Home > मॅक्स किसान > गडकरीजी हाच न्याय शेतकऱ्यांसाठी ही लावला तर ?

गडकरीजी हाच न्याय शेतकऱ्यांसाठी ही लावला तर ?

गडकरीजी हाच न्याय शेतकऱ्यांसाठी ही लावला तर ?
X

नवीन पीक कर्जाच्या वाटपाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तुकाराम वैजनाथ काळे यांचा काल मृत्यू झाला. एकीकडे शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही म्हणून शेतकरी उपोषणाला बसतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो तरीही सरकारच्या एकाही मंत्र्यांला यावर कुठलीच प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही. तर दुसरीकडे भारतीय बॅंकांना तब्बल ९ हजार कोटींचा चुना लावणारा विजय माल्ल्या नितीन गडकरी यांना चोर वाटत नाही, तसं वक्तव्यच त्यांनी केलं आहे. कर्जबुडव्या विजय माल्ल्याल्या चोर म्हणणे चुकीचे आहे, असं मत त्यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर गडकरी यांनी माल्ल्याचा ‘माल्ल्याजी’ असा उल्लेख केला आहे. “विजय माल्ल्या 40 वर्ष नियमितपणे कर्ज फेडत होता, व्याजही भरत होता. 40 वर्षांनंतर जेव्हा तो एव्हिएशन अर्थात हवाई उद्योगात आल्यानंतर, त्याच्या समस्या वाढल्या. मात्र याचा अर्थ असा होत नाही की तो चोर झाला. जो 40 वर्ष व्याज भरतो, त्याने एकदा चूक केल्याने तो फ्रॉड झाला? चोर झाला? ही मानसिकता चुकीची आहे.”

आता, माझाही गडकरी यांना तोच सवाल आहे. शेतकरी प्रत्येक वर्षी त्याचं कर्ज 'नव जुनं’ (मागच्या वर्षीचं व्याज भरुन) पुढील वर्षासाठी कर्ज घेत असतो. कधी कधी पाऊस कमी जास्त झाला तर कर्जाचं थोडं फार मागं पुढं होतं. जसं माल्ल्याचं झालं. आणि मल्ल्याजींसारखा कर्ज म्हणून घेतलेला पैसा तो दुसऱ्या धंद्यात न वळवता शेतीत खर्च करतो. मात्र, तो तुमच्या प्रामाणिक माल्ल्याजीसारखा पळून जात नाही. त्याला त्याची काळी आई सोडून पळून जावं वाटत नाही. त्या काळ्या आईची सेवा करता करता जीव जातो. तरी तो आपली काळी आई सोडून पळून जात नाही. बॅंकेचं, सावकाराचं कर्ज त्याला झोप येऊ देत नाही. बॅंकेत गेला तर बॅंकेच्या दारा शेजारी लावलेला फोटो त्याला कर्जबाजारी असल्याचा दाखला देतो.

शेतकरी तुकाराम वैजनाथ काळे हे देखील बॅंकेचे कर्जदारचं होते. त्यांना नवीन पीक कर्ज हवं होतं त्या मागण्यासाठी ते उपोषणाला बसले होते. मात्र, कदाचित ते माल्ल्याजी सारखे गर्भ श्रीमंत कर्जदार नव्हते. त्यामुळे तुमचं कदाचित त्यांच्याकडे लक्ष गेलं नसेल. मात्र, ज्या पद्धतीने तुमचं माल्याच्या कर्जाकडे लक्ष गेलं त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या कर्जाकडे गेलं असतं तर आज तुकाराम जीवंत असते. तुकाराम यांच्यासारखे अनेक शेतकरी आज जीवंत असते. त्यामुळे अजुनही वेळ संपलेली नाही. तुम्ही माल्ल्याला जो न्याय देत आहात तोच न्याय शेतकऱ्याला जर दिला तर शेतकऱ्यांच भल झाल्याशिवाय राहणार नाही.

Updated : 14 Dec 2018 12:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top