Home > मॅक्स कल्चर > नानाsss तू खाटीला चिकटल्या पासनं दुनिया इकडची तिकडं झाली रं!

नानाsss तू खाटीला चिकटल्या पासनं दुनिया इकडची तिकडं झाली रं!

नानाsss तू खाटीला चिकटल्या पासनं दुनिया इकडची तिकडं झाली रं!
X

सारी दुनिया पुढं गेली तरी नाना देसाई अजून जुन्या काळातच जगतोय. नानाला भेटलं कि कधी कधी वाटतं. एकेकाळी नांगरटीसाठी त्यानं आणलेला घरातील एक जुनाट दोरखंड बाहेर काढावा. तो नानाच्या कमरेला घट्ट बांधावा. आणि अलगद त्याला त्या जुन्या काळातून या नव्या जगात ओढून घ्यावा. पण नानाला असं अलगद ओढून नव्या जगाशी जोडणं तितकं सोपं नाही. का नाही ते पुढं सांगत जाईलच तुम्हाला. पहाट संपून गावावर तांबडं फुटावं. दिवस उगवावा. पाखरं घरट्यातून उंच आकाशी उडावी. गुरं ढोरं चरायच्या ओढीनं पांदिला लागावी. अजून कडाक्याची थंडी गावावर पसरलेली असावी. अशा अंगाला चावणाऱ्या थंडीत माणसं घरोघरी शेकोट्या करून बसलेली असावी. आणि दाट धुक्यातून वाट काढत अचाकन अंथरुणावर येऊन कुणीतरी आवाज द्यावा. "मालक उठा कि वं उजाडलं आता! तेवढी कुळवट करून घेतली पाहिजेल! शाळवाचं रान पेरायला लागलं!" होय! हा आवाज देऊन सकाळी झोपेतून उठवायला आलेली आणि मळ्यात कुळवावर बसायला चला म्हणून सांगणारी व्यक्ती नाना देसाईंच असायची. दिवस उगवायला नाना आमच्या गोट्यातली बैलं गाडीला जुंपून मळ्याच्या वाटंला लागायचा.

नाना आमच्या मळ्यात सालगड्या सारखा राबायचा. पट्ट्या पट्ट्याची लांब विजार, अंगावर बारा महिने एकच मळकट बंडी, गळ्यात कुठल्यातरी देवीचा एक ताईत. आणि डोक्याला एक लाल रंगाचा कपडा गुंडाळलेला नाना, दिवस उगवायला बैलगाडी मळ्याकडं हाकायचा. उन्हाळ्याच्या दिवसात तो मळ्यात दहा बैलांचा नांगर धरायचा. दोन चार वळीव ढासळलं कि कुळवाच्या तीन चार पाळ्या मारून रानं नुसती भुसभुशीत करून सोडायचा. एका दिवसात उकिरडयातलं बारा गाड्याचं खत वावरत नेऊन ढिगूळ्या करून सोडायचा. शिवारात गाणी गात औत मारायचा. पेरणी करावी तर नानानंच. डोळा झाकून जरी चाढयावर मूठ धरली तरी खाली बी समानच सुटणार. कोळपणी, भांगलनीला तो असायचाच. पोटऱ्यातून वर निघालेल्या हिरव्यागार कणसांना दाणा भरला की माचव्यावर उभं राहून सारं रान नाना दणाणून सोडायचा. चांदणी उगवायला भुईमूग उपटायला मल्याकडं जायचा.

सुर्याकडं बघून टाईम किती झालाय ते नाना अचूक सांगायचं. सुगीच्या दिवसात रात्री खळ्यावर मुक्कामी असला की, "वर बघा पोरानु कुरी कलली. विंचू दिसायचा बंद झाला झोपा आता." असं तो चमकणाऱ्या चांदण्याकडं बघून सांगायचा. हे सगळं तो कुठून शिकला असेल याचं लहानपणी मला आश्चर्य वाटे. उभ्या जन्मात तो गाव सोडून कधी बाहेर गेलेला सहसा कुणाला दिसायचा नाही. तो आपल्याच विश्वात दंग असायचा. वर्षांतनं एखदा धान्याची पोती बैलगाडीत भरून तालुक्याला आठवडी बाजाराला कधीतरी वडीलासोबत जाताना दिसे. अशा वेळी त्याला तिकडे कांदाभजी हमखास खायला मिळत. मात्र यासाठी त्याला वर्षभर वाट पहावी लागे. नानाला दोन पोरं, दोन पोरी होत्या. पण गरिबीमुळं सगळ्यांच्या पोटाचं प्रचंड हाल व्हायचं. वडिलोपार्जित मुरुमाच्या शेताचं दोन तुकडे त्याच्या वाटणीला आलेलं. त्याच्यात पसा मापटा मटकी,जुंधळं पिकायचं. पण नाना त्यात प्रामाणिक राबायचा. "राबून खावं माणसानं! पण हरामचं कधी खाऊनी!" असं त्याचं तत्वज्ञान होतं.

मळ्यात गुऱ्हाळाचा घाणा सुरु झाला की त्याच्या आनंदाला उधाण यायचं. या काळात इकडची कामं आटोपून तो तिकडं रोजंदारीवर जायचा. तिकडे नाना गुळव्या व्हायचा. रस उकळून काईलीला आंदण आणायचा. त्याला घरचं जेवण वेळेवर मिळायचं नाही. कधी कधी ते यायचंच नाही. मग रसाचं मडकं तोंडाला लावून पोटभरून रस प्यायचा. मुठी भरून गुळ खायचा. काकवी प्यायचा. "नाना जेवलास का रं!" कोणी विचारलंच तर तो नुसताच मोठ्यानं ढेकर द्यायचा. आणि वातावरणात जेवल्याचा खोटा आभास निर्माण करायचा. त्याला खायला जास्त लागायचं, पण परिस्थितीनं ते मिळायचं नाही. गावाकडं येताना तो उसाची कांडी चिक्की गुळात भरवून आणून आम्हाला खायला द्यायचा. माझ्या आज्जीचा त्याच्यावर जीव असायचा. म्हणायची, "काय करायचं, पोटानं मोठा हाय गडी! म्हणून लागतंय खायला! काम बी तसंच करतुया न्हवं!" ऊन्ह चढायच्या आधीच त्याच्यासाठी ती पाच भाकरीचं गठुळं बांधून मळ्याकडे आम्हाला पाठवायची.

एखदा उतरलेल्या आंब्यावरनं चुकारीचा राहिलेला आंबा काढायला तो झाडाच्या शेंड्यावर चढलेला. अचानक पाय घसरला आणि खाली पडला. पण तालीवर चिखल होता त्यामुळं नुसता मुक्का मार लागलेला. तेवढच चार आठ दिवस तो अंथरुणावर पडून होता. बाकी उभ्या आयुष्यात तो असा अंथरुणावर झोपलेला मी तरी पाहिले नव्हते. लहानपणी एखदा मला हरण बघायचं होतं. आणि ते मला काहीही करून तू दाखव असं जेव्हा मी त्याला म्हणालो. तेव्हा त्यानं माझ्या कमरेला एक घट्ट दोरी बांधली आणि ओढत पळवत मला वड्याला नेलं. मला हरीण कुठंच दिसेना म्हंटल्यावर नाना म्हणाला, "ते बघ पळतय पुढं पुढं आपल्या. दिसलं का? दिसलं का?" अखेर माझे पायच चालायचे बंद झाल्यावर 'दिसलं बाबा' म्हणून त्याला सांगितलं. त्यानंतर मला हरीण कधीच बघू वाटलं नाही.

नाना देसाई जन्मभर गरिबीत राहिला. जगला. वाढला. त्यानं त्याच्याभोवती स्वतःचं एक विश्व उभं केलं होतं. त्याच दुनिये भोवती तो गोल गोल फिरत उतारवायकडं सरकला. दुसऱ्या जगात काय चाललंय याच्याशी त्याला कधीच देणं-घेणं नव्हतं. पुढं मोठे झाल्यावर शिक्षणासाठी गाव सुटलं आणि नाना देसाई मळ्याला चिकटून मागं राहिला. नव्या गोष्टींचा स्वतःला कोणताही स्पर्श न करू देता.

बराच काळ लोटलाय. आता नाना देसायाच्या लग्न झालेल्या मुलांनी घराचं पूर्वीचं दारिद्र्य कधीच दूर केलंय. त्याचं मातीचं जुनं गळकं घर पाडून पोरांनी सिमेंटचं नवं घर बांधलय. त्याच्या मुरमाड जमिनीवर काळी माती भरून हिरवागार ऊसाचा मळा फुलवलाय. पण नानाच्या घरापुढं तेव्हाचा तो म्हशींचा गोठा उरला नाही की त्यात रेडकं उरली नाहीत. नानाची एकेकाळची घुगंराची बैलगाडी पोरांनी ऊसतोडणी वाल्याना कधीच विकून टाकलीय. पोरांनी घरापर्यंत आणलेलं भौतिक सुख बघायचं भाग्य नानाच्या नशीबी उतारवयात उरलं नाही. शंभरी उलटलेला आणि स्मृतीभ्रंश झालेला नाना देसाई लाकडी दांडक्याचा ठेपा दिलेल्या लोखंडी खाटेवर बसून आहे त्याला आता तीन दशके उलटलीत. तेव्हापासून तो फक्त शरीरानेच नव्या जगात वावरतोय. मेंदूने नाही. त्याच्या घरामागच्या बाजूला एका पत्र्याच्या शेड मध्ये आता त्याचा मुक्काम पडलेला असतो. माणसं म्हणतात त्याच्या एवढ्या वयाचा माणूस आख्या गावात राहिला नाही. नानाला नव्या अशा आठवणी नाहीतच. आहेत त्या साऱ्या जुन्या काळाच्या. स्मृतीभ्रंशामुळे त्याला जुन्या काळातले भास आभास होत राहतात. दिवस रात्र तो जुन्याच काळात वावरतो. सकाळी पहाटे चांदण्या विझल्या कि बरोबर त्याला जाग येते. त्याच्या दोन्ही मुलांच्या नावाने तो हाका मारत राहतो. "आरं उठा लवकर! बैलासनी वैरण घाला. दिसभर नांगराला चालायची हायती!" आणखी काही वेळ गेला की पुन्हा त्याच्या हाका सुरु होतात,"आरं गाड्या जुपा लवकर! तालीतली पेरणी झाली पाहिजे! मागास पेरून उपयोग व्हायचा नाय!" असं काही बाही तो जुन्या काळातलं बोलत राहतो. पण हे सगळ्यांच्या आता सवयीचं होऊन गेलंय. अंगवळणी पडलंय. म्हातारी होती तोपर्यंत उशाला येऊन बसायची. पाय दाबायची. काय हवं नको ते विचारायची. वेळच्या वेळी जेवू खाऊ घालायची.

दिवस बराच उगवून वर आला की त्याच्या दोन्ही सुनांना जाग येते. शेड मध्ये सुना नानाला चहा आणून देतात. नानाची जेवण खाण्याची भांडी ठरलेली आहेत. अर्थातच ती नव्या सुनांनी ठरवली असतील. ती भांडी त्याच्या खाटेजवळच मुक्कामी असतात. सुना दिसल्या कि नानाचं तोंड पुन्हा चालू होतं, "अगं धारा काढा कि म्हसरांच्या! थानं बघ कि त्या म्हशींची किती पानावल्याती! मध्येच तो चहा पिता पिता थांबतो आणि थोरल्या सुनेला आवाज टाकतो, "अगं गुळ घालत जा कि अजून चहात! का ढेपा संपल्या सगळ्या घरातल्या! अजून जिता हाय मी गुऱ्हाळावर राबायला!" धाकटी सून समोर आली की म्हणतो, "अगं बया ती रिडकू सोड कि म्हशीला प्याला! कवापासनं त्ये मेडीला धरपाडतय!मुक्या जीवाला बी पॉट असतया!" रस्त्यानं येणा जाणारा कुणी दिसला की, "तंबाखू आण गड्या! आज खालतीकडनं पावसाचं लई न्याट दिसतया! पोरांनी खळ्यावर कणसं टाकल्यातीय! काय हुतय कुणास ठावूक!" नातवंडाकडे बघून "गडयांनो या साली कुस्ती मारायची बरका जत्रत!" अश्या बऱ्याच काही जुन्या गोष्टी बोलत राहतो. कधीतरी मध्यरात्री तो जागा होतो. आजूबाजूला माणूस काणूस त्याला कुणीच दिसत नाही. अशावेळी त्याला म्हातारी सोबतच्या आठवणी येत राहतात. कदाचित त्या छळत असाव्यात. समोरच्या अंधारात चांदवीला त्याला म्हातारी दिसल्याचा भास होत जातो. मग म्हातारीच्याच नावाने हाका मारत राहतो. आजूबाजूला हे सगळ्यांच्या सवयीचं झालंय.

कधी मधी मी गावी जातो. पण पूर्वीच्या नाना देसायाच्या आवाजानं आता मला सकाळी जाग येत नाही. गोठ्यातली बैलं सोडून पंदिला सुसाट सुटलेली त्याची बैलगाडी कुठेच दिसत नाही. घराला आता खुंटीच राहिली नाही तर त्यानं अडकवलेला गोंडा लावलेल्या वादीचा चाबूक दिसणार कोठून? ओढ्यात गाडीच्या खडखडण्याचा आवाज येत नाही कि औत हाकताना त्यानं म्हंटलेली गवळण कानांना धडकत नाही. मळ्यात आता गुऱ्हाळ घरे उरली नाहीत की उसाच्या रसाला आंदण आणणारी काईल राहीली नाही. नानाला दिवस उगवायला भाकरी थापण्यासाठी चुलीला लगडलेली माझी आज्जी उरली नाही की पाच भाकरी गठुळ्यात बांधून मळ्याच्या दिशेने सुसाट सुटलेली माझी अटलास सायकलही राहिली नाही. शहरातल्या गजबट गोंधळातनं गावात गेलं की असं सुनं सुनं वाटत राहतं. मन एकटं एकटं पडतं. नानाच्या आठवणीनं ते नुसतं व्याकुळ व्याकुळ होऊन जातं. त्याला भेटायला आठवणीनं जातो. मागच्या काही वर्षापर्यंत तो मला ओळखायचा. हरखून जायचा. जुन्या गोष्टी बोलायचा, "आता या साली मी राहात नाय बघ! म्हातारीच्या मागं जातोय आता! पुन्यादा तुज्या नजरंला पडायचा नाय!" असं काहीतरी निदान बोलायचा तरी. पण आता तो मलाही नीट ओळखत नाही. त्याचा वटलेला सांगाडा नुसता तोंडाकडे बघत राहतो. कधी कधी शून्यात बघून हसतो. त्या हलणाऱ्या सांगाड्यातल्या रक्ताच्या धमन्या नाना देसायाला अजून किती काळ ओला ठेवतील नाही सांगता येणार.

त्याच्या जवळ जाऊन काही वेळ मी तसाच बसून राहतो. स्वतःच्या आयुष्याचं असं उतारवयात खाटेवर वाळवण घालून बसलेला नाना देसाई बघून मेंदू अक्षरशः बधीर होऊन जातो. डोकं आपटून घ्यावं वाटतं. काय हि झालीय माणसांची दशा. कि फक्त नाना देसायाचीच? त्याच्याकडं बघून खच्चून मोठयानं ओरडावं वाटतं. पण मी यातलं काहीच करत नाही. लहानपणी त्यानं हरण दाखवण्यासाठी दोरीला बांधून मला ओढ्यानं पळवलं होतं. शेवटी कधीच शहर न पाहिलेल्या नाना देसायाजवळून उठताना उगीच आतून वाटत राहतं. एकेकाळी नांगरटीसाठी त्यानं आणलेला त्याच्या पत्र्याच्या शेडला अडकवलेला एक जुनाट दोरखंड बाहेर काढावा. तो नानाच्या कमरेला घट्ट आवळून बांधावा. आणि अलगद त्याचा उरलेला सांगाडा त्या जुन्या काळातून उचलून आताच्या नव्या जगात ओढून घ्यावा. आणि त्याला ओरडून सांगावं, "नानाsss तू खाटीला चिकटल्या पासनं दुनिया इकडची तिकडं झाली रं! बघ एखदा उघड्या डोळ्यांनी...!"

...पण मंडळीsss नाना देसायाला असं अलगद ओढून नव्या जगाशी जोडणं हरीण दाखवण्या इतकं सोपं नाही. आणि आता तर या जन्मी ते शक्यही नाही...

ज्ञानदेव पोळ

Updated : 27 Oct 2018 6:57 AM GMT
Next Story
Share it
Top