Top
Home > मॅक्स किसान > सोयाबीन घ्या आणि माझं वीज कनेक्शन जोडून द्या !

सोयाबीन घ्या आणि माझं वीज कनेक्शन जोडून द्या !

सोयाबीन घ्या आणि माझं वीज कनेक्शन जोडून द्या !
X

हमी भावाने सोयाबीन घ्या आणि माझे थकीत देयक कापून माझ्या शेतातील तोडलेले वीज कनेक्शन जोडून द्या अशी आर्त हाक शेतकरी ग्यानबा जगताप यांनी महावितरणला घातली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची वीज देयके थकीत असल्याने आणि शेतकऱ्यांची शेती गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असल्याने शेतकऱी थकीत देयके भरत नसल्याने, महावितरणकडून सध्या राज्यात वीज कनेक्शन तोडली जात आहेत. हिंगोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. त्यामुळे विविध संघटना आणि विरोधी पक्षांकडून या संदर्भात आंदोलनाचे इशारे देखील देण्यात आले आहेत. मात्र आज इसापूर येथील शेतकरी, ग्यानबा दाजीबा जगताप यांनी हिंगोली महावितरणच्या दारात अनोखे आंदोलन केले असून, त्यांनी चक्क शेतातील सोयाबीन ट्रॅक्टरद्वारे महावितरण कार्यालयाच्या दारात, आणून 'माझे सोयाबीन हमी भावाने घ्या आणि त्यातून आलेल्या पैशामधून माझे थकीत देयके कापून घ्या' असे वीजवितरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

ग्यानबा जगताप यांच्याकडे महावितरणचे एकून थकीत देय्य ९० हजार रूपये एवढे बाकी असून हेच देयक ग्यानबा जगताप हामीभावाने सोयाबीन विकून चूकते करणार होते. मात्र सध्या सोयाबीनला बाजारात भाव नाही. तुटपूंज्या भावाने सोयाबीनची खरेदी चालू आहे. तर शासनाने अजून एकही सोयाबीन खरेदी केंद्र जिल्ह्यात चालू केले नाही. म्हणून आता महावितरणचे थकीत देयके कसे भरायचे. या काळजीने ग्यानबा जगताप यांनी दुपारी चक्क आपल्या शेतातील सोयाबीन ट्रॅक्टरद्वारे भरून महावितरणच्या कार्यालयाच्या दारात ठेवत 'साहेब माझ्या शेतातील हळद, गहू तूर या पिकांना पाणी द्यायचे आहे, पाण्याअभावी पीके करपली जात आहेत, तुम्ही माज्या शेतातील वीज कनेक्शन तोडले आहे, म्हणून माझे सोयाबीन हमी भावाने विकत घ्या आणि माझे थकीत देयक कापून माझे वीज कनेक्शन जोडून द्या' अशी विनवणी केली.

मात्र त्यांच्या या आर्त हाकेचा काहीचं उपयोग झाला नाही. कारण आंदोलक शेतकऱ्याला वीज वितरण अधिकाऱ्यांकडून 'आम्हांला वीज तोडण्याचे आदेश वरिष्ठांकडून आल्याने आम्ही काहीही करू शकत नाही' असे सांगण्यात आले. दरम्यान हे लक्षवेधी आंदोलन पाहण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात एकच गर्दी झाली होती. या अनोख्या आंदोलनाने महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी देखील उडाल्याचे पाहायला मिळाले.

Updated : 30 Oct 2017 11:29 AM GMT
Next Story
Share it
Top