क्लिक करा आणि चुना लावून घ्या !

188

फेसबूक आणि सोशल मीडियावरच्या लाईक करून पैसे कमावण्याच्या नादात ७ लाख लोकांनी स्वतःची फसवणूक करून घेतलीय. यूपी पोलिसांच्या स्पेशल टास्ट फोर्सनं एका रॅकेटचा भांडाफोड केलाय.  त्यात सात लाख लोकांकडून या रॅकेटनं तब्बल ३७०० कोटी रुपयांची माया कमावल्याचं उघड झालंय.

प्रत्येक लाईक मागे पाच रुपये देतो असं सांगून ऍब्लाझ इन्फो सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं या लोकांची फसवणूक केली. समोरची कंपनी आम्हाला प्रत्येक लाईक मागे सहा रुपये देते असा दावा ही कंपनी लोकांकडे करायची. पण, हे पैसे कमावण्यासाठी आधी काही पैसे गुंतवावे लागतील असं या कंपनीकडून सांगितलं जायचं. त्यासाठी ५,७५० ते ५७,५०० रुपयांपर्यंत पैसे आकारले जात होते. अधिक पैसे कमावण्यासाठी लोकांनी हे पैसे भरले सुद्धा. पण, ही कंपनी लाईक करण्यासाठी पाठवत असलेल्या लिंक खोट्या असल्याचं लक्षात आल्यानंतर काही लोकांनी तक्रार केली.

त्यानंतर यूपीच्या स्पेशल टास्ट फोर्सनं कंपनीचा संचालक अनुभव मित्तल, सीईओ श्रीधर, टेक्निकल हेड महेश दयाळ यांना अटक केलीय. तसंच कंपनीचं बँक खातं सील केलंय. ज्यात ५०० कोटींची रक्कम जमा आहे. पोलीस सध्या त्याचा अधिक तपास करत आहेत.