टिव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट

झी 24 तास (रोखठोक)
झी २४ तासच्या रोखठोक या कार्यक्रमात कर्जमाफीनं प्रश्न सुटेल का? या विषयावर झाली. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती संशोधनाकडं पुरेशा गांभीर्यानं लक्ष दिलं जात नाही. शेतक-यांना तांत्रिक पाठबळ देण्यात सरकार कमी पडतं. तंत्रज्ञानासोबत पायाभूत सुविधांची जोड नाही, बाजारपेठांची सुविधा नाही. त्यामुळं शेतीचा उत्पादन खर्च वाढतो. कधी शेतक-याला जास्त भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली तर ग्राहक हिताच्या नावाखाली सरकार हस्तक्षेप करतं. सरकारनं वा-यावर सोडल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलेत. कर्जबाजारी झालेत, असा मुद्दा खासदार राजू शेट्टींनी मांडला. तुरीमुळं निर्माण झालेल्या अडचणीच्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस सरकारनं 23 लाख क्विंटल तूर खरेदी करून शेतक-यांना कसा आधार दिला, याचं कौतुक पाशा पटेलांनी केलं. मुळात शेतक-यांच्या प्रश्नावर राजकारण सुरू असून, राजकीय पक्षांच्या कुरघोडीत शेतक-यांचा फुटबॉल झालाय. शेतक-यांच्या कर्जमाफीनं प्रश्न सुटणार नसला तरी कर्जमाफीशिवाय दुसरे पर्याय निर्माण होणार नाहीत, याकडं विजय जवंधिया यांनी लक्ष वेधलं. शेती उद्योगाची अवस्था बिकट असून, सरकारच्या वित्तीय परिस्थिती ढासळलीय. कर्जबाजारी असलेलं राज्य 30 हजार कोटींचा कर्जमाफीचा बोजा सहन करू शकेल का, अशी शंका अभय टिळक यांनी उपस्थित केली. सातव्या वेतन आयोगासाठी 15 हजार कोटींचा बोजा सरकार सहन करतं, मग शेतक-यांना कर्जमाफी दिल्यानं कोणतं आभाळ कोसळणार आहे? असा सवाल जवंधियांनी यावेळी केला.
टीव्ही 9 मराठी
tv9 मराठीच्या महाराष्ट्राला उत्तर हवंय या टॉक शोमध्ये, श्रेयाची शर्यत या विषयावर चर्चा झाली. असोसिएट एडिटर निखिला म्हात्रे यांनी या टॉक शोचं सूत्रसंचलन केलं. खासदार राजू शेट्टी, भाजप आमदार अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यात सहभागी झाले होते. कर्जमाफीशिवाय पर्याय नसल्याचं राजू शेट्टी यानी निक्षूण सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार यावेळी भाजपवर तुटून पडले. भाजप कर्जमाफीला का वेळ लावतंय, असा प्रश्न त्यांनी केला. बच्चू कडू यांनी शेतक-यांची स्थिती किती दयनीय झालीय, याची माहिती यावेळी दिली. तर शेतक-यांना सक्षमही करू आणि कर्जमाफीही देवू, असा दावा अनिल बोंडे यांनी केला.

साम (आवाज महाराष्ट्राचा)
कर्जमाफीने शेतकरी आत्महत्या थांबतील का या विषयावर सामच्या आवाज महाराष्ट्राचा मध्ये चर्चा झाली. याचं सुत्रसंचलन वरिष्ठ निर्माता दुर्गेश सोनार यांनी केलं. शेतमालाचे बाजारभाव पाडणे, बाजारात हस्तक्षेप करणे, हमीभावाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करणे यासारख्या गोष्टी सरकारने टाळाव्यात. सरकारने मूलभूत सोईसुविधा निर्माण करण्याकडे लक्ष द्यावे. यासाठी बराच काळ लागणार आहे. पण धोरणात्मक दिर्घकालीन निर्णय गरजेचे आहेत असं दै. अँग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले. सरकारनं केवळ कर्जमाफी करुन थांबू नये, कर्जमाफी तर द्यावीच पण शेतमालाला हमीभाव, नव्याने कर्जपुरवठा, शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण करणे थांबवावे अशी मागणी शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे यांनी केली. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. जलयुक्त शिवारच्या नावाखाली केवळ फसवणूक सुरु आहे. राज्यात एकही गाव जलयुक्त झालं नाहीए असा आरोप चर्चेवेळी काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी केला.
अजीत पवारांनी पहिल्यांदा कर्जमाफीचा मुद्दा पुढं केला. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय असंवेदनशील आहे. त्यामुळंच शेतकऱ्यांचे जीव जात असताना हे सरकार कर्जमाफीसारखा महत्वाचा निर्णय घेतानाही चालढकल करत आहे असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांचं म्हणणं आहे. भाजप सरकार अतिशय चांगलं काम करतंय. दुष्काळ हटवण्यासाठी जलयुक्त शिवारचं काम करत येत्या ५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं सरकारचं धोरण. तुरीची हमीभावानं खरेदी सुरु आहे. सरकार योग्यदिशेनं काम करतंय असं म्हणत भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी सरकारवरचे आरोप खोडून काढले. शिवाय शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी राजकारण थांबवून आपण सगळे पक्ष एकत्र येऊ भाजपला साथ द्या अशी सादही त्यांनी घातली.