Home > मॅक्स किसान > सीताफळांची नवलाई! : महारुद्र मंगनाळे

सीताफळांची नवलाई! : महारुद्र मंगनाळे

सीताफळांची नवलाई! : महारुद्र मंगनाळे
X

निसर्गातील बदल मोठे आश्चर्यकारक आहेत. त्यांचं आकलन सहजपणे करता येत नाही. माझ्या बालपणी आमचा माळ हे सीताफळांचं आगार होतं. त्यामुळं त्याची संगत ५५ वर्षांपासूनची असावी!

सीताफळांच्या झाडांना फळं कमी-जास्त लागणं, फळं छोटी-मोठी होणं हे नेहमीचं. पाऊस खूपच कमी झाला तर, फळंच लागत नाहीत किंवा लागलेल्या फळांची वाढ होत नाही. ती पिकत नाहीत. हाही अनुभव अनेकदा घेतलाय. साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सीताफळं खायला येतात. दोन महिने हा हंगाम टिकतो.

यावर्षी मी सीताफळांबाबत जे पाहतोय. ते नवल करावं असंच आहे. काही झाडांना खूप कमी फळं लागलीत. तर काहींना भरपूर. झाडांच्या वाढीशी याचा काहीही संबंध नाही. फळं थोडीशी मागे-पुढे लागतात. पण या हंगामात फळांमध्ये दोन-तीन महिन्यांचं अंतर आहे. एकाच झाडावर पाड झालाय, परिपक्व झालेली फळं आहेत. मोठी हिरवी फळं आहे. एकदम छोटी फळं आहेत. आणि त्याच झाडावर फुलंही आहेत. हे सगळं मला चकीत करणारं आहे. या महिन्यात आम्ही सीताफळं खातोय. फळांची ही स्थिती बघितली तर, डिसेंबर अखेरपर्यंत कदाचित जानेवारीतही आम्हाला सीताफळं खायला मिळतील असं दिसतयं.

अर्थात आम्ही एकटे त्याचे वाटेकरी असणार नाही. सध्या छोट्या न चावणाऱ्या काळ्या मुंग्या व काळ्या मुंगळ्यांनी सीताफळांवर मुक्काम केलाय. परिपक्व झालेल्या फळांचा ते फडशा पाडताहेत. याशिवाय खारूताई, काही पक्षी, मुंगूस आहेतच. बालपणी सीताफळावर पाहिलेले हिरवे साप (रूक्की) सध्या आढळत नाहीत!

या सगळ्यात माझं काम वाढलयं. पावसाची टीपटीप चालू असतानाही सकाळी काखेत पिशवी अडकवून या सगळ्या सीताफळांच्या झाडांची बारकाईने पाहणी करून, परिपक्व फळं तोडावी लागतात. कोणत्या झाडाला चांगली फळं मिळतील, याचा अंदाज येत नाही. वरवर सोपं वाटणारं हे काम वेळखाऊ आणि थकवणारं असतं. प्रत्येक फांदी खाली-वर करून बघावी लागते. झाडं प्रचंड वाढलीत. यात किती वेळ जातो ते कळत नाही. अर्थात भरपूर व्यायामही होतोच! शिवाय आनंदही मिळतो.

हे काम माझ्याशिवाय दुसरं कोणी करीत नाही. हे काम करायला वेळ, आवड, नजर असं सगळंच हवं. निसर्गाच्या मनात आम्ही सहा महिने सीताफळं खावीत, असं दिसतयं. त्याची इच्छापूर्ती होईलच! दोन वर्षांनंतर मी लावलेल्या सगळ्या सीताफळांच्या झाडांची फळं तोडायला मला एकट्याला दिवसही पुरायचा नाही! माझ्या रोजगाराचा प्रश्न मी सोडवलाय.

Updated : 9 Sep 2020 8:40 PM GMT
Next Story
Share it
Top