टीव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट

झी २४ तास ( रोखठोक )

झी 24 तासच्या रोखठोकमध्ये मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय पक्षांची दादागिरी संपवण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज  व्यक्त केली. तसंच वेळ आली तर आपण प्रादेशिक पक्षांच्या आघाडीच्या निमंत्रकपदाचीही जबाबदारी स्वीकारू असंही त्यांनी म्हंटलंय. भविष्यात भाजपशी युती करण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली आहे. निवडणुकीनंतर नव्यानं सुरूवात करणार असल्याची घोषणासुद्धा त्यांनी केली.

 

महाराष्ट्र वन ( आजचा सवाल )

महाराष्ट्र वनच्या आजचा सवालमध्ये मंगळवारी ‘शिवसेना-भाजपच्या राजकारणात मध्यावधी निवडणुका लादल्या जातील का?’ या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. चर्चेच्या सुरूवातीलाच शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी राज्य सरकारनं आमचा पाठिंबा गृहीत धरू नये असं स्पष्ट केलं. तर शिवसेना असा अतातायीपणा करणार नाही असा विश्वास भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी व्यक्त केला. शिवसेनेनं पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार नाही हे शरद पवारांनी आधीच स्पष्ट केलंय, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी सांगितलं. मध्यावधी निवडणुका झाल्या तर काँग्रेसची तयारी आहे, तसंच काँग्रेस कुठल्याही जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केलं. या चर्चेत सहभागी झालेले सकाळ टाईम्सचे संपादक रोहित चंदावरकर यांनी संपूर्ण परिस्थितीचं विश्लेषण केलं. हा भाजपचा मोठा गेम प्लॅन आहे. तसंच काँग्रेसमुक्त भारतसोबत शिवसेनेलाही वाढू द्यायचं नाही, मोदी आणि शहांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्रीही शिवसेनेला विरोध करतायत असं चंदावरकर यांनी म्हंटलं.

 

साम टीव्ही ( आवाज महाराष्ट्राचा )

साम टीव्हीच्या ‘आवाज महाराष्ट्राचा’ या चर्चेत ‘हिंदू लोकशाही’ या मुद्द्यावर चर्चा झाली. ‘हिंदूं बहुसंख्य आहेत, म्हणून या देशात लोकशाही तगून आहे’, असे सुब्रह्मण्याम स्वामींनी म्हटले आहे. त्यावर चर्चा झाली. हिंदुत्ववादी प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी भारत हे हिंदूराष्ट्र आहे, अशी लाइन घेतली. त्यावर भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांची गोची झाली. त्यांना भारत हे हिंदूराष्ट्र आहे अथवा नाही, यावर काहीच बोलता आले नाही. एमआयएमचे प्रवक्ते आरेफ हुसैनी यांनी भाजपवर सडकून टिका करत, ध्रुवीकरणाचा हा प्रयत्न आहे, असे सांगितले. काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी भाजपने राष्ट्रभक्त ठरवण्याचं कंत्राट घेतलं आहे, असं म्हटलं. त्यावरुन चर्चा गेली ती नथुराम गोडसेवर. संपादक संजय आवटे यांनी हिंदुत्ववादी प्रवक्त्याला विचारले, आयएसआय दहशतवादी आहेच, त्याचप्रमाणे नथुराम देशद्रोही आहे, असे तुम्ही मानता का? त्यावर कोचरेकर यांनी ‘नथुराम देशभक्त होता’, अशी भूमिका घेतली. भाजप प्रवक्तेही त्या मुद्द्यावर संदिग्ध होते. ‘राज्यघटना ही लोकशाहीचा आधार आहे. त्या राज्यघटनेच्या शिल्पकारानेच खुद्द हिंदू धर्म सोडला आणि असे असताना हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून भारतात लोकशाही आहे, असे म्हणणे हा अंतर्विरोध आहे’, या शब्दांत संजय आवटेंनी समारोप केला.