टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट

गुरूवार दिनांक ९ फेब्रुवारी २०१७ रोजी मराठी न्यूज चॅनेल्सच्या प्राईम टाईम डिबेट शोमध्ये झालेल्या चर्चांचा सार

झी २४ तास ( रणसंग्राम )

झी २४ तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीला हिणवणाऱ्या काँग्रेसनं राजकीय तत्व आणि मुल्यांना मूठमाती दिल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस शिवसेनेमध्ये झालेल्या जाहीर आघाडीचा तटकरेंनी यावेळी संदर्भ दिला. त्याचबरोबर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही हा दावा सुद्धा केला.

टीव्ही नाईन मराठी  ( बोल महाराष्ट्र )

टीव्ही नाईनच्या बोल महाराष्ट्र या टॉक शोमध्ये शिवसेनेकडून देशात तिसरी आघाडी उभी करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यात भाजप प्रवक्ते प्रविण दरेकर यांनी, शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही असा दावा केला. तसंच सेनेचे 20 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला. त्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत फूट पडणार नाही असं ठासून सांगितलं. वेळ आल्यावर उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. भाजपने भ्रमात राहू नये, असा इशारा सुद्धा दिली. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र ही सेना-भाजपची राजकीय चाल आहे. त्याला मतदार भुलणार नाहीत, असा दावा केला. तर पारदर्शकतेच्या मुद्द्यावर रान उठवणारी भाजप गेली 25 वर्ष महापालिकेत झोपली होती का असा सवाल रिपब्लिकन जनशक्तीचे नेते अर्जून डांगळे यांनी यावेळी केला

महाराष्ट्र वन ( आजचा सवाल )

महाराष्ट्र वनच्या आजचा सवाल या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर जाणीवपूर्वक टीका केलीय का? या प्रश्नावर चर्चा झाली. यावेळी भाजप खासदार अमर साबळे आणि माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांच्यात चांगलाच युक्तीवाद झाली. साबळे यांनी इंदिरा गांधींनी निवडणुकांसाठी कसा नोटबंदीचा निर्णय घेतला नाही याचा उल्लेख करत मोदींच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं. त्यावर माधव गोडबोले यांनी स्वतः इंदिरा गांधी यांचे खसगी सचिव म्हणून काम करत असतांनाचे त्यांचे अनुभव सांगितले. यशवंतराव चव्हाणांनी निश्चलणीकरणाचा पर्याय इंदिरा गांधींना सुचवला होता. पण इंदिरा गांधींनी तो नाकारला. तेव्हा खाजगी सचिव म्हणून गोडबोलेंनी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी यापुढे काँग्रेसला निवडणुका लढायच्या नाहीत का? असा प्रश्न केला होता. ही वस्तुस्थिती असल्याचं गोडबोले म्हणले. त्याचवर काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी नोटबंदीमुळे लोकांना बसलेली झळ मोदी लक्षात घेत नसल्याचा दावा केला. ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांनी काँग्रेसचे चांगलेच वाभाडे काढले. काँग्रेसला नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता हे जनतेला अजूनही पटवून देता आलेले नाही ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली.