Home > मॅक्स किसान > हा धोक्याचा इशारा समजून घ्या !

हा धोक्याचा इशारा समजून घ्या !

हा धोक्याचा इशारा समजून घ्या !
X

शितल वायाळ या किसान कन्येने परवा केलेली आत्महत्या ही काही पहिली घटना नाही हे जरी खरे असले तरी सोशल मीडियाच्या ऐन उमेदीत घडलेली ही पहिली आत्महत्या म्हणायला हरकत नाही. शेती मातीवर अवलंबून असणाऱ्या माणसाचे येणारे दिवस किती भयावह असतील याचा सूचक इशारा शितलच्या पत्राने दिला आहे.

धारणतः 80 च्या दशकात शेतकऱ्याला शेतीतून हुसकावून लावण्याची कारस्थाने सुरु झालीत, माणूस ग्लोबल होता तेवढ्यावर ठीक होते परंतु हे ग्लोबल भूत सरकारने आपल्या मानगुटीवर बसवले आणि शेतकऱ्याच्या सरणाची लाकडे रचायला सुरुवात झाली, शेतीत मरण दिसत असताना पुन्हा शेतीकडे वळा असा नारा नवश्रीमंत वर्गानी द्यायला सुरुवात केली, यात राजकीय पुढारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, सीए आणि कंत्राटदार वर्गाचा समावेश होता, ज्याच्या उत्पन्नाचे साधन केवळ शेती आहे असा 60 टक्के शेतकरी आधीच शेतीच्या आत ट्ट्याच्या व्यवहाराने पुरता पोळून निघाला असताना "शेतीकडे चला" या घोषणेला तो भुलला. कोणताही जोडधंदा शोधण्याच्या भानगडीत न पडता लागवड अन उत्पन्नाची लॉटरी त्याला प्रिय वाटायला लागली. याच काळात शेतकऱ्याला कुणी दारात उभे करीत नसताना रोड टच शेतीच्या किमती मात्र आकाशाला भिडल्या आडमार्गाने येणारा पैसा कुठे गुंतवावा असा प्रश्न या प्रोफेशनल वर्गाला पडला तेव्हा त्याने एकराचा तुकडा करोडोत विकत घ्यायला सुरुवात केली. म्हणायला ही सगळी कोनेएके काळी शेतकऱ्याची मुले होती मात्र व्यवसाय बद्लताच यांनी गावाशी, शेती मातीशी नाळ तोडली. शेतकरी यांचे आठवडी बाजारातले भातके बनले.

एकट्या शेतीवर पोट भरू शकत नाही, कठोर परिश्रम करून भरलेच तर चार पैसे गाठीला जमा होऊ शकत नाहीत अशावेळी कुटुंबाचा गाडा ओढताना कंबर तुटलेले शेतकरी आजवर कोणत्याही सत्तेला दिसले नाहीत, थ्रीडी सिनेमा पाहताना जसा वेगळा चष्मा लावावा लावतो, साध्या डोळ्याने तो दिसत नाही तसेच शेती अन शेतकरी वर्गाचे झाले, कमरेत भरणारी शिलक अन बुढाइत जाणारा घाम इथे कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही, ज्याच्या पोटाला झोम्ब आली त्यानेच गावाच्या आखरात जायला हवे अशी इथली व्यवस्था आहे .

गेल्या 15 वर्षात शिक्षण किती प्रगत झाले हे माहीत नाही मात्र गाव पातळीवर कॉन्व्हेंट निघायला सुरुवात झाली, मुली शिकायला लागल्या, किमान पदवीधर झालेल्या किसान कन्या यांचा टक्का यात मोठा राहिला. शिकलेल्या पोरी वाचायला अन विचार करायला लागल्या, स्त्रीपुरुष समानतेच्या नाऱ्यानी गावगाडा अन कुटुंबातल्या सगळ्या प्रश्नाशी तिचा परिचय व्हायला लागला, शेतीचे फसलेले अर्थशास्त्र जुळवताना बापाच्या तोंडाला येणारा फेस टिपताना ती शितल वायाळ कधी बनली हे आपल्या लक्षात आले नाही.

आधी शेतकरी, मग तरुण शेतकरी म्हणजे किसान पूत्र आणि आता किसान कन्या असे मरणाचे एकामागोमाग निघणारे रिमेक काय सांगू पाहतात हे अजूनही आम्हाला ओळखता येत नसेल तर काळ माफ करेल या भ्रमात आपण वावरतो आहोत असा त्याचा अर्थ आहे.

शेती विरोधी कायदेच नव्हे तर नियोजन, मानसिकता आणि हितशत्रू सुदधा बदलण्याची गरज आहे, जेवढा शेतकरी कर्जाने नागडा होत नाही त्याही पेक्षा अधिक तो रूढी, परंपरा, जत्रा, सण, अंधश्रद्धा अन मानपान यांनी नागावला जातो, लग्न, मरण यातल्या कर्मकांडानी शेतकरी आर्थिक, मानसिक कुपोषित झालाय. पण, आपले नेमके कुठे चुकतेय हे त्याला कळत नाही. ज्यांची जबाबदारी आहे ते सुदधा सांगायला पुढे येत नाहीत अशावेळी केवळ त्याच्या मरणावर अश्रू गाळून काही होईल असे वाटत नाही.

ज्या देशात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अनेक महिला असताना इथल्या किसान कन्या मरणाला जवळ करीत असतील तर हा भयंकर धोक्याचा इशारा आहे हे समजून घ्यावे लागेल .

@ पुरुषोत्तम आवारे पाटील

9892162248

Updated : 18 April 2017 5:16 AM GMT
Next Story
Share it
Top