Home > मॅक्स किसान > शेतकरी संपाचा 'सोशल' 'अंगार' !

शेतकरी संपाचा 'सोशल' 'अंगार' !

शेतकरी संपाचा सोशल अंगार !
X

शेतकरी आंदोलनाचा लढा हा रस्त्यावर जितक्या आक्रमकपणे लढला जात होता, तितकाच किंवा त्याहून आक्रमक पद्धतीनं तो सोशल मीडियावर आणि तोही साचेबद्ध पद्धतीनं लढला जात होता. यात सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती बळीराजाच्या पुत्रांनी. हातात असलेला फोन केवळ बांधावर गाणी ऐकायला नसतो तर त्याचा वापर विधायक मार्गासाठी करता येतो, हे ग्रामीण भागासह अवघ्या महाराष्ट्राला समजलं. कारण याच सोशल मीडियाचा वापर आजवर आपल्याकडे दंगली भडकवण्यासाठी केला गेला होता. पण हा काळाकुट्ट इतिहास ग्रामीण भागातील नेटिझन्सनी मागे पडायला भाग पाडलं.

एक जूनपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं वारं पुणतांब्यापासून महाराष्ट्रभर पसरलं अन् महाराष्ट्रतील शेतकरी पहिल्यांदा संपावर गेला. शेतकरी संप ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरची पहिलीच घटना. आंदोलनाकडे इव्हेंट म्हणून बघणाऱ्या राजकारण्यांना बळीराजाने वेगळाच धडा शिकवला, तो शेतकऱ्यांच्या एकीचा. जो केवळ दिवंगत शेतकरी नेते शरद जोशींच्या काळात मिळाला असावा. शेतकऱ्यांच्या मागण्या तशा माफक आणि नेहमीच्याच होत्या. कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्या. पण यातील पहिली वरवर भावनिक वाटत असली तरी त्याला अनेक कंगोरे होते. त्याचं मुख्य कारण म्हणजे राज्याच्या तिजोरीत असलेला खडखडात. आधीच साडे तीन लाख कोटींचं कर्ज आणि त्यात हा नवा भार, सरकारला पेलणारा नाही, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. कारण पैशाचं सोंग आणता येत नाही, हेच खरं. दुसरी महत्वाची मागणी म्हणजे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणं, पण हा निर्णय केंद्राशी निगडीत असला तरी देशातील महत्वाचं राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राचा दबाव महत्वाचा असेल. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची इत्थंभूत माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरवली गेली. अहवालातील मुद्दे सविस्तरपणे व्हायरल केले गेले, जे ग्रामीण भागातील 'जीन्स' घातलेल्या 'फार्मर'नं शक्य तितके फॉरवर्ड केले. ज्याचा थेट परिणाम सामान्य शेतकऱ्यांच्या मनावर झाला आणि तो तळमळीनं या क्रांतीत सहभागी झाला. आंदोलनानं 'ग्रीप' घेतली ती इथूनच.

मराठा क्रांती मोर्च्यावेळी ही सोशल मीडियाची क्रांती अनुभवायला मिळाली होती. आंदोलनाचं पुढे काय झालं हा प्रश्न अनुत्तरित असला तरी या नव्या माध्यमाच्या ताकदीला अनेकांनी गांभीर्याने पाहिलं, त्यावर विचारही केला.

शेतकऱ्यांचा हा संप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असल्याचंही जाणीवपूर्वक या माध्यमातून पसरवलं गेलं, पण त्यालाही या 'जीन्स पॅन्ट'वाल्या शेतकऱ्यांनी जोरदार चपराक लावली. या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून आखलेले आणि नंतर उघडे पडलेल्या डावपेचांचा सोशल मीडियावर जो काही पर्दाफाश झाला. त्यामुळे दोघांना तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल झालं. अर्थात हे महाराष्ट्राला शोभणारं नसलं तरी तो शेतकऱ्यांचा राग असणं, स्वाभाविक होतं. बच्चू कडू, राजू शेट्टी आणि आघाडीनं कर्जमाफीसाठी आपापल्या मार्गानं लढा दिला. पण त्याला यश आलं नाही, त्याची कारणं राजकीय तर होतीच पण जो काही 'अंगार' नव माध्यमातून असायला हवा होता, तो दिसला नाही. पण या आंदोलनात वेगळं घडलं म्हणून यश पायापाशी आलं.

बरं, या सोशल मीडियातील क्रांतीची बीजं गेल्या तीस-चाळीस दिवसांपासून रोवली जात होती. सोशल मीडियावर शेतकऱ्याचं साचेबद्ध एकत्रिकरणं सुरू होतं अगदी फोटोपासून ते मागण्याची सनद करण्यापर्यत सगळं 'ट्रेंड' कसं होईल, याची काळजी घेतली जात होती. आंदोलन सुरू व्हायच्या दोन दिवस आधी म्हणजे ३० मे रोजी तर फेसबुक आणि ट्विटरवर 'मी शेतकरी' हा ट्रेंड जोरदार चालला आणि याच ट्रेंडनं विखुरलेले शेतकरी एकमेकाला जोडले गेले. त्यात भर पडत गेली ती आंदोलनाच्या पहिल्याच दिवसापासून. कारण प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या आंदोलनाचा फोटो आणि माहिती हॅशटॅगसह सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे फेसबुकवर सगळीकडे आंदोलनाच्या फोटोंचा धुमाकूळ होता. याला अचूक 'टार्गेट' करण्याचा मोठा प्रयत्न एका 'खास' टीमकडून करण्यात आला. त्यासाठी #Devendraforfarmers हा ट्रेंड प्रमुख बनवण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय यात ट्विट केले जात होते. मुख्यमंत्रीच कसे शेतकऱ्यांचे तारणहार आहेत, हे दाखवण्याचा अटोकाट प्रयत्न केला गेला. पण झालं उलटंच, हातानं भिंत अंगावर पाडून घ्यावी, असा अनुभव या टीमला आला. कारण यात ट्विट करणारे 'मराठी' नव्हते. परिणामी शेतकरी पोरांनी हेही प्रकरण उघडं पाडलं.

इतके दिवस सोशल मीडियाला फारसं गांभीर्याने न घेणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात या सोशल मीडियाच्या क्रांतीनं झणझणीत आंजण घातलंय. अरब राष्ट्रामध्ये जे सहा-सात वर्षांपूर्वी जे घडलं ते आता आपल्या महाराष्ट्रात घडतंय. तिकडच्या क्रांतीची तुलना थेट करणं, तसं बाळबोधच ठरेल. पण त्यादृष्टीने सकारात्मक पाऊल पडलंय, हेही नसे थोडके !

Updated : 12 Jun 2017 5:54 AM GMT
Next Story
Share it
Top