Home > मॅक्स किसान > बीडच्या शेतकऱ्यांची फरफट; पीक कर्ज भ्रष्टाचार आणि लालफितीच्या विळख्यात

बीडच्या शेतकऱ्यांची फरफट; पीक कर्ज भ्रष्टाचार आणि लालफितीच्या विळख्यात

बीडच्या शेतकऱ्यांची फरफट; पीक कर्ज भ्रष्टाचार आणि लालफितीच्या विळख्यात
X

  • चालू खरीप हंगामात बीडसाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ९४९ कोटी रुपये होतं, पण १५ सप्टेंबरपर्यंत केवळ २६ टक्के कर्ज वाटप झालं आहे. बीड ज्या मराठवाड्यातील कृषीप्रधान क्षेत्राचा भाग आहे. तिथं हे प्रमाण ३१ टक्के आहे, हा आकडा राज्याच्या सरासरी ४५ टक्क्यांच्या १४ टक्के कमी आहे. फडणवीस यांनी शेतक-यांना कर्ज माफी जाहीर केल्याच्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात पीक कर्ज वितरणाची परिस्थिती अशी चिंताजनक आहे.

  • बीड शहराच्या गजबजलेल्या एसटी स्टँड समोर असलेल्या आपल्या डेअरीत योगेश शेळके भेटला. फोनला उत्तरं देत, डेअरीत काम करत चहाचे घोट घेता घेता तो माझ्याशी बोलत होता. वाहतुकीच्या कोलाहलात, हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजांनी ज्यांचा आवाज दबून जातो. अशा अनेकांना तो इथे भेटतो. तो म्हणाला," बहुतांश लोक पीक कर्ज न मिळाल्याची तक्रार करत असतात शिवाय त्यांना शेतकरी कर्ज माफीचा फायदाही मिळालेला नसतो.”

  • महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईचा योगेश शेळके हा माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे २०१९ मध्ये कृषी क्षेत्रासाठी ८७,००० कोटी रुपयांच्या पतसहाय्य योजनेस मंजुरी देताना बँकांना संवेदनशील राहून जास्तीत जास्त कर्ज देण्याचे आवाहन केलं होतं. पण जिल्ह्याभरातून योगेशला येणारे अगणित फोन निराळीच कहाणी सांगतात. तो सांगतो, ''खालच्या अधिकाऱ्यांची मनधरणी केल्याशिवाय बँकेच्या व्यवस्थापकांपर्यंत पोहोचणे अशक्य असते, ते अधिकारी लाच मागतात; त्यांनी सर्वसामान्य शेतकर-यांचं जगणं हराम करून टाकलं आहे.”

बीडचे बहुसंख्य शेतकरी योगेशच्या म्हणण्याला दुजोराच देतात. आंबेजोगाईपासून सुमारे ४० किलोमीटरवर असलेल्या गावाचे ६० वर्षांचे सलीम पठाण महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या स्थानिक शाखेत दोन वर्षांपासून पीक कर्ज मिळवण्यासाठी आटापिटा करत आहेत. पिंपरी बुद्रुक गावाचे हे शेतकरी सांगत होते, "ते म्हणतात की बँकेकडे आर्थिक तरतूद नाही; मी कागदपत्रे सादर केली, ते सांगतील तशी फाइल तयार केली. यात माझे १५०० रुपये खर्च झाले , परंतु माझे पीक कर्ज अजून मंजूर झालेले नाही. "

पठाण त्यांच्या अडीच एकर शेतीवर कापूस लागवड करतात, ते म्हणाले,”खरंतर आता खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळण्याची वेळ निघुन गेली आहे. पण रब्बी हंगामाच्या पिकासाठी मी पुन्हा अर्ज करीन.पाहूया काय होते ते!"

योगेश शेळके - कार्यकर्ता स्वाभिमानीशेतकरी संघटना

राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) ही एक सर्व वित्तीय संस्थांचा समन्वय साधण्यासाठी आणि विकास कार्यक्रम तसेच धोरणांची संयुक्त अंमलबजावणी करण्यासाठी आंतर-संस्थात्मक समिती आहे. या समितीत सरकारी अधिकारी देखील आहेत. समितीच्या मते पठाण यांच्यासारखे अनेक आहेत. खरीप हंगामाचे बीडसाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ९४९ कोटी रुपये होते. पण १ सप्टेंबरपर्यंत हे वितरण केवळ २६ टक्के आहे. बीड ज्या मराठवाड्यातील कृषीप्रधान क्षेत्राचा भाग आहे. तिथं हे प्रमाण वितरण ३१ टक्के आहे. हा आकडा राज्याच्या सरासरी ४५ टक्क्यांच्या १४ टक्के कमी आहे.

ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण मंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे सांगतात की, राज्य सरकार दरवर्षी बँकांना उद्दिष्ट आखून देते. पण बँका ते पूर्ण करत नाहीत. त्या म्हणाल्या, "आम्ही यावर खूष नाही, परंतु वाढती थकबाकी हे त्यामागचे कारण असावे."

पंकजा मुंढे असंही म्हणाल्या की,“पीक विमा आणि इतर योजनांची अंमलबजावणी गेल्या पाच वर्षांत चांगली झाली असल्याने पीक कर्जाला शेतक-यांनी प्राधान्य दिले नसावे,त्यांच्या खात्यात विम्याचा पैसा असावा किंवा सरकारकडून इतर मदत मिळाल्यामुळे त्यांनी कर्ज न घेण्याचा निर्णय घेतला असावा. हे ही एक कारण आहे,"

पीक कर्जाबद्दल इत्यंभूत माहिती असल्याने योगेश शेळके या मताशी सहमत नाही.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सामील होण्यापूर्वी ते बजाज अलिआन्झ लाइफ इन्शुरन्सचे कर्मचारी होते. जिथे असताना त्यांनी त्यांची कंपनी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्यात असलेलं साटंलोटं उजेडात आणलं होतं.डिसेंबर २०१८ मध्ये ग्रामीण बँक नको असलेल्या जीवन विम्याच्या पॉलिसीच्या बदल्यात पीक कर्ज मंजूर करत आहेत. हे त्याने उघडकीस आणलं. योगेश सांगतो,

“त्यानंतर कार्यकर्ता झाल्यावर मला किती फोन आले. तो आकडा मोजण्या पलीकडचा आहे. पंकजा ताईंचा दावा खोटा आहे,"

पंकजा मुंढे आणि त्यांचे चुलत भाऊ, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांचा बीड मध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरु आहे.. २१ ऑक्टोबरच्या निवडणुकीचा निकाल हा अनेक निरीक्षकांसाठी महत्वपूर्ण निष्कर्ष काढायला निरुपयोगी असू शकेल, पण राज्यात असे काही मतदारसंघ आहेत ज्यावर निरीक्षकांचे जवळून लक्ष आहे. बीड हा त्यापैकी एक आहे. परळी मतदारसंघात चुलत भाऊ-बहीण एकमेकांविरोधात उभे असले, तरी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते एकूण सहा मतदारसंघांत जिल्हाभर पसरलेले आहेत. त्यातले बहुसंख्य सर्व सध्या भाजप-शिवसेनेत आहेत. राजकारणी कुटुंबातली ही एक अभिजात अस्मितेची लढाई आहे.

२००९ पासून पंकजा मुंढे ह्या परळीच्या आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी धनंजय यांना २०,००० हून अधिक मतांनी पराभूत केले होते. या मतदारसंघातील मतदार विलक्षण पद्धतीने मतदान करतात. ते पंकजा यांना विधानसभेत पाठवतात पण ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि एपीएमसी या स्थानिक स्वराज्य संस्थांवर धनंजय यांना पाठींबा देतात.

भाजपचे माजी नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या असल्याने, आणि बीडची लाडकी मुलगी असल्याने पंकजा यांना बीडमध्ये मोठ्या प्रमाणात भावनिक पाठींबा आहे. दुसरीकडे धनंजय यांच्यावर ‘राष्ट्रवादीत सामील होऊन काकांना सोडून दिले’ असा आरोप त्यांचे विरोधक करतात. धनंजय मुंढे म्हणाले,

''पण आता लोक भावनांच्या आधारे मतदान करणार नाहीत, माझ्याकडे माझ्या मतदारसंघाचे ब्लू प्रिंट आहे. ते माझे स्वप्न आहे, हे मतदारांचे स्वप्न आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणुका लढवित आहे. फडणवीस यांनी शेतकरी कर्ज माफीची थट्टा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या विवंचना अधिक वाढल्या आहेत. सरकारने बँकेला पैसे दिले नाहीत, म्हणून बँकेने अनेक शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले नाही, म्हणून ते नवीन पीक कर्जासाठी अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत”

Courtesy : Parth M.N.

दुसऱ्या बाजूला, शेतकरी कर्ज माफी योजनेतील जाचक निर्बंधांमुळे सर्वात जास्त गरज असलेल्या शेतक-यांना त्याचा फायदा मिळतच नाही. पिंपरी बुब्रूक इथल्या ५५ वर्षांच्या पार्वती काळे यांच्यावर पाच लाख रुपयांचे कर्ज आहे. पण माफीसाठीची मर्यादा फक्त दीड लाख रुपये आहे. या योजनेचा फायदा होण्यासाठी तिला स्वतःकडचे अजून साडेतीन लाख रुपये भरावे लागतील. "माझ्याकडे असं पैसं असतं तर माझ्या डोक्यावर कर्जाचा बोजा झाला असता का ?" तिच्या अंधा-या घरात भांडी घासताना तिनं विचारलं.

तिच्या आणि तिचा नवरा सुधाकर यांच्या छाताडावरचं देण्याचं हे ओझं २०१२ पासून जीव गुदमरून टाकत होतं. मराठवाड्यात सलग चार वर्षं दुष्काळ आहे. ते शेतात जास्तीत जास्त तास काम करत होते, राबत होते,जोडीला मजुरीही करत होते.पण यावर्षी जानेवारीत सुधाकरने हार मानली. एक दिवस, तो त्याच्या शेतात गेला, पण विळा उचलला नाही. त्याऐवजी, त्याने एक लांब दोरी उचलली आणि नेहमी थकल्या-भागल्यावर सावली देणाऱ्या एका झाडावर लटकून त्याने फाशी घेतली.

सदर रिपोर्ट : Firstpost या संकेतस्थळावर वर 11 Oct, 2019 ला प्रसिद्ध झाला आहे.

- भाषांतर – रविंद्र झेंडे ,पत्रकार आणि अभ्यासक.

Updated : 14 Oct 2019 9:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top