एक नवेली नार…तिचे कपडे हजार..

1336
images

ती आली… तीनं पाहिलं.. आणि ती बदलली… बदलतच राहिली.. होय, ही गोष्ट जराशी वेगळी आहे. ती आली तशी नव्या जमान्यातील  म्हणूनच.. पण तिचे पोशाख आणि पारंपरिक पेहरावातलं तिचं सालस वागणं लोकांना आवडायचं.

ती राज्यातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या बंगल्यात रहायला गेली. तसं तिचं वागणं अधिकच खुललं, मुक्त झालं. ती पॉवरफुल वूमन आहे असाच तिचा लौकिक झाला.कारण ती राज्यातल्या एका बड्या जंटलमन माणसाची पत्नी आहे.. ती व्यवसायानं बॅंकर आहे. पण तिला कधी गाताना, कधी रॅम्पवर वॉक करताना तर कधी भाषणं देताना आपण पाहिलंय. तिची विविध पण बिनधास्त रूपं आहेत. या सगळयात अधिक उठून दिसतं ते तिचं कपड्यांचं वेड… नव्या जमान्यातील अगदी सिने कलावंतांना लाजवतील असे तिचे कपडे असतात. ते ही फॅशन डिझायनरने डिझाईन केलेले. इंडस्ट्रीतला नवा ट्रेंड हल्ली तिच्या कपड्यांकडे पाहूनच कळतो, असे या क्षेत्रातले जाणकार सांगतात. ती दररोज नवनविन कपडे परिधान करते. यात लॉंग कुर्ती, चायनीज नेकचे भरजरी कपडे, भरजरी साड्या अशा कपड्यांचा समावेश असतो. पण तरीही ती सतत कपडे शोधते. कारण तिला आहे नाविन्याचा सोस.. काय अजूनही लक्षात आले नाही…अहो, आपल्या अमृता फडणवीस  यांच्याबद्दल बोलतोय आपण. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे भले देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली असतील पण ऐट आहे ती अमृता फडणवीस यांची. डिझाईन केलेली उंची वस्त्रे केवळ परिधान करून चालत नाही तर ती शोभावी पण लागतात. अमृता फडणवीस नक्कीच या कपड्यांना न्याय देतात. उगाच नाही त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर शंभर दिवसांत सामान्य माणसाला स्वप्नातही न परवडणारे दिडशे डिझायनर ड्रेस पहायला मिळत.

अहो, मॅक्समहाराष्ट्र ने मिसेस सीएम अमृता फडणवीस यांचे ट्विटर अकाउंट ट्रॅक केले तर शंभर दिवसांत त्यांनीच पोस्ट केलेल्या विविध फोटोंच्या माध्यमातून १५० डिझायनर कपड्यांचा हा अमूल्य वॉर्डरोब पहायला मिळाला. यापैकी कोणता ड्रेस कोणत्या डिझायनरचा असावा, याचा त्या कपड्यांकडे पाहिल्यावर सहज अंदाज बांधता येतो.

( ग्राफिक्स-मुजम्मिल करजगी ) कपडेपट पाहण्यासाठी झूम करा

असो, राज्यात यंदा पाऊसकाळ बरा झालाय, शेतकरी राजा सुखात असावा. ऐश्वर्या आणि जया या बच्चन सासू सुनेने एकच साडी आलटून पालटून नेसल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. ते खरे असतील तर एवढ्या मोठ्या सेलिब्रिटींनाही साड्यांचा मोह सोडवत नाही तिथे अमृताबाईंची तर बातच न्यारी. अमृता फडणवीस आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका नृत्याच्या अदावरून तर केवढा गहजब माजला होता. एकुणच काय तर अमृता फडणवीस यांचा सिनेइंडस्ट्री आणि फॅशनच्या जगतातला लिलया वावर सामान्य माणसाला थक्क करणारा आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या क्रांतीकारी निर्णयानंतर शेतक-याच्या बांधावर वायफाय पोहोचले असल्याने तो कॅशलेस व्यवहाराच्या माध्यमातून आपल्या शेताच्या तुकड्यात खते आणि बियाणे मागवण्याच्या विचारात असल्याचा साक्षात्कार या सरकारला झाला तर नवल नाही. वास्तविक शेतमजूराला रोजची मजूरी मिळणे दुरापास्त झाल्याने कपडेच काय त्याला रोजच्या पिठामिठाची भ्रांत पडली आहे. पण जाऊ द्या, एकुणच सगळं आलबेल असल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने एवढे खूष आणि ट्रेंडी व्हायला काय हरकत आहे. हजारो रूपयांचे डिझायनर ड्रेस दररोज, कधी कधी दिवसाला दोन दोन बदलल्यानं काय फरक पडणार आहे. नाविन्याची ओढ आणि जाण असलेल्या लोकांची रूची लोकलमधून धक्के खाणा-या बाईला काय कळणार. अमृताबाई मात्र शोधत असतात रोज नविन कपडे….

ती कांदापोह्यात अडकली नाही—शायना एन सी

चुल आणि मुल ही बाईची ओळख कधीच मागे पडलीय. सर्वच क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी केवळ अशी ओळख न मिरवता  अमृता फ़डणवीस यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आणि ती जपली, असे भाजपाच्या नेत्या आणि नामांकित ड्रेस डिझायनर  शायनाएन सी सांगतात. केवळ कांद्यापोह्यांपूरती महिलेची असलेली ओळख पुसून बॅंकिंग आणि फॅशनच्या क्षेत्रातही अमृता यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांना लॉंग कुर्ती, चायनीज नेकच्या कुर्तीज तसेच विशेष डिझाईन  केलेले शॉर्ट कपडेही फार आवडतात. या शानदार कपड्यांच्या आउटफिटसाटी अमृता यांनी आपले  वजनही घटवले आहे. कपड्यांच्या निवडीबाबतीत त्या फार चोखंदळ आणि आग्रही असल्याचे शायना सांगतात. मात्र,या कपड्यांच्या किंमतीबाबत बोलायला शायना फारश्या उत्सुक नाहीत.

अमृता प्रतिमा जपण्यात यशस्वी – निशा जंबवाल

एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची सार्वजिनक जीवनातील प्रतिमा जशी असायला हवी तशी पहिल्यांदाच अमृता फडणवीस यांच्या माध्यमातून पहायला मिळते आहे. त्यांना कपड्यांची हौस आहे आणि फक्त हौसच नाही तर जाणही आहे. त्यांचे कपडे दररोज नवे पहायला मिळतात. त्यात नाविन्य आहे. पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांनी भारतीय संस्कृंतीतील कपड्यांची निवड करून त्यांच्यात काही स्वागतार्ह बदल करून त्यांना नव्या रूपात सादर केले आहे. विशेष म्हणजे हे कपडे त्या अतिशय सहजतेने कॅरी करतात. त्या तरूणांपुढे रोल मॉडेल म्हणून येताहेत. त्यामुळे ही अतिशय चांगली बाब आहे. त्या दररोज नवे कपडे परिधान करून आपला चोखंदळपणा सिद्ध करताहेत. त्यांच्या कपडे नक्कीच भारी किंमतीचे आहेत. डिझायनरने तयार केलेले असल्याने नक्कीच किंमती आहेत. त्यांचा आकडा नक्की सांगता येणार नाही.

कपड्यांत अडकलेले राजकारणी –

खरं तर महात्मा गांधींचा राजकीय वारसा सांगणारा आपला देश. देशातल्या कोट्यवधी लोकांना अंगभर कपडे मिळत नाहीत याच्या दुखाःतून गांधीजींनी आयुष्यभर अर्धेच कपडे घातले. केवळ पंचा नेसला. पण त्यांच्याच पक्षातील शिवराज पाटील चाकुरकर या नेत्याला कपड्यांचा मोह सुटला नाही. सकाळी दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या कपड्यांत चाकुरकर पहायला मिळायचे. अर्थात सगळे कपडे भरजरी देशावर कितीही मोठे संकट आले तरी त्यांच्या कपड्याची घडी कधी मोडली नाही, पण योग्य वेळ येताच अशा नेत्यांचे कपडे उतरवायला जनता विसरत नाही. आता ज्यांनी गांधी पळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी त्यांचे विचार पळवले नसल्याने ते कपड्यांच्या मागे लागले आहेत. देशाचे पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने लाखो रूपयांचा कोट परिधान करून आपली हौस भागवावी, त्यावर आपल्याच नावाची अक्षरे कोरून घ्यावीत यासारखे वैषम्य काय. ५६ इंचाची छाती झाकण्यासाठी नवनविन कपड्यांवरील लाखो रूपयांची उधळपट्टी नरेंद्र मोदींना यापुढेही अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही.