टीव्ही प्राईम टाईम रिपोर्ट

बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी २०१७ रोजी मराठी न्यूज चॅनेल्सच्या प्राईम टाईम डिबेट शोमध्ये झालेल्या चर्चांचा सार
( बुधवारी मुंबई महापालिका निवडणुका हाच सर्वांच्या चर्चेचा विषय राहीला )

झी २४ तास ( रणसंग्राम )

झी २४ तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमात बुधवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी, शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असा दावा त्यांनी केलाय. शिवसेनेच्या वाघाच्या तोंडाला रक्त लागलं आहे, त्यांना पैशांची चटक लागली आहे. त्यामुळे सेना ५ वर्ष सत्ता सोडणार नाही असं राणे म्हणालेत. तसंच राज्यात आणि केंद्रात भाजपला कुणी विरोध करू नये म्हणून सेनेला सत्तेतून बाहेर जाऊ देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, बाळासाहेब असते तर त्यांनी धमकी दिली नसती तर ते थेट सत्तेतून बाहेर पडले असते असा टोला सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला आहे.

टीव्ही नाईन मराठी (खासबात)

टीव्ही नाईनच्या खासबातमध्ये मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं होणाऱ्या राजकारणावर चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे हे शिवसेना आणि भाजपवर बरसले. दोन्ही पक्षांनी सातत्यानं भावनिक, अस्मितेचं आणि धर्माचं राजकारण केल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. त्यावर भाजप प्रवक्ते मधु चव्हाण यांनी राम मंदिर ही राष्ट्रीय अस्मिता असल्याचं प्रत्युत्तर दिलं. तसंच विकास लवांडे यांचे मुद्दे खोडून काढले. शिवसेनेच्या आशिष जैस्वाल यांनी मात्र सेना-भाजपमध्ये रंगलेल्या वाक् युद्धाला भाजपला जबाबदार धरलं. तर मनसेच्या संतोष धुरी यांनी भाजपचा वचननामा म्हणजे थापानामा असल्याचा आरोप केला.

जय महाराष्ट्र ( लक्षवेधी )

जय महाराष्ट्रच्या लक्षवेधी या कार्यक्रमात बुधवारी चर्चा झाली ती राज्य सरकारच्या भवितव्यावर. मुख्य म्हणजे सर्व पत्रकारांनी मिळून ही चर्चा केली. चर्चेच्या सुरूवातीला संपादक नीलेश खरे यांनी नोटीसीची भाषा म्हणजे शिवसेनेचं गुरगूरणं आहे का? तसंच यावरून मुंबई ही शिवसेनेच्या वाघाचा इकाला आहे, असं सांगण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. हे मुद्दे मांडले. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत असल्याचं म्हंटलं. तर सेनेसाठी मुंबई महापालिका निवडणूक ही ‘करो या मरो’ असल्यावर सर्वांच एकमत झालं. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी भाजपनं सेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे का मागितले नाहीत? असा सवाल उपस्थित केला. त्यावर नागपूर तरुण भारतचे कार्यकारी संपादक बबन वाळके यांनी “राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रु किंवा मित्र नसतो“ असं विधान करुन तर्क-वितर्कांना उधान आणलं. तर लवकरच प्रकाशित होऊ घातलेल्या सरकारनामाचे पुणे प्रमुख योगेश कुटे यांनी ‘शिवसेना आज आणि काल’ याचं विश्लेषण करत चर्चेत रंगत आणली. राज्य सरकार स्थापनेच्या वेळी शिवसेनेत फूट पडण्याची भीती होती, पण, आता मात्र तशी स्थिती नाही याचं विश्लेषण कुटे यांनी केलं. तर सुनील तांबे यांनी राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील असं भाकीत वर्तवल.

महाराष्ट्र वन ( आजचा सवाल )

महाराष्ट्र वनच्या आजचा सवाल या कार्यक्रमात बुधवारी सेना-भाजपच्या जाहिरनाम्यांमधून मुंबईचे प्रश्न सुटतील का? या विषयावर चर्चा झाली. चर्चेच्या सुरूवातीलाच शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपचा जाहिरनामा म्हणजे धमकीच असल्याचा आरोप केला. त्यावर मुंबई भाजपचे सचिव समीर देसाई यांनी जोरदार आक्षेप घेतला. मुंबईकरांनाच वाटत असेल भ्रष्टाचार झालाय तर त्याला धमकी म्हणून घेणार असाल तर संशयाला जागा आहे असं बोलून देसाई यांनी गोऱ्हे यांना प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी गोऱ्हेंनी नागपूर महापालिक आणि कलंकीत मंत्र्यांचा मुद्दा काढून भाजपच्या वर्मावर बोट ठेवलं. त्यावर एसआयटीबाबत राजकारण नसल्याची सारवासारव देसाई यांना करावी लागली. काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी भाजपच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. तसंच मुंबईला पाटणा संबोधून मुंबईकरांचा अपमान करण्यापेक्षा नागपुरात जाऊन राहा असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मात्र ब्लॅक लिस्टेट कंत्राटदारांचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून चर्चेला गंभीर स्वरूप दिलं. पालिका आणि राज्य सरकार दोघेही ब्लॅक लिस्टेट कंत्राटदारांना कसे कंत्राटं देतात याचा पाढाच त्यांनी वाचला. ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग म्हस्के यांनी सर्व पक्षांकडे भ्रष्टाचार नेमका कसा थांबवणार, त्यावर उपाययोजना काय ते आधी लोकांना सांगा, अशी मागणी केली.