Home > मॅक्स किसान > शेतकऱ्यांच्या मृत्यूचे गुन्हेगार कोण?

शेतकऱ्यांच्या मृत्यूचे गुन्हेगार कोण?

शेतकऱ्यांच्या मृत्यूचे गुन्हेगार कोण?
X

यवतमाळ जिल्ह्यात 19 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 400 पेक्षा जास्त शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नागपूर जिल्ह्यातील नांद परिसरातही एका शेतकऱ्यांचा फवारणीमूळे मृत्यू झाला आहे. विदर्भात यंदा साधारण हजार शेतकऱ्यांना फवारणीमूळे विषबाधा झाली आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी 400 पेक्षा जास्त शेतकरी शेतमजुरांना फवारणीमूळे विषबाधा झाली आहे. सुरुवातीच्या काही दिवसांत तर सरकार आणि प्रशासनंही सुस्त होतं. मात्र मृतांचा आकडा वाढत गेला आणि माध्यमांनी प्रश्न उचलून धरल्यानं याचं गाभिर्य सरकारच्या लक्षात आलं. मग धावपळ सुरु झाली, पण तिही सरकारी पद्धतीनंच…

यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात 11 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 300 च्या वर शेतकऱ्यांना दाखल करण्यात आलं. इतकी मोठी आणीबाणीची परिस्थिती असताना या सरकारी रुग्णालयात काही अँटीडोट्स आणि औषधं उपलब्ध नव्हती. खुद्द मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. बाबा येलके यांनी ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषधं विकत आणण्यास सांगण्यात आलं. ज्या शेतकरी आणि शेतमजुरांकडे दोन वेळच्या जेवनाची सोय नाही, त्यांना चक्क विकत औषधी आणण्याचं धाडस या सरकारी यंत्रणेनं केलं. यावरुन शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत प्रशासनाची गंभिरता लक्षात येते. येवढं मोठं संकट असून सुरुवातीच्या काळात कृषीमंत्र्यांना यवतमाळ जिल्ह्यात येण्याची गरज भासली नाही. बरं गेल्यावर्षीही फवारणीमुळे सहा शेतकऱ्यांचा मृत्यू आणि पावणेदोनशेच्या वर शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती. त्यानंतर कुठलीही खबरदारी न घेता, यंदा पुन्हा शेतकऱ्यांच्या मृत्यूची सरकार वाट पाहत होतं का? हा प्रश्नंही या निमित्तानं उपस्थित होतोय.

यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन रिपोर्टमध्ये आहे. पण शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पिकांवर किटकनाशकं फवारतात, मग गेल्या दोन वर्षांत ही किटकनाशकं शेतकऱ्यांच्या जीवावर का उठली, याची कारणं काय आणि शेतकऱ्यांच्या मृत्यूचे गुन्हेगार कोण? हे समजावून घ्यायला हवं.

शेतकरी हत्याकांडाचा पहिला गुन्हेगार

भारतात 2002 पर्य़ंत आपला शेतकरी कपाशीच्या देशी वाणांची लागवड करायचा, या देशी कपाशीवर बोंडअळी आक्रमण करत होती आणि फवारणीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च यायचा. यातून सुटका व्हावी म्हणून 2002 साली आपल्या देशात कपाशीच्या बीटी वाणाला परवानगी देण्यात आली. बीटी म्हणजे Bacillus thuringiensis, जणुकीय बदल केलेलं कपाशीचं हे वाण. बोंडअळींचा प्रतिकार करेल असा जिन्स त्यात टाकून बीटी वाण विकसीत करण्यात आलं. सध्या देशात 90 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रात बीटी कपाशीची लागवड केली जाते. विदर्भात 95 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी बीटी कापूस लावतात. बीटीमुळे काही वर्षे अळ्यांकडून होणारं नुकसान कमी झाल्यानं कपाशीच्या उत्पादनात वाढ झाली खरी, पण आता बीटीवरही बोंडअळीचं आक्रमण सुरु झालं आहे. यवतमाळ जिल्ह्यात 19 शेतकऱ्यांचा मृत्यू हा बीटी कपाशीवर आलेल्या अळीच्या नियंत्रणासाठी फवारणीमुळेच झाला. त्यामुळे बीटी कपाशी ही यवतमाळ जिल्ह्यातील 19 शेतकऱ्यांच्या मृत्यूचं पहिलं कारण आहे.

शेतकरी हत्याकांडाचा दुसरा गुन्हेगार

कपाशीवर फवारणी करण्यासाठी पूर्वी शेतकरी हँडपंप वापरायचे, यामुळे फवारणी पंपाच्या नोझेलमधून मर्यादीत पाणी नेमकं कपाशीच्या झाडावर पडायचं, पण दोन-तीन वर्षांत फवारणीसाठी पेट्रोलपंप आणि बँटरीवर चालणाऱे पंप बाजारात आलेत. एखाद्या छत्रीच्या आकाराप्रमाणे या पंपातून विषारी द्रावण मोठ्या प्रमाणात बाहेर पडतं, आणि दिवसभर फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शरीरात स्कीन द्वारे, डोळ्यातून, नाकातून किंवा अन्ननलीकेद्वारे किटकनाशकांचा अंश जात असतो. यवतमाळ जिल्ह्यात मृत्यू झालेले 19 शेतकरी आणि विदर्भात फवारणीमूळे विषबाधा झालेले एक हजारच्या घरातील शेतकऱ्यांपैकी जास्तीत-जास्त जणांणी याच प्रकारच्या फवारणी पंपाचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या या फवारणी पंपाना वापरण्याची परवानगी

कुणी दिली, याची माहिती ना तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आहे, नाही कृषी विद्यापीठांकडे. या दोन्ही विभागाचं नेमकं काम काय हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. जर या फवारणी पंपांची तपासणी झाली असती तर कदाचीत यवतमाळच्या 19 शेतकऱ्यांचे जीव वाचले असते. पण कामाची सवय नसलेल्या कृषी विद्यापीठांना आणि शेतकऱ्यांच्या बांधापासून कोसो दूर राहणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना यासाठी वेळच नाही.

विषारी किटकनाशकं

विदर्भात यवतमाळसह नागपूर, वर्धा, अकोला जिल्ह्यातंही फवारणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा झालीय. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे किटकनाशकांचा अतिवापर. पिकांमध्ये धोक्याची पातळी ओलांडली की फवारणी करा, धोक्याची पातळी ओलांडली हे कसं ओळखायचं, याची माहिती कृषी विद्यापीठांच्या कपाटातील पुस्तकांमध्ये लिहून ठेवलीय, पण आजपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्य़ंत ती माहिती पोहोचली नाही. कृषी विभागाला तर याची माहिती शेतकऱ्यांना द्यायला वेळच नाही. त्यामुळे शेतकरी वारेमाप किटकनाशकांचा वापर करतात. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोनोक्रोटोफॉस, पोलो, पुलीस, सायपरमेथ्रीन यासारखी किटकनाशकं मिश्रण करुण फवारली. 10 लिटर पाण्यात ज्या औषधांचं प्रमाण 5 मिली असायला हवं, तेचं किटकनाशक अळ्यांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी 10 मिली वापरलं… शेतकऱ्यांकडून ही विषाची परीक्षा सुरुच आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बरं, कुठली किटकनाशकं घातक आहे, याची माहिती सरकारदरबारी कधीच पोहोचलीय, पण कॉर्पोरेट कंपण्यांचा निव़णुक फंड आपल्या नेत्यांना या घातक किटकनाशकांवर बंदी घालू देत नाही. मोनोक्रोटोफॉस या जहालकिटकनाशकावर बंदी घाला, अशी शिफारस WHO ने कधीच केलीय. पण त्याबाबत ना काँग्रेसच्या काळात निर्णय झाला ना आता एनडीएच्या काळात. आता तरी 19 शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर विषारी किटकनाशकांवर बंदी घालण्याची नितांत गरज आहे.

शेतकऱ्यांना सेफ्टी कीट कोण देणार?

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फवारणी करताना सेफ्टी कीट मिळण्यासाठी 19 शेतकऱ्यांना आपला जीव द्यावा लागला. त्यानंतर सेफ्टी कीट देण्याचा निर्णय झाला. सरकारने हा निर्णय आधीच घेतला असता, तर आज 19 शेतकरी जीवंत असते शिवाय विषबाधा झालेले इतर शेतकरीही सुरक्षित असते. फवारणी करताना डोक्यावर कापड, मास्क, डोळ्यांवर गॉगल, हातमोजे, पाययमोजे संपुर्ण शरिर

झाकेल असे कपडे असणं गरजेचं आहे. ज्या शेतकरी आणि शेतमजुरांना दोन वेळेचं जेवणंही कठिण आहे, ते शेतकरी सेफ्टी कीट घेवू शकत नाही, अशा स्थितीत शेतकऱ्यांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना सेफ्टी कीट देण्याचा निर्णय सरकारनं घेणं अपेक्षित आहे. कपाशीची 5-6 फुटांपर्यंत वाढ झाली आहे. सहा फूट उंचीच्या कपाशीला फवारणी करताना किटकनाशकांचे अंश शेतकऱ्यांच्या नाकाडोळ्यात सहज जातात. यवतमाळच्या 19 शेतकऱ्यांच्या मृत्यूमागचं हे महत्त्वाचं कारण आहे. सेफ्टी कीटमुळे या शेतकऱ्यांचा जीव आपण वाचवू शकलो असतो.

बोगस बियाणांवर नियंत्रण कुणाचं

भारतात बोलगार्ड 02 हे बीटी कपाशीचं बियाणं वापरण्याची परवानगी आहे. पण अधिक उत्पादन मिळते असं आमिष दाखवून बेकायदा बोगस बीजी-03 बियाण्याची विक्री यंदा झाली. यवतमाळ जिल्ह्यातले अनेक शेतकरी याला बळी पडले. आता या बोगस बियाण्याच्या कपाशीवर आलेल्या किडींचं नियंत्रण करताना शेतकऱ्यांना विषाशी खेळावं लागतंय. या बोगस बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कृषी विभागाच्या गुणनियंत्रण कक्षाचं आहे. प्रत्येक जिल्ह्यात गुणनियंत्रण अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम असते. पण राज्यभरातल्या या अधिकाऱ्यांना बोगस बियाणं आढळलं नाही. किंवा तोडपाणी करुन अशी प्रकरणं मिटवल्याचाही शेतकऱ्यांचा आरोप आहे.

गजानन उमाटे, नागपूर

Updated : 6 Oct 2017 12:19 PM GMT
Next Story
Share it
Top