कासवांची बिनबोभाट तस्करी

3760

लहाना-थोरांपासून सगळ्यांनाच कासव या प्राण्याबद्दल कुतूहल असतं. मी लहानपणी सार्वजनिक विहिरीतील कासव तासनतास बघत बसायचो, तो कासव पाण्याखाली गेला की तो कधी बाहेर येतो त्याची वाट बघायचो. पावसाळ्यात तर अगदी नाल्यांमध्ये कासवांची पिल्लं सापडायची, मग आम्ही लहानगी पोरं ती कासवांची पिल्ल पकडायचो आणि जवळपासच्या विहिरींमध्ये टाकायचो. पण आज कळतं की विहिरीत कासव टाकणे म्हणजे त्या कासवाला आजीवन कारावासाची शिक्षा होय. मुळात विहीर म्हणजे एक भला मोठा पिंजरा असतो त्या कासवांसाठी.

१९९० साली संपूर्ण महाराष्ट्रात सर्पमित्र चळवळीला प्रा. श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने अथक परिश्रम करून वेग आणला व सापांबद्द्लच्या अनेक अंधश्रद्धा लोकमनातून नष्ट केल्या. याच संधानात वन्यजीवांबद्दलच्या अनेक अंधश्रद्धांबाद्द्ल असलेल्या अधोरेखित मुद्द्यांना हात घातल्या गेला. पण अजूनही विदर्भात वन्यजीवांबद्दलच्या अनेक अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत. कासव हा देखील त्यातलाच एक वन्यजीव. जो रोज शेकडोंच्या संखेने या अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या मानवांकरवी बळी जातोय.

कासव कुठे राहतो, असे विचारल्यास बहुतांश लोकांचे उत्तर असणार की कासव विहिरीत, तलावात आणि नद्यांमध्ये आढळतो. पण साधारणपणे कासवांना आपण तीन प्रकारात विभागू शकतो, पाण्यात राहणारे (Turtles), जमिनीवर राहणारे (Tortoise), आणि पाणी व जमीन दोन्हीवर वावर करणारे (Terrapians). विदर्भातमृदु कवचाचा सामान्य कासव (Indian Flap shelled turtle), गंगेचा मृदु कवचाचा कासव (Ganges softshelled turtle), फंगशूराटेकटा (Terrapian), चांदणी कासव (Starred Tortoise) इत्यादी प्रकारचे कासव आढळतात.

कासवांचे मांस खाल्ल्याने वाताचे आजार बरे होतात, घरात रोगराई व साठीचे आजार येत नाही अश्याप्रकारचे भ्रामक गैरसमज विदर्भात असल्याने काही विशिष्ट जमातीचे लोक मोठ्या प्रमाणावर कासवांची शिकार करतात व जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आंबट शौकिनांना पुरवतात. एकीकडे मानवाच्या अघोरी इच्छापूर्तीसाठी दररोज शेकडो कासवांचा बळी जातोय, काही कासव मानवाच्या गैरसमजांमुळे आजीवन कारावास भोगत आहेत. तर दुसरीकडे याच कासवांना गुप्त्धानाचे शोधक समजून २० नखी, २१ नखी सांगून यांची अवैध तस्करी व व्यापार केला जातोय. परिणामतः अतिछळ करून त्यांचा बळी दिला जातोय. यातच भर ते काही लोकांना या प्राण्याला पाळण्याचा छंद जडला आहे. हजारो कासव उत्तर प्रदेशातून त्यांच्या नैसर्गिक आवसातून पकडले जातात आणि अतिशय क्रूर पद्धतीने बंदिस्त करून कधी मुंबईमार्गे तर कधी नागपूरमार्गे विदेशात पोहचवले जातात.  अगदी काही दिवसांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकावर एका रेल्वेतून २ कासव तस्करांना नागपूर पोलीस व नागपूर वनविभाग यांनी अटक केली होती. त्या तस्करांकडून दोन बॅग जप्त करण्यात आल्या. त्या बॅग मधून तब्बल १०० Spotted pond terrapians जातीचे कासव जप्त करण्यात आले होते. हे कासव तस्कर प्रत्येकवेळी वेगवेगळी पद्धत वापरून कासवांना छुप्या मार्गाने ठरलेल्या जागेपर्यंत पोहचवत असतात, यावेळी त्यांनी प्रत्येक कासव सॉक्स मध्ये घालून आणला होता अश्यातच श्वास गुदमरून त्यातले कित्येक कासव मृत्यूमुखी पडले होते.

विदर्भात प्रामुख्याने ढीवर जमातीचे लोक मास्यांसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेले कासव पकडतात. पण गेल्या काही वर्षात फक्त कासवांच्या शिकारीसाठी विशेषकरून फिरणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात असणाऱ्या इटीयाडोहजवळच्या बंगाली लोकवस्तीत मुख्यत्वे कासव शोधण्यासाठी व पकडण्यासाठी एकप्रकारचे कासवशोधयंत्र वापरल्या जाते, काहीसे त्रीशुलासारखे भासणारे हे यंत्र लोखंडी सळाखींनी बनलेले असून नदी नाल्यांचे पाणीकमी झाल्यावर तळाच्या रेतीमध्ये किंवा चिखलामध्ये हे यंत्र खुपसून-टोचून त्या भागाची पाहणी केली जाते. जिथे कासव आत लपलेला असतो तिथे या सळाखी कासवाच्या पाठीवर आदळून ट्क असा आवाज होतो तेव्हा लगेच तिथे हात घालून त्या कासवाला पकडल्या जाते. राज्यात अनेक भागात अश्याप्रकारच्या उपकरणांचा आणि तत्सम प्रकारच्या सापळ्यांचा वापर अगदी बिनधास्तपाने केल्या जातो. वनविभागाने स्व:ताची जबाबदारी जाणून अश्याप्रकारच्या घटनांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.

कासव शिकार व तस्करीत भारतात बंगाल तर जगात चीन पुढे आहे. मुंबईत आजवर कित्येक तरुण-तरुणी कासव तस्करी करतांना पकडल्या गेले आहेत. पण गुन्हे अन्वेषनात दुबळे असलेले आपल्या वनविभागाच्या उदासीन धोरणामुळे त्या तस्करांची जमानत होते व मग ते पुन्हा कधीही अवतरत नाहीत. एकंदरीतच विदेशी व्यक्तींनी भारतात कासवांची तस्करी केल्यास काहीही फरक पडत नाही, असे काहीसे चित्र तयार झाले आहे. बंगालमध्ये तर तथाकथित औषधी बनविण्यासाठी मृदु कवचाच्या कासवांना त्यांच्या पाठीचा किनारीचा नरम असलेला ज्याला इंग्रजीत क्यालीपी म्हणतो तो भाग कासव जिवंत असतांना कापण्यात येतो. त्यानंतर तो कापलेला भाग पाण्यात उकळतात व मग वाळवून त्याची भुकटी तयार करतात या भुकटीचे नियमित सेवन केल्यास म्हणे मनुष्य चिरतरुण राहतो. त्याची मर्दांनकी कायम राहते व वाढते इत्यादी. या सर्वाला काहीही वैज्ञानिक आधार नसतांना केवळ लोकांना फसवून पैसे कमावण्याच्या उद्देशाने या निष्पाप जीवांचा बळी घेतला जातो.

अतिपाणी प्रदूषणामुळे कासवांची निवासस्थाने संपुष्टात आली आहेत. बीज प्रसारण, इतर प्रजातींच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, मेलेल्या कुजलेल्या प्राण्यांना व वनस्पतींना खाऊन निसर्ग स्वच्छ ठेवणे, ज्यामुळे शेकडो प्रजातींसाठी नवी निवासस्थाने तयार होतात. असे एक न अनेक प्रकारचे महत्वाचे कार्य बजावत असलेले कासव आज अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

कासव, इतर म्हणजे बकरी, कोंबडी, मासोळ्या, डुक्कर या प्राण्यांसारखा प्रजनन करीत नाही. त्यांचे प्रजनन पोल्ट्रीफार्मसारखे यशस्वीरित्या केल्या जाऊ शकत नाही. कासवांना लैंगिकदृष्ट्या परिपक्व होण्यास १० ते ३० वर्ष सुद्धा लागतात. ते त्या-त्या प्रजातीवर अवलंबून असते. एक पूर्ण वाढ झालेला कासव ज्यावेळी निसर्गात पकडून तो खाण्यासाठी विकल्या जातो, खाल्ला जातो तेव्हा त्या एकाची निसर्गातून रिक्त झालेली जागा भरून निघण्यासाठी कित्येक वर्ष लागतात. आज ज्या गतीने आपण निसर्गातील कासव संपवतोय, त्या गतीने कासवांचे निसर्गात प्रजनन शक्य नाही. एकंदरीतच जगातील सर्वात जास्त कासवांच्या जाती आपल्या भारतात आहेत. पण यातील बहुतांश जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या परिशिष्ट एकच्या भाग दोननुसार भारतातील प्रत्येक कासव अनुसूची एकमध्ये संरक्षित केला गेला आहे. या कायद्याचे उल्लंघन करून कासव पाळणे, शिकार करणे, तस्करी करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ३ ते ७ वर्षाचा कारावास आणि २५,००० रुपये दंड अशी जबर शिक्षा आहे.

 

पराग दांडगे,

एन्वार्मेटल रिसर्च & कन्झर्वेशन सोसायटी, इंडिया – www.ratva.in