Home > मॅक्स किसान > मराठवाड्यात आठवड्याला सरासरी २० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात आठवड्याला सरासरी २० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात आठवड्याला सरासरी २० शेतकऱ्यांच्या आत्महत्या
X

कायम दुष्काळी मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच असून गेल्या काही महिन्यातील आत्महत्यांची आकडेवारी खरोखर मन सुन्न करणारी आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या वाढत आहे. त्यामुळे गेल्या १० महिन्यात मराठवाड्यामध्ये कर्जमाफीची प्रतिक्षा करुन थकलेल्या ८०० शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे. याचाच अर्थ दर आठवड्याला सरासरी २० शेतकरी आंत्महत्या करत आहेत. आणि आकडेवारी खूपच गंभीर आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. मागच्या पाच वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना दोन वर्षांत पावसाने दिलासा दिला. मात्र जरा कुठे परिस्थिती अनुकूल होत असतानाच नोटाबंदी आणि त्यापाठोपाठ जीएसटीमुळे परिस्थिती अधिकच प्रतिकुल झाली. यामुळे शेतकरी आणि शेतीव्यवसायच अडचणीत आला. कर्जमाफीची घोषणा झाल्यामुळे बँकांनी पीककर्ज देण्यास हात आखडता घेतला. मात्र ही कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांचा आकडा अल्प आहे, कर्जमाफीचा लाभ मिळत नाही आणि पीककर्जासाठी बँका उभे करत नाहीत अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली. अशा दोलायमान अवस्थेत मराठवाडय़ात जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या काळात तब्बल ८०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात सर्वाधिक १६७ आत्महत्या बीड जिल्हय़ात झाल्या आहेत. त्यापाठोपाठ नांदेड जिल्हय़ात १२४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

एकीकडे सरकार लाभार्थीची जाहिरात बाजी करत आहे तर दुसरेकडे शेतकरी सरकारच्या धोरणाला कंटाळुन आत्महत्या करत आहे. मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्याप थांबयाला तयार नाहीत. विभागात १० महिन्यांत झालेल्या ८०० आत्महत्यांपैकी १५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासन मदतीस अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. शिवाय ७४ प्रकरणे अद्याप चौकशीत प्रलंबित आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत मिळते की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. सरकारच्या अटी आणि नियमांमुळे शेतकऱ्यांना मृत्यूनंतर ही मदत मिळेत नाही या विवंचनेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंब आहेत.

मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय आत्महत्या

औरंगाबाद - १०८ जालना - ७१

परभणी - १०९ हिंगोली - ४३

नांदेड - १२४ बीड - १६७

लातूर - ७६ उस्मानाबाद - १०२

Updated : 14 Nov 2017 10:10 AM GMT
Next Story
Share it
Top