Home > मॅक्स किसान > फायद्याची शेती - झिरो बजेट फार्मिंग

फायद्याची शेती - झिरो बजेट फार्मिंग

फायद्याची शेती  - झिरो बजेट फार्मिंग
X

झिरो बजेट फार्मिंग ही संकल्पना आता राज्यात चांगलीच जोम धरू लागलीय. काही मोठ्या कंपन्या सुद्धा आता त्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून झिरो बजेट फार्मिंगचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना देत आहेत. असाच एक अनुभव सांगत आहेत मराठवाड्याच्या परभणीतल्या गंगाखेडचे शेतकरी रोहिदास नारायणराव निरस...

खरंतर ऐन दुष्काळाच्या काळात रिलायन्स फाउंडेशनची लोकं आमच्या पडेगावात आली. ते २०११ चं साल होतं. ते दुष्काळाचं तसं पहिलं वर्ष होतं. फाउंडेशनच्या लोकांनी त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती द्यायला सुरूवात केली. सुरुवातीला तर्क-वितर्क करणाऱ्या लोकांनी रिलायन्स फाउंडेशनच्या लोकांना नाकारलं. या कंपनीसून आपल्याला धोका आहे असं लोकांना वाटलं. पण रिलायन्स फाउंडेशनच्या लोकांनी त्यांची चिकाटी सोडली नाही. त्यांनी पुन्हा-पुन्हा गावात येऊन माहिती देणं सुरूच ठेवलं. त्यांच्या BIJ मिशनची माहिती दिली.

फाउंडेशनच्या लोकांच सातत्य पाहून मग मी आणि काही लोकांनी त्याचं ऐकण्याचं ठरवलं. तसंच ते सांगतील तसे प्रयोग करण्याची तयारी सुद्धा दर्शवली.

त्यानंतर मग एक-एक करून तब्बल ११० शेतकरी एकत्र आले आणि आम्ही त्यांच्या माहितीनुसार समिती तयार केली. समितीचं पॅन कार्ड आणि बँक खातं उघडलं. रिलायन्स फाऊंडेशन आणि समितीच्या प्रतिनिधींनी खात्याचे संचलन सुरू केलं. त्यानंतर सुरू झालं शेतकऱ्याचं ट्रेनिंग... पेरणीपासून काढणीपर्यंतचं आणि खतापासून फवारणीपर्यंतचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात आलं. फाउंडेशन देत असलेल्या ट्रेनिंग आणि सर्व माहितीच्या आधारे आम्ही जलसंधारण, पर्यावरण पोषण, स्वावलंबन या गोष्टी शिकलो. त्यानंतर सर्वांनी मिळून गावातल्या वेगवेगळ्या समस्या शोधल्या आणि आम्हीच त्यावर उपाय सुद्धा शोधले. नंतर कृती आरखडा तयार करून प्राधान्य क्रम लावले, त्यावर काम केलं.

सर्वात पहिला अंमल केला तो शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यावर. त्यानंतर घरचंच बियाणं वापरायला सुरूवात केली. मिश्र पिक पद्धती सुरू केली. तसंच

अमृतजल, दशपर्णी अर्क, लसुण- मिर्ची अर्क, वर्मी कंपोस्ट गांडूळ खत यांचा वापर केला. महागड्या रासायनिक खतं आणि किटकनाशकांना फाटा दिला. परिणामी तब्बल ५० टक्क्यांनी खर्च कमी झाला आणि खऱ्या अर्थानं आमच्या गावात परिवर्तनाचं युग सरू झालं.

त्याचबरोबरीनं गावात जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. परिणामी ऐन दुष्काळात सुद्धा आमच्या तालुक्यातल्या गावांमध्ये पाणी होतं.

काही गावात तर दुष्काळात सुद्धा गिरवीगार शेती होती. पाण्याच्या टँकरची आता गरज आमच्या गावामध्ये तरी उरलेली नाही. आजच्या घडीला आमचं जीवन बदललं आहे, आम्ही सकस भाजीपाला पिकवत आहोत. कडधान्याचं उत्पादन घेत आहोत. हायड्रोफोनिक्स चाऱ्यामुळे दुधाचं उत्पादन सुद्धा वाढलंय. बहुतांश शेतकरी रिलायन्स फाऊंडेशनच्या मदतीनं बायोगॅसनिर्मिती करत आहेत. त्यामुळे स्वयंपाकासाठीच्या इंधनाचा खर्च कमी झालाय.

गेल्या ३ वर्षांमध्ये मराठवाड्याला दुष्काळाच्या झाळा बसत असतांना आमच्या गावामध्ये मात्र सुकाळ दिसून येत होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐन दुष्काळाच्या काळात आमचं उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढले आहे. खर्च मात्र अटोक्यात आला आहे.

अल्पावधीचं आमच्या गावात झालेल परिवर्तन इतरत्र पसरलं. आजूबाजूच्या गावातली लोकं आमची शेती पाहण्यासाठी येऊ लागली. आमच्या गावात पण या अशी फाउंडेशनच्या लोकांना आमंत्रण मिळू लागली. एकएक करून गंगाखेड आणि पालम तालुक्यातली २८ गावं सध्या रिलायन्स फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली झिरो बजेट शेती करत आहेत.

विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी आता तालुका पातळीवर व्यासपीठ उघडलं गेलंय. त्यातूनच स्थापन झाली ती शेतकऱ्यांची कंपनी. स्वतःच्या मालाचं स्वतः मार्केटींग करण्यासाठी ही कंपनी सुरू करण्यात आलीय. एपीएमसीच्याकडून होणारी फिळवणूक आता या फार्मर्स फ्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून थांबलीय. या कंपनीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे.

गावाचा सासंकृतिक विकासही होतेय. शेतकरी दिवस, खेळ दिवस, महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम सुद्धा आम्ही साजरे करत आहोत. फाउंडेशनच्या मदतीमुळेच आज आमच्या तालुक्यातील शेतकऱ्याची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. येत्या काळात आमच्या शेतमालाचा आम्ही स्वतः ब्रँड बनवू अशी प्रेरणा त्यातून मिळाली आहे.

रोहिदास नारायणराव, पडेगाव, ता.गंगाखेड, जिल्हा परभणी

Updated : 25 Jan 2017 10:17 AM GMT
Next Story
Share it
Top