. घरी जाण्याची घाई लागलेल्या लोकेशला या वेगाचा अंदाज आला नाही आणि त्यानं गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी गाडीनं वेग पकडला आणि होत्याचं नव्हतं झालं…धावपट्टु लोकेशचा प्लॅटफॉर्मवर पडून मृत्यू झाला.

लोकेश वसईतील गौराई पाड्यातला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. गौराई पाड्यातल्या दुर्गा नगरमध्ये एका छोट्याशा चाळीत त्याचं कुटुबं राहतं. लोकेशचे वडील मनोरुग्ण आहेत. तर आई घरकाम करुन संसाराचा गाडा चालवते. त्याला दोन बहिणी आहेत. एकीचं लग्न झालंय. पण पती वारल्यानं ती सुद्धा आपल्या दोन मुलांसह इथंच राहते. घरात आई आणी लोकेश हे दोघेच कमवते होते.
घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असतांनाही लोकेशनं राष्ट्रीय खेळाडू होऊन आपल्या गरिबीवर मात करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. वसई-विरारसह मुंबई आणी मुंबई बाहेरच्या अनेक स्पर्धेत त्यानं पारितोषकं पटकावली होती. त्याच्या मृत्यून त्याच्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.