टीव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट

झी 24 तास ( रोखठोक )

झी २४ तासच्या रोखठोकमध्ये सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी महापालिका, जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालानंतर मंत्रिमंडळात फेरबदलाचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ उदय निरगुडकर यांना दिलेल्या या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी आपलं मत दिलखुलासपणे व्यक्त केलं. पक्ष संघटना मजबूत आहे पण, मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. निवडणुकीनंतर भाजपच नंबर एकचा पक्ष ठरेल असा विश्वासही व्यक्त केला. त्याचप्रमाणे शिवसेनेशी वैर नाही पण युतीची वेळ आलीच तर पारदर्शकता हाच युतीचा पाया असेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

टीव्ही नाईन मराठी ( बोल महाराष्ट्र )

टीव्ही नाईन मराठीच्या बोल महाराष्ट्र या टॉक शोमध्ये निवडणूक प्रचारातल्या नितीवर चर्चा झाली. “साम, दाम, दंड, भेद” या विषयावर चर्चा झाली. असोसिएट एडिटर निखिला म्हात्रे यांनी या टॉक शोचं सूत्रसंचलनं केलं. यावेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी भाजपनं राज्य सरकारचे उपक्रम पालिकेच्या जाहीरनाम्यात घेतल्याचा आरोप केला. तसंच शिवसेनेचे 120 नगरसेवक निवडून येतील असा दावा त्यांनी केला. त्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेनं भाजपपेक्षा जास्त गुंडांना उमेदवारी दिल्याचा हल्ला वायकरांवर चढवला. तसंच काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्दाच नसल्याची खिल्ली सुद्धा उडवली. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी उपाध्ये यांचा हा दावा खोडून काढत नागपुरात मुन्ना यादवला देण्यात आलेल्या लाल दिव्याच्या गाडीचा मुद्दा उपस्थित केला. चर्चेत सहभागी झालेला काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शिवसेना-भाजपची ही भांडणं नळावरची भांडणं असल्याची खिल्ली उडवली. तसंच पालिकेतल्या शिवसेनेच्या घोटाळ्यांना भाजपचीही साथ असल्याचा दावा केला. तर ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर यांनी निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला,

आवाज महाराष्ट्राचा

साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात संपादक संजय आवटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी मुंबईतील लढाई ही राजकीय चढाओढीची नसून ती फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्यासाठी असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्याचबरोबर जरी भाजप आणि शिवसेनेत वाद दिसत असला तरी सरकारला कुठलाही धोका नसल्याचं सांगायला फडणवीस विसरले नाहीत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेले दावे खरे की खोटे हे लवकरच पुढे येईल असं मत समारोपाच्यावेळी संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केलं.