भयानकच !

2115

गर्भलिंग चाचणी आणि मुलगा कसा होतो याची माहिती देणाऱ्या पुस्तकांवर कायद्यानं आपल्या राज्यात बंदी आहे. पण सरकारच या बंदीचे तीनतेरा वाजवत असेल तर काय करायचं ? आश्चर्य वाटून घेऊ नका पण हे खरं आहे. बीएएमएस म्हणजेच आयुर्वेदीक डॉक्टरांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सर्रास मुलगा कसा होतो याचं शिक्षण दिलं जातंय. ते ही अगदी अनेक वर्षांपासून. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यात कुठल्याही कॉलेजमध्ये महत्त्वाचे अभ्यासक्रम हे राज्य सरकारच्या मान्यतेनेच शिकवले जातात.

आयुर्वेदाचा अभ्यास शिकणाऱ्या या मुलांना वेगवेगळ्या संहितांच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं. त्यातील चरक संहितेमध्ये ‘पुसंवन’ विधीच्या नावाखाली मुलगा कसा होतो हे शिकवलं जातं. त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे शुद्र महिलेनं पुत्रप्राप्ती कशी करावी या शिर्षकाखाली अतिशय लांच्छनास्पद धडे या मुलांना शिकवले जात आहेत.

सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे हे गेल्या काही दिवसांपासून याबाबत सतत आवाज उठवत आहेत. त्यासाठी त्यांनी सरकारकडे पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. कुटुंब कल्याण विभागानं त्याची दखल घेत नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबाबत पत्र सुद्धा लिहीलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे पत्र पाठवण्यात आलं आहे. पण, त्यावर अजून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. अजूनही ‘पुसंवन विधी’ हे अभ्यासक्रमात कायम आहेत.

आयुर्देवात महिलांच्या बाबतीत असा अभ्याक्रम शिकवणे घटनाबाह्य आहे. एखाद्या महिलेला पुत्रप्राप्तीसाठी दुसऱ्या जातीच्या व्यक्तीसोबत संग कर असं म्हणणं हे अपमानास्पद आहे. आपण जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या प्रयत्न करत असतांना शासकीय अभ्यासक्रमांतून मुलांना असं शिकवणं अत्यंत चुकीचं आहे.

– गणेश बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते

मुळातच मुलगा-मुलगी हा भेदभावच नसावा. असं काही असेल तर आयुर्वेदीक डॉक्टरांनी हे सिद्ध करून दाखवणं गरजेचं आहे. तसंच त्याचे मुलभूत पुरावे देणं सुद्धा गरजेचे आहे. अधुनिक आरोग्यशास्त्रामध्ये असं काही शिकवलं जातं नाही. मी गेली 28 वर्षे प्रॅक्टीस करत आहे. पण, आतापर्यंत इतक्या दिवसांमध्ये अशी कुठलीही केस मी पाहिलेली नाही.

– डॉ. मिना जिंतुरकर, प्रसुती तज्ज्ञ, उस्मानाबाद

काय आहे पुसंवन विधी ?

महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी पुसंवन विधी केला जातो. त्यानुसार वडाच्या कोवळ्या अंकूराला दुधाबरोबर उगळून त्याचे थेंब महिलेच्या नाकात टाकले जातात. सम संख्येचे थेंब उजव्या नाकात टाकले तर मुलगा होतो. तर विषम संख्येचे थेंब टाकले तर मुलगी होते, असं विद्यार्थ्यांना शिकवलं जातं.

विशेष म्हणजे आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या संहितांमध्ये पुसंवन विधीबाबत एकवाक्यता नाही. प्रत्येक संहितेमध्ये  आणखी वेगवेगळ्या विधी सागंण्यात आल्या आहेत. मुलगा होण्यासाठी वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. कुठल्या दिवशी संभोग केला म्हणजे मुलगा होते हे सुद्धा सांगण्यात आलं आहे.

आयुर्वेदाच्या बऱ्याच गोष्टी या शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करता येत नाहीत. तसंच या गोष्टी सुद्धा आतापर्यंत सिद्ध करण्यात आलेल्या नाहीत.

एकीकडे सरकार गर्भलिंग चाचणी आणि मुलगा कसा होतो हे सांगणाऱ्या पुस्तकांवर बंदी आणत आहे. तर दुसरीकडे मुलगा कसा होईल याचं प्रशिक्षण भावी डॉक्टरांना देत आहे. कायदे तयार करणाऱ्यांच्या लक्षात का नाही आलं. अभ्यासक्रम ठरवणारी यंत्रणा नव्या कायद्यांबाबत एवढी अनभिज्ञ कशी काय राहू शकते.