मंत्रालयात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण

12259
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. रामेश्वर हरिभाऊ भुसारे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा गावचा हा शेतकरी आहे. गारपीटमुळे त्याच्या पॉलिहाऊसचं नुसकान झालं आहे. त्याच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तो मंत्रालयात गेला होता. नेमकं कुठल्या कारणानं त्याला मारहाण झाली आहे हे अजून कळू शकलेलं नाही. पण, मारहाण झालेल्या शेतकऱ्यानं पोलिसात तक्रारीसाठी धाव घेतली आहे.

हा शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यासाठी आला होता. पण पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नाही असं सांगितलं. शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अडून राहीला. त्यानंतर पोलिसांनी जबरदस्ती करून आपल्याला बाहेर काढलं आणि मग लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. या शेतकऱ्याला मीडियाशी बोलण्यापासून सुद्धा पोलिसांकडून मज्जाव केला जात होता.