Home > मॅक्स किसान > "हा शेतकऱ्यांच्या कट्टरवादाचा विजय"...

"हा शेतकऱ्यांच्या कट्टरवादाचा विजय"...

हा शेतकऱ्यांच्या कट्टरवादाचा विजय...
X

शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या लढाईचा ऐतिहासिक विजय झालेला आहे. शेतकरी संपाच्या माध्यमातून "करेंगे या मरेंगे" या मानसिकतेत मैदानात उतरलेल्या शेतकरी राजाने सरकारची संपूर्ण नाकाबंदी करत आपल्या मागन्यांसाठी सरकारला अक्षरशः झुकवले. आपल्या बोलावर आणि बळावर आपल्या सर्व मागण्या मान्य करून घेणे हा खऱ्या अर्थाने "शेतकऱ्यांच्या कट्टरवादाचा विजय आहे" असेच म्हणावे लागेल.

राज्यभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु असताना सरकार पातळीवर शेतकऱ्यांना फारसा दिलासा देणाऱ्या हालचाली होत नव्हत्या. कर्जमाफीच्या विषयाकडे सत्ताधारी आणि विरोधक राजकीय चष्म्याने पहाता असल्याने सरकार कर्जमाफीवर निर्णय घ्यायला तयार नव्हतं. त्यात निवडणुकांना दोन वर्ष असल्याने तात्काळ कर्जमाफीसाठी सरकार अजिबात अनुकूल नव्हते. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून विरोधकांनी, आसुड यात्रेच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू यांनी आणि आत्मक्लेश यात्रेच्या माध्यमातून खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर दबाव वाढवला होता. मात्र याचं श्रेय विरोधकांना मिळू नये यासाठी सरकार प्रयत्न करत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफ़ीचा मुद्दा राजकीय पटलावरचा विषय बनला होता आणि बळीराजाचा 'बळी' मात्र जातच होता.

दरम्यान याच काळात शेतकऱ्यांच्या नव्या आर-पारच्या लढाईची बांधणी होत होती आणि त्या माध्यमातून उभा राहिला तो शेतकऱ्यांचा कट्टरवाद ! पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून शेतकऱ्यांच्या संपाची हाक दिली आणि बघता बघता हे लोण राज्यभरात पोहोचलं. राज्यभरातील शेतकरी मोठ्या संखेने रस्त्यावर उतरले आणि मुंबईला होणारा शेतमालाचा आणि दुधाचा पूरवठा तोडला गेला. प्रारंभी आपल्याच मस्तीत असणारं सरकार शेतकऱ्यांचा उद्रेक पाहुन धास्तावलं आणि संप मोडून काढन्यासाठी सरकारची सर्व यंत्रणा कामाला लागली. एरवी जो सदाभाऊ शेतकरी नेता बनून सरकारच्या 'एसट्या' फोडायला पुढे असायचा तोच सदाभाऊ शेतकऱ्यांचा संप फोडायला पुढे होता याच्यासारखे दूसरे दुर्दैव नाही. त्याला साथ मिळाली ती जयाजीराव सारख्या 'पिसाळलेल्या' फुटीर शेतकरी नेत्याची. सरकारने रात्रीच्या काळोखात शेतकऱ्यांच्या स्वप्नांना मुठमाती दिली होती.

मात्र कट्टरवादास पेटलेला शेतकरी माघार घ्यायला तयार नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदु पुणतांब्यावरुन आंदोलनाची कर्मभूमि असणाऱ्या नाशिककडे सरकला आणि आंदोलनाला नवी झळाळी प्राप्त झाली. इतिहासात पहिल्यांदाच राज्यभरातील शेतकऱ्यांच्या 35 पेक्षा जास्त संघटना आपले मतभेद विसरून एकवटल्या आणि त्यांनी सरकारविरोधात आरपारच्या लढाईचा एल्गार पुकारला. या लढाईला नेतृत्व लाभले ते खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, आमदार जयंत पाटील, रघुनाथदादा पाटील, ड़ॉ. अजित नवले यांसारख्या शेतकऱ्यांप्रति निष्ठावान नेत्यांचे ....

असे सर्व दिग्गज नेते मैदानात उतरल्याने आणि नाशिकच्या सभेत आंदोलनाची दिशा ठरवताना सर्वांनी मुंबईची रसद तोडण्याबरोबरच रेलरोको आंदोलन, सरकारी कार्यालय बंद आंदोलन, नेत्यांना- मंत्र्यांना गावबंदी, सभाबंदी, जिल्हाबंदीचा इशारा दिला होता. त्यामुळे सरकारची पाचावर धारण बसली. आंदोलनाचा धसका घेत मागील दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसहित विविध मंत्र्यांचे दौरे रद्द केले. बच्चू कडूंच्या 'बॉम्ब'चा धसकाही सरकारनं घेतला होता. आता आंदोलन 'गुंडाळणे' शक्य नव्हते आणि खरेच आंदोलन पेटले तर आवरणे शक्य होणार नाही आणि आपली उरलीसुरली रयाही या आंदोलनात जळून खाक होईल याची जाणीव सरकारला झाली होती होती. त्यामुळे सुकाणु समितीबरोबर झालेल्या बैठकीत संपूर्ण नमते घेत सरकारच्या वतीने नेमलेल्या मंत्री गटाच्या उच्चाधिकार समितीनं शेतकऱ्यांच्या तत्वतः कर्जमाफीसहीत बहुतांश मागण्या मान्य केल्या.

या यशाला अनेक कंगोरे आहेत. इतिहासात पहिल्यांदाच सर्व शेतकरी संघटना आणि नेते खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले होते. ही भविष्याची नांदी आहे. आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेल्या बळीराजाला आपण अजस्त्र सरकारविरोधात लढू शकतो आणि जिंकू शकतो हा नवीन जगण्याचा आशावाद मिळालेला आहे. सरकारलाही आता आपण शेतकऱ्यांना टाळून आणि नाडून धोरणे ठरवू शकत नाही याची जाणीव झाली असेलच. स्वतःच्या न्याय्य हकांसाठी मैदानात उतरलेल्या सर्व शेतकऱ्यांचे, संघटनांचे आणि नेत्यांचे मी जाहीर आभार मानतो. हा विजय खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या लढाईची आणि कट्टरवादाची सुरुवात आहे. कर्जमाफी हा वरवरचा आणि तात्पुरता उपाय आहे. शेतमालाला हमीभाव हेच शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचे मुळ आहे. आणि सहजासहजी हमीभाव देणे सरकारला परवडणारे नाही. कारण महागाई वाढेल अशी सरकारला भीती वाटते. त्यामुळे यापुढील काळात अजून तीव्र लढाई सरकारविरोधात लढावी लागणार आहे. पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, शेती अवजारांचा प्रश्न हे सर्व प्रश्न मायबाप सरकारलाच सोड़वावे लागणार आहेत. नाहीतर पुन्हा एकदा संघर्ष अटळ आहे. कारण...

"लढाई अजून संपलेली नाही

बळीराजा अजून जिंकलेला नाही"

- अॅड. विवेक ठाकरे

Updated : 12 Jun 2017 6:11 AM GMT
Next Story
Share it
Top