पारदर्शी पहाऱ्यात शिवसेनेचा महापौर

438

मुंबईच्या सत्तास्पर्धेत अखेर शिवसनेचा विजय झालाय. मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्यात शिवसेनेला यश आलंय. मात्र, यावेळेस भगव्याचा दांडा कमळाबाईचा देठ आहे. त्यामुळं कमळाला नसलेले काटे भगव्याला टोचल्याशिवाय रहाणार नाहीत. महापौर पदाच्या निवडणूकीत भाजपाने शिवसेनेच्या बाजूनं कौल दिला. तर मनसेचे “सात” गैरहजर राहिले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यानं कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रश्नच उरला नाही.

मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला आपला महापौर करता आला. मात्र, आपल्या पक्षाचा महापौर करणे शक्य असूनही शेवटच्या क्षणी भाजपाने दिलेल्या पाठिंब्यामुळेच शिवसेनेला महापौर करता आला हेही तितकेच खरे. याबदल्यात भाजपाने शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांकडून सरकार अस्थिर करण्याची वारंवार दिली जाणा-या धमकीतील हवाच काढून टाकली आहे. सामनामधून कितीही आरडाओरड केली तरी वर्षाच काय मुंबई महापालिका वगळता कोणत्याच महापालिकेत लोकायुक्त नेमण्याच्या मागणीला भाजप भिक घालणार नाही. त्यामुळं मुंबई महापौराच्या आणि सत्तेच्या डोक्यावर नेहमीच लोकायुक्ताचा बागुलबुवा असणार आहे. त्यामुळं आगामी काळात मुंबईचे महापौरपद हे केवळ शोभेचे बाहुले ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकही पद न घेता दिलेला पाठिंबा आज गोड वाटत असला तरी त्याच्या बुडाखाली सुरूंगाची पेटलेली वात आहे. म्हणूनच पारदर्शी पहाऱ्याची तटबंदी अधिक भेदक असणार आहे. लोकायुक्त नेमका कसा अंकुश ठेवणार आणि त्यांच्या अधिकार कक्षा काय असतील याची अद्याप स्पष्टता नसली तरी भगव्याला कमळाबाईच्या या काट्याची सतत पारदर्शी टोचणी असणार हे नक्की. म्हणजे शेळीला दिवसभर भरपूर खायला द्यायचे आणि रात्रभर तिच्यासमोर वाघाचे चित्र लावायचे ज्यामुळे ना तिला खाण्याचे सुख ना पचवण्याचे…अशीच परिस्थीती होण्याची शक्यता अधिक. मंत्रीपद देवून सत्तेत सहभागी करायचे आणि आवाज कसा बंद करायचा हे भाजपाला नक्की माहिती आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडे पाहता त्याची पुरेशी कल्पना येते. राज्यातल्या क्षीण झालेल्या विरोधकांची सरकारला तशी भिती नाहीच. मात्र, वारंवार जखमी होणारा शिवसेनेचा वाघ जर या कळपात गेला तर त्यांना नक्कीच बळ प्राप्त होणार याची पुरती कल्पना असलेल्या कमळाबाईने शेवटी आपला डाव खेळलाच. मुंबईत मदत करून जेरीस आणलेल्या वाघाची कोण होतास तू काय झालास तू अशी अवस्था नजीकच्या काळात बघायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको.