टीव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट

टीव्ही नाईन मराठी ( बोल महाराष्ट्रा )

टीव्ही 9 मराठीवरील बोल महाराष्ट्रा या टॉक शोमध्ये शुक्रवारी भाजपचा झंझावात या विषयावर चर्चा झाली. यावेळी भाजप प्रवक्ते मधू चव्हाण यांनी भाजपच्या यशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस भूईसपाट झाल्याचा दावा केला. तसंच शिवसेनाही भाजपच्या झंझावातासमोर अपयशी ठरल्याचं वक्तव्य केलं. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं प्रत्युत्तर दिलं तसंच मुंबईत शिवसेनेचाच महापौर होईल असा दावा केला. चर्चेच सभागी झालेले काँग्रेस प्रवक्ते अरूण सावंत यांनी शिवसेना आणि भाजपच्या प्रवक्त्यांना त्यांच्यात सुरू असलेल्या वादाचा जाब विचारला. तसंच सत्तेसाठी दोन्ही पक्ष सर्व काही करत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या लाथाळ्या पाहून मतदारांना त्यांचा निर्णय चुकल्यासारखं वाटत असेल्याचा दावा केला. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम विरोधकाची भूमिका बजावत नसल्यामुळेच भाजपला जास्त फायदा होतोय असं विश्लेषण चर्चेत सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी केलं.

 

जय महाराष्ट्र ( लक्षवेधी )

जय महाराष्ट्रच्या लक्षवेधी या कार्यक्रमात शुक्रवारी ‘युतीचं पण कोणाशी’? या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी आधी भाजप-सेनेनं निर्णय घ्यावा, आम्ही तर थर्ड पार्टी आहोत असं सूचक वक्तव्य केलं. तर शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल असा दावा केला. त्यावर विरोधात बसलो तरी मुंबईकरांची सेवाच करू अस वक्तव्य भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केलं. चर्चेच सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी मात्र सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचं म्हंटलंय. तरी सुद्धा काँग्रेस पक्ष डिसायडींग फॅक्टर राहण्याची शक्यता सुद्धा त्यांनी व्यक्त केलीय.

 

महाराष्ट्र 1 ( आजचा सवाल )

महाराष्ट्र वनच्या आजचा सवाल या कार्यक्रमात चर्चा झाली ती निवडणुकांमध्ये भाजपनं ‘साम-दाम-दंड-भेद’ तंत्र वापरून यश मिळवल्याचा आरोप पटतोय का? या प्रश्नावर. शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपनं सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेचा दुरूपयोग केल्याचा आरोप केला. तसंच पुण्यात संजय काकडेंनी दिलेल्या अचूक अंदाजावर त्यांनी शंका उपस्थित केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सुद्धा नीलम गोऱ्हे यांचीच रि ओढली. भाजपच्या हातात सत्ता देणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं घातकचं आहे.  तसंच पुण्यातील विजय हा भाजपचा नसून तो EVM मशिनचा असल्याचा आरोप केला. आघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ फार लांबल्याचा फटका दोन्ही पक्षांना बसल्याचं त्यांनी मान्य केलं. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या निवडणुकीत झाला इतका सत्तेचा गैरवापर याआधी कधीच झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. मतांसाठी भाजप उमेदवारांनी पैसे वाटल्याचे व्हिडिओही आपण पाहिल्याच त्यांनी सांगितलं. गुडांना सोबत घेऊन भाजप पारदर्शकतेच्या नावाखाली ब्रँडींग कसं काय करू शकतं असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला. तर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी या निवडणुकीत भाजपने केलेल्या खर्चाचा तपशील जाहीर करण्याची मागणी केलीय. या सर्वांच्या टीकेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. लागलेला निकाल न स्वीकारता भाजपवर ताशेरे ओढत बसणे हा लोकशाहीचा अपमान असल्याचं त्यांनी म्हंटलं. तसंच पुण्यातील भाजपचा विजय EVM चा विजय म्हणताय पण, जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक जागा आल्यात. त्याचही श्रेय EVM मशिनलाच देणार का? असा सवाल करून त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या प्रवक्त्यांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला.