पर्रिकर परतण्याची ६ कारणं

3135

मनोहर पर्रिकर अपेक्षेप्रमाणे अखेर गोव्यात परतले. पण, नेमकं असं काय राजकारण झालं आणि त्यांना परत यावं लागलं याची केलेली ही कारणमिमांसा

 

नामधारी पद नको

केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून काम करण्यास फारसा वाव मिळत नाही. तिथं सर्व सूत्र अजित डोवाल यांच्या हातात आहेत. केंद्रात नामधारी मंत्री राहण्यापेक्षा गोव्यात मुख्यमंत्री म्हणून राहण्यास मनोहर पर्रिकरांची जास्त पसंती आहे. प्रचारादरम्यान गोव्यातील मीडियाला दिलेल्या मुलाखतीत यांनी गोव्याची सतत आठवण येत असल्याचं अनेकदा सांगितलं होतं.

 स्थिरता आणि पर्रिकर

गोव्यात असं म्हणतात की, मनोहर पर्रिकरच भाजपला स्थिर सरकार देऊ शकतात. सध्याची गोव्याची राजकीय गणितं पाहिली तर सर्वांना बरोबर घेऊन सत्ता चालवण्याचं कसब पर्रिकर यांच्यातच आहे. त्यामुळे त्यांना राज्यात परत पाठवणं भाजपला भाग पडलं. विजय सरदेसाई या मुळच्या काँग्रेसी माणसाला सांभाळण्याचं काम त्यांच्याव्यतिरिक्त कुठलाही भाजप नेता करू शकत नाही. तसंच इतर काँग्रेसी नेत्यांपेक्षा पर्रिकर व्यवस्थित सांभाळून घेऊ शकतात. हा विजय सरदेसाई यांना असलेला विश्वाससुद्धा महत्त्वाचा आहे.

ढवळीकर आणि पर्रिकर

मनोहर पर्रिकर परत आले तरच पाठिंबा देऊ ही अट सुदीन ढवळीकर यांच्या मगोपा पक्षानं भाजपला घातली. त्याचं कारण स्थिरतेमध्ये आहे. याआधी पार्सेकरांच्या विरोधात जाऊन ढवळीकरांच्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला होता, हे लक्षात घेण्यासारखं आहे.

 विजय सरदेसाई आणि पर्रिकर

विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉर्वड पार्टीनं पर्रिकरांना पाठिंबा देणं आश्चर्याचं मानलं जात आहे. याच सरदेसाई आणि पर्रिकरांमध्ये एकदा टोकाचं शाब्दीक वाक् युद्ध रंगलं होतं. संपूर्ण प्रचारादरम्यान त्यांनी मनोहर पर्रिकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. पर्रिकर आपले दुष्मन नंबर एक आहेत हे दाखवून दिलं होतं. पण, आता परिस्थिती बदलली आहे. विजय सरदेसाई यांच्या पक्षाचा होल्ड दक्षिण गोव्यात जास्त आहे. गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईजिन्हो फलेरो हे सुद्धा दक्षिण गोव्यातीलच आहेत. या दोघांमध्ये विस्तवसुद्धा जात नाही. दक्षिण गोव्यातल्या ख्रिश्चन बहुल भागातल्या वर्चस्वासाठी दोघांमध्ये स्पर्धा आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री फलेरो असू शकतात यांची कुणकुण लागताच सरदेसाई यांनी पर्रिकरांचा पर्याय निवडला. पर्रिकर सर्वांना बरोबर घेऊन काम करू शकतात असा त्यांना विश्वास आहे. शिवाय काँग्रेस आणि परिणामी फलेरो यांच्यासोबत राहून पक्ष वाढणार नाही याचा अंदाज घेऊनच ते भाजप बरोबर गेले.

चर्च आणि पर्रिकर

गोव्यातल्या राजकारणात चर्चला सर्वात जास्त महत्त्व आहे. चर्चची भूमिका कायम भाजपविरोधी असते असं बोलंल जातं. पण पर्रिकरांनी इंग्रजी शाळांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे  चर्च त्यांच्यावर खूष आहे. इतर कुठल्याही भाजपच्या नेत्यापेक्षा मनोहर पर्रिकर यांना चर्चचा जास्त पाठिंबा आहे.

कुठे चुकली काँग्रेस

पहिली चूक

विजय सरदेसाई मुळचे काँग्रेसी. तरी सुद्धा यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्यास ते इच्छुक होते. पण लुईजिन्हो फलेरो यांच्याशी असलेल्या वादामुळे ती होऊ शकली नाही. सरदेसाई यांनी दिग्विजय सिंहांबरोबर बैठक सुद्धा केली. सरदेसाई यांनी फक्त 4 जागांची मागणी केली होती. आघाडीची चर्चा सुरू असतांनाच काँग्रेसने सरदेसाई यांनी मागितलेल्या जागी उमेदवार देऊन त्यांना एबीफॉर्म सुद्धा दिले. परिणामी आघाडी होऊ शकली नाही.

 दुसरी चूक

निकाल लागल्यानंतर विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉर्वड पार्टीनं काँग्रेसबरोबर जाण्याची तयारी सुरू केली. पण, कँग्रेसला शेवटपर्यंत त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडता आला नाही. शेवटी लुईजिन्हो फलेरो यांच नाव निश्चित होण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचवेळी विजय सरदेसाई यांनी त्यांचा प्लॅन बदलला आणि भाजपला पाठिंबा दिला.

नीलेश धोत्रे