Home > मॅक्स किसान > अंडी महागली!

अंडी महागली!

अंडी महागली!
X

उत्पादन वाढल्यास गेल्या वर्षाप्रमाणेच या वर्षीही नुकसान होईल या भितीपोटी देशभरातील पोल्ट्रीधारकांनी अंड्यांचे उत्पादन मर्यादीत केल्यामुळे यंदा हिवाळ्याच्या सुरुवातीलाच अंड्याच्या किंमतीत तब्बल ४० टक्के दरवाढ झाली असून पुढील काही महिन्यांपर्यंत अंड्यांचे दर चढेच राहणार असल्याची माहिती पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश खत्री यांनी दिली आहे.

या वर्षी हिवाळा सुरू होताच अंड्यांच्या दरात ४० टक्के दर वाढ झाली आहे. देशभरातील किरकोळ बाजारांमध्ये सध्या एका अंड्याचा दर सात ते साडेसात रुपये इतका आहे. अंड्यांचे उत्पादन घटल्यामुळे दरात ही तेजी आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २५ ते ३० टक्के कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी याच काळात अंड्यांचे मुबलक उत्पादन झाले होते मात्र त्यांना योग्य भाव न मिळाल्यामुळे अनेक पोल्ट्रीधारकांचे मोठे नुकसान झाले होते. या वर्षीही तसेच नुकसान परत होण्याच्या भीतीने पोल्ट्रीधारकांनी उत्पादन मर्यादीत ठेवल्यामुळे अंड्यांच्या दरात तेजी आली आहे. सन२०१६-१७ मध्ये मुबलक उत्पादन झाल्यामुळे अंड्याला घाऊक बाजारात केवळ ४ रूपये दर मिळाला होता. त्याउलट एका अंड्याच्या उत्पादनासाठी साडेतीन रूपये खर्च झाला होता. तो तोटा लक्षात घेऊन या वर्षू उत्पादन कमी करण्यात आले आणि त्यामुळे अंड्यांचे दर वाढले असल्याची माहिती खत्री यांनी दिली. सरकारी आकडेवारीनुसार सन २०१५-१६ मध्ये देशभरात ८३ अब्ज अंड्यांचे उत्पादन झाले होते तर गेल्या वर्षी त्यापेक्षाही जास्त उत्पादन झाले होते.

Updated : 21 Nov 2017 10:12 AM GMT
Next Story
Share it
Top