Home > मॅक्स किसान > “शेतकर्‍यांना सावकारांच्या जाळ्यात ढकलले जात आहे!”

“शेतकर्‍यांना सावकारांच्या जाळ्यात ढकलले जात आहे!”

“शेतकर्‍यांना सावकारांच्या जाळ्यात ढकलले जात आहे!”
X

  • “शेतकर्‍यांना सावकारांच्या जाळ्यात ढकलले जात आहे!”

  • वैशाली येडे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून केलेल्या ह्रदयस्पर्शी भाषणामुळे प्रसिद्धी मिळाली.

  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यांना २०,००० हून अधिक मतं मिळाली पण त्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्या.

  • “शेतकर्‍यांना सावकारांच्या जाळ्यात ढकलले जात आहेत!” असं त्या भाषणात म्हणाल्या.

वैशाली येडे यांचं लग्न दहा वर्षांपूर्वी झालं. दोन वर्षानंतर तिचा नवरा सुधाकर यांनी आत्महत्या केली. दरम्यानच्या काळात त्यांनी दोन मुलांना जन्म दिला. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांना सासरच्यांनी टाकल. आज त्यांची मुले शाळेत जातात, त्या एका शेतकरी संघटनेशी संबंधित आहेत आणि भारतीय मराठी साहित्य संमेलनात केलेल्या ह्रदयस्पर्शी भाषणामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. २८ वर्षांच्या वैशाली येडे अत्यंत गांभीर्याने आयुष्याचा सामना करत आहेत.

महाराष्ट्रातील यवतमाळच्या राजूर गावात त्यांच्या अंधारलेल्या घरात, सुधाकरने त्यांच्या नवर-याने सावकाराकडून ७५००० रुपयांचं कर्ज घेतल्याचं वैशाली सांगतात. “त्यांनी किती व्याजदराला मान्यता दिली हे मला ठाऊक नाही, पण सावकारांकडून घेतलेलं कर्ज शेतक-याचं रक्त पीतं हे नक्की,” उद्विग्न स्वरात त्या सांगतात.“जेव्हा लक्षात आलं की हे कर्ज फिटणार नाही, तेव्हा त्याने स्वत: ला फाशी देऊन लटकवले. आता मला आमच्या मुलांना सांभाळायचं आहे. ”

२०११ मध्ये त्यांचा मुलगा दोन वर्षांचा होता आणि त्यांची मुलगी अवघ्या एक महिन्याची होती.

वैशाली येडे महाराष्ट्रातील यवतमाळच्या राजूर गावात तिच्या एका खोलीच्या घरात.(फोटो पार्थ एम.एन.)

जून २०१ 2017 मध्ये जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३४००० कोटींची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा यामुळे दिलासा मिळेल कि नाही अशी वैशाली यांना शंका होती दोन वर्षे झाली तरी कर्ज माफी अद्याप पूर्णपणे लागू न झाल्याने त्यांची शंका आणि भीती खरी ठरली आहे.

राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (एसएलबीसी) मे २०१९ च्या अहवालानुसार २०१७-१८ आर्थिक वर्षात कृषी पत वितरण उणे ५० टक्के वाढ दर्शवत आहे. पुढच्या वर्षीही पीक कर्जाचे वितरण अपूरे होते. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर आधीची थकबाकी अद्याप निकाली काढण्यात आल्याने बँकांना नवीन कर्ज देता आले नाही.

“शेतक-यांना नेहमीच सावकारांकडून कर्ज घावे लागते; पण या कर्जमाफीच्या ढिसाळ आणि उशिराच्या अंमलबजावणीमुळे त्याचे प्रमाण वाढले आहे." त्या सांगतात “जेव्हा बँका पीक कर्ज वितरित करीत नाहीत, तेव्हा अधिकाधिक शेतक-यांना सावकारांच्या जाळ्यात लोटलं जातं. यवतमाळमध्ये हेच घडतंय”

यवतमाळ जिल्ह्याच्या शेतीवरील संकट सर्वात भीषण आहे. यवतमाळ विदर्भातील अमरावतीच्या विभागात आहे. मागील पाच वर्षांत या भागात ४३८४ शेतकरी आत्महत्या झाल्या. हे प्रमाण राज्यातील एकूण शेतकरी आत्महत्यांच्या ३६.५ टक्के आहे. आत्महत्या करणारे बहुतेक शेतकरी पुरुष आहेत, पण महिला शेतक-यांनी केलेल्या आत्महत्यांची नोंद बर्‍याचदा केली जात नाही.

“या पुरुषप्रधान जगात पतीने, आत्महत्या केल्यावर बाईला जगण्यासाठी पाठिंबा आणि प्रचंड मानसिक शक्तीची आवश्यक आहे.” वैशाली सांगतात, "लोक आपल्या पाठीमागे वाटेल ते वाईट साईट बोलतात आणि कोणीही आपल्यापाठी उभे राहत नाही; अगदी आपले कुटूंबही नाही.”

सुधाकर आणि त्याचे दोन भाऊ यांच्याकडे नऊ एकर शेती होती. त्याच्या मृत्यू नंतर, कुटुंबाने सुधाकरचा वाटा लाटला आणि येडे यांना निर्वासित केलं. आज आठ वर्षं उलटली वैशाली येडे आणि तिची मुले हाकेच्या अंतरावर पण त्यांच्यापासून वेगळी राहतात. त्या खिन्न हसत सांगतात, “ते असे वागतात जणू आम्ही अस्तित्वातच नाही. मी एकटी पडले होते. सुधाकर यांच्या मृत्यूनंतर मी माझ्या आईवडिलांबरोबर राहिले. मी शिवणकाम शिकले आणि अंगणवाडी शाळेत नोकरी सुरू केली. ”

त्या अजूनही तिथे काम करतात. महिन्याला 3000 रुपये मिळवतात . मुले गावच्या सरकारी शाळेत शिकतात. दररोजच्या धकाधकी असल्या तरी त्यांच्या आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे आयुष्य तुलनेने स्थिर आहे. पण मुलांची शाळा संपल्यावर काय करायचं याची चिंता त्यांना भेडसावतेय. त्या म्हणतात “मी आता कसंतरी भागवतेय, पण त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे कसे उभे करायचे? माझ्याकडे कर्जासाठी गहाण ठेवण्यासाठी जमीनही नाही."

जादा रोख रकमेसाठी येडे प्रसंगी शेती मजूरीही करतात. त्या सांगतात “शाळा सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत असते.मी सकाळी ७ ते ९ आणि दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत इतरांच्या कपाशीच्या शेतात काम करतो. मला दिवसाच्या कामासाठी 100 रुपये मिळतात.”

यवतमाळमधील दोन प्रमुख पिकं, कापूस व सोयाबीनच्या लागवडीसाठी ब-यापैकी मजुरांची आवश्यकता असते. या हंगामात विदर्भात समाधानकारक पाउस झाला आहे, त्यामुळे मजुरांना काम मिळाले आहे. पण गेल्या दोन वर्षात किरकोळ पाउस झाला. वैशाली सांगतात, “आमच्याकडे काम नव्हतं कारण कापणीची कामं कमी होती. अपु-या पावसाच्या वेळी पूरक म्हणून आमच्याकडे सिंचनाची फारशी सुविधा नाही. पिकाचे दर पडले. या सरकारने शेतकर्‍यांसाठी काहीही केलं नाही, पण तरीही त्यांनी संडास बांधले असं म्हणत लोक भाजपाला मतदान करतात. कारण विरोधी पक्ष कमकुवत आहेत. ”

पतीने आत्महत्या केल्यानंतर पोटापाण्यासाठी वैशाली येडे शिवणकाम शिकल्या. (फोटो पार्थ एम.एन.)

राज्याप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातही सत्ताधारी भाजप-शिवसेना युती जोषात आहे, इथूनच नरेंद्र मोदींनी २०१४ च्या प्रचाराची सुरुवात चाय पे चर्चा कार्यक्रमाने केली. उत्तमराव पाटील यांच्यामुळे कॉंग्रेसने जिल्ह्यात मोठ्या अस्तित्व टिकवून ठेवलं असले तरी मोदींच्या उदयाने परिस्थिती पालटली आहे.

यवतमाळमधील सातपैकी सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेना युती आहे. तथापि, अंतर्गत बंडाळीमुळे त्यांना एक किंवा दोन जागांवर फटका बसू शकतो. युतीच्या जागा वाटपामुळे शिवसेनेत नाराजी आहे. सात पैकी सहा उमेदवार भाजपचे असल्याने सेनेने बंडखोर उमेदवार उभे केले आहेत .

यवतमाळमध्ये किंवा विदर्भात सत्ताधारी आघाडीतील भांडणाचा फायदा करून घेण्यासाठी कॉंग्रेसकडे नेतृत्व आहे का, हा खरा प्रश्न आहे. यवतमाळातील एकेकाळचे नेतृत्व असलेले प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे ही ताकद आता लयास गेली आहे.

येडे यांनीहि राजकारणात आपला हात आजमावला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली. या संघटनेची स्थापना आमदार आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातले येडे यांचे भाषण व्हायरल झाल्यावर त्यांना निवडणूक ऑफर दिली गेली. काही उजव्या विचारसरणीच्या गटांकडून टीका झाल्यानंतर नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द केल्याने महोत्सवाच्या आयोजकांची छी-थू झाली होती. त्यांनी अब्रू वाचवण्यासाठी येडे यांना संमेलनाचे उद्घाटन करण्याचे आमंत्रण दिले.

येडे यांना २०,००० हून अधिक मते मिळाली पण त्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्या . त्या म्हणाल्या, “आमचा सगळा प्रचार लोकवर्गणीतून झाला. मटण किंवा पैशांचे वाटप न करता ही मतं मला मिळाली. पण शेतकर्‍यांनी मला मतं देऊन पुरेसा पाठींबा दिला नाही याचं मला वाईट वाटतं. मला स्वतःच्या फायद्यासाठी संसदेत जायचं नव्हते. मला ठाऊक आहे की शेतक-याची विधवा असणं म्हणजे काय? मला शेतक-यांना भेडसावणार्‍या समस्या माहित आहेत. पीक कर्ज मिळणे किती अवघड आहे हे मला माहित आहे ”

एसएलबीसीच्या आकडेवारीनुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी यवतमाळचे पीक कर्जाचं वितरणाचं उद्दिष्ट २१०० कोटींपेक्षा जास्त होत. पण १५ सप्टेंबर, २०१९ पर्यंत केवळ ५८ % कर्जवाटप झालं आहे. फडणवीस यांनी मे २०१९ मध्ये कृषी क्षेत्रासाठी ८७००० कोटींच्या पत योजनेला मंजुरी दिली आणि बँकांना संवेदनशील राहून पीक कर्जाचे वितरण करण्याचं आवाहन केलं. तरीही हि अवस्था आहे.

संपूर्ण राज्यात कृषी कर्ज वितरणाची अवस्था याहून वाईट म्हणजे फक्त ४५% आहे. वैशाली येडे म्हणतात ,” हे असंच घडत राहिलं तर शेतक-यांना सावकारी पाशात लोटणं सुरूच राहील आणि हे दुष्टचक्र कधीच संपणार नाही”

सदर रिपोर्ट : firstpost या संकेतस्थळावर वर 11 Oct, 2019 ला प्रसिद्ध झाला आहे.

- भाषांतर – रविंद्र झेंडे ,पत्रकार आणि अभ्यासक.

Updated : 23 Oct 2019 12:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top