…तर चंद्रकांत पाटील यांच्याकडून औषध खरेदी करणार- हसन मुश्रीफ

66

कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधावरुन सध्या राज्यात राजकारण पेटले आहे. सरकार हे औषध मोफत न देता विकत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्याला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथीक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदीक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर भाष्य केले आहे.

त्यांनी केलेले भाष्य पुर्णत: चुकीचे असून लोकांची दिशाभूल करणारे आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. त्यांच्या चुकीच्या भाष्यामुळे शासनाची बदनामी झाली असून याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली आहे.

औषध खरेदीचे सर्व अधिकार जिल्हा परिषदांना

दरम्यान या औषध खरेदीचे सर्व अधिकार जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. पण असे असतानाही चंद्रकांत पाटील यांनी बाजारात २ रुपये दराने मिळणारे अर्सेनिक अल्बम ३० हे औषध ग्रामविकास विभागाने राज्यस्तरावर २३ रुपये दराने खरेदी केल्याची चुकीची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये सांगून जनतेची दिशाभूल केली आहे.

वास्तविक पाहता अशी कोणतीही खरेदी राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने केलेली नाही. पाटील हे २ रुपये दराने हे औषध उपलब्ध करुन देणार असल्यास जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्याशी संपर्क साधून औषध खरेदी करावे असा टोलाहा हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

Comments