अन्नदात्यासाठी राज्यभरात अन्नत्याग

शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न घेऊन रविवारी राज्यभरात अन्नत्याग आंदेलन केलं जात आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी यामध्ये सहभागी झाली आहेत. किसानपुत्रांबरोबरच डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार, नोकरदार अशा अनेक मंडळींनी आज अन्नत्याग केला आहे. ‘अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग’ असं आवाहन समाजातील सर्व लोकांना करण्यात आलं आहे. त्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, यवतमाळ, सांगली या सारख्या मोठ्या शहरांसह छोटी शहरं आणि गावांमध्ये सुद्धा लोकांनी या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला आहे.

सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचे फोटो तसंच स्टेट्स अपलोड केले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या पोस्ट सुद्धा अनेकांनी लिहील्या आहेत. शेतकऱ्यांना मारक ठरणारे कायदे, आत्महत्या, कर्जबाजारी, योग्य भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी अशा अनेक मुद्द्यांवर लोकांनी त्यांची मतं या निमित्तानं सोशल मीडियावर लिहीली आहेत.

आजच्या दिवशी ३१ वर्षांपूर्वी राज्यात पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. शेती करणं परवडत नाही म्हणून यवतमाळ जिल्ह्यातल्या महालगाव तालुक्यातल्या साहेबराव पाटील करपे यांनी आत्महत्या केली होती. पत्नी आणि चार मुलांसह वर्ध्याच्या दत्तपूर येथील मनोहर कुष्ठधामात त्यांनी ही आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातल्या या पहिल्या शेतकरी आत्महत्येनं संपूर्ण राज्य हादरून गेले होते.
सध्याच्या घडीला ३१ वर्षांनंतर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या करून त्याचं जीवन संपवलं आहे. त्याला अनेक कारणं आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे शेतकरी विरोधी कायदे आणि सरकारची शेती आणि शेतकऱ्यांबाबत असलेली अनास्था. याचा मुद्द्यांना हात घालण्यासाठी हे अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे.

यवतमाळ येथे अमर हबीब अन्नत्याग आंदोलन करताना
औरंगाबाद येथे अन्नत्याग आंदोलन करतांना कवी दासू वैद्य, कैलास इंगळे, श्रीकांत उमरीकर आणि इतर नागरीक
जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी लातूर येथील अन्नत्याग आंदोलनात सहभाग नोंदवला
जळगावातही अन्नत्याग
आंदोलन करण्यात येत आहे
पुण्यातही मोठ्या संख्येने नागरिकांनी अन्नत्याग आंदोलन केले
सांगली