Home > मॅक्स किसान > सावधान, विदर्भात अवघा 41 टक्के पाणीसाठा

सावधान, विदर्भात अवघा 41 टक्के पाणीसाठा

सावधान, विदर्भात अवघा 41 टक्के पाणीसाठा
X

परतीच्या पावसानं राज्याच्या बाहेर पाऊल टाकलं, आणि विदर्भात जलसंकटाची चाहूल लागली. संपूर्ण विदर्भातील धरणांमध्ये सध्या फक्त 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा संपताच याचे परिणाम दिसायला लागले आहेत. राज्याच्या उपराजधानीत महापालीका प्रशासनानं पाणीकपातीचं आवाहन सुद्धा केलंय, तर विदर्भातील इतर शहरांचीही परिस्थिती फारसी वेगळी नाही. धरणांमध्ये शिल्लक असलेल्या 41 टक्के पाण्यावर विदर्भातील जनतेला तब्बल आठ महिने आपली तहान भागवायची आहे.

महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत यंदा विदर्भात सर्वात कमी पाऊस पडला. यंदाच्या पावसाळ्यात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 65.4 टक्केच पाऊस पडला, तर अमरावती विभागातल्या पाच जिल्ह्यात सरासरीच्या 67.8 टक्के पाऊस पडला. यंदाच्या पावसाळ्यात विदर्भात सरासरीच्या तब्बल 35 टक्के कमी पाऊस पडला. यामुळेच धरणांमधील अवघ्या 41 टक्के पाण्यावर पुढचे आठ महिने विदर्भाची तहान कशी भागणार? हा मोठा प्रश्न आहे.

विदर्भातील अमरावती विभागात 10 मोठ्या धरणांमध्ये सध्या फक्त 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, गेल्यावर्षी याच वेळेस या धरणांमध्ये 74 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक होता. अमरावती विभागात 24 मध्यम धरणं आहेत, यात सध्या फक्त 47 टक्के आणि 409 लघू धरणांत फक्त 34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

नागपूर विभागाचीही परिस्थिती वेगळी नाही. नागपूर विभागात 16 मोठ्या धरणांमध्ये सध्या फक्त 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, गेल्यावर्षी या वेळेस या 16 मोठ्या धरणांमध्ये 51 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजे विदर्भातील सर्व धरणांमध्ये आज निम्मासुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही.

दरम्यान विदर्भात आता अपुऱ्या पावसाची धग पोहोचायला सुरुवात झालीय, नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच आणि कन्हान नदीवरील जलाशयात अत्यल्प पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीपुढे जलसंकटाचे चटके लागायला सुरुवात झालीय, त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर महानगरपालीकेनं लोकांना पाणी जपूण वापरण्याचा सल्ला दिलाय.

Updated : 28 Oct 2017 12:16 PM GMT
Next Story
Share it
Top