Home > मॅक्स किसान > दुधाला ३ रुपये दरवाढ देण्याचे दूध संघांनी केले मान्य

दुधाला ३ रुपये दरवाढ देण्याचे दूध संघांनी केले मान्य

दुधाला ३ रुपये दरवाढ देण्याचे दूध संघांनी केले मान्य
X

पुणे – राज्य सरकारने दूध भुकटीच्या निर्यातीला चालना देण्यासाठी ५० रुपयांचे अनुदान जाहीर केल्यानंतर कृषी, फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पुणे येथे दुधसंघांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दुध खरेदी दरात ३ रुपयांची वाढ करण्याचे दुध संघांच्या प्रतिनिधींनी मान्य केले असून ही वाढ लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल याची ग्वाही संघ चालकांनी दिली आहे. या बैठकीमध्ये सदाभाऊ खोत यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे दुध व्यवसाय सध्या धोक्यात आला असून या परिस्थितीमध्ये सरकार पूर्णपणे दुधउत्पादकांच्या पाठीशी उभा असून दुधाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

दुध भुकटी निर्यात अनुदानाबरोबरच बटर व इतर प्रक्रिया पदार्थांच्या जीएसटी मध्ये सवलत मिळावी यासाठी देखील राज्यसरकार पाठपुरावा करत आहे.

काही मंडळी केवळ दुध प्रश्नांचे भांडवल करून शेतकऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करत असून शेतकरी प्रश्नांचे केवळ राजकारण करून निव्वळ कांगावा करण्यात पटाईत आहेत असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता टोला लगावला.

काय आहेत मागण्या?

शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात यावे तसंच महाराष्ट्रामध्ये दररोज २० लाख लीटर अतिरिक्त दुध उत्पादन होते. याची योग्य विल्हेवाट लावली तर दुध खरेदीचा भाव २७ ते २८ रूपयापर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी सरकारने दररोज २० लाख लीटर दूध स्वत: खरेदी करावी. यासह इतरही अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (१६ जुलैपासून) राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन आक्रमकपणे चालवण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. त्यामुळे प्रशासन दक्ष झाले आहे. तर दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी दूद उत्पादकांना संरक्षण देणार असल्याचे म्हटले आहे.

Updated : 15 July 2018 7:34 PM GMT
Next Story
Share it
Top