Home > मॅक्स किसान > शेतकरी कट्टरवाद हेच उत्तर .…

शेतकरी कट्टरवाद हेच उत्तर .…

शेतकरी कट्टरवाद हेच उत्तर .…
X

ज्या शेतकऱयांच्या, कष्टकऱयांच्या आणि कामगारांच्या हिताची भाषा बोलत देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकारचा राज्याभिषेक झाला तेव्हा देशात - राज्यात संपूर्ण परिवर्तनाचे वारे वाहू लागलेत असे वाटत होते. काँग्रेस सरकारने 60 वर्षात देश बरबाद केला होता त्यामुळे आता आलेले नरेंद आणि देवेंद्र सरकार सर्व जनतेचे तारणहार म्हणून आलेत आणि आता हे देश बदलून टाकतील असेच चित्र देशभरात सगळीकडे पसरले होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच भाषा प्रत्येकाच्या तोंडी होती हे वास्तव होते. मात्र सत्तेवर बसल्यानंतर नेते आणि राज्यकर्ते कसे मस्तवाल होतात आणि जनतेच्या भावनांची आणि प्रश्नांची कशी माती होते याचे धडधडीत उदाहरण म्हणजे सध्याचे भाजप सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी सर्व प्रचारसभांमध्ये आपण सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना किमान 50 टक्के नफा पकडून हमीभाव देणार, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार, शेतकऱयांना बाजारपेठा उपलब्ध करून देणार यांसह अनेक आश्वासने दिली होती. मात्र, सत्तेच्या सारीपाटाला 3 वर्षे उलटून गेल्यावरही सरकारने आपणच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांच्या नावाने आलेले हे सरकार व्यापाऱयांचे कधी झाले हे कळले सुद्धा नाही. भात पिकवला, तूर पिकवली, कांदा पिकवला, ऊस पिकवला, कापूस पिकवला, सोयाबीन पिकवला... सर्वच पिके घेऊन पाहिली पण कशालाही भाव नाही अशी विदारक परिस्थिती आहे.

गेल्या वर्षी तुरीचा तुटवडा निर्माण झाला आणि तुरीचे भाव गगनाला भिडले. आणि मोदींनी रेडिओवर "मन की बात" करत देशवासियांना तूर पिकवण्याचे भावनिक आवाहन केले. शेतकऱयांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला ओ देत तुरीचे भरघोस उत्पादन घेतले. मात्र सरकारने माती खाल्ली आणि तुरीची खरेदी करणेच बंद केले आणि शेतकऱयांची पूर्ण नाकाबंदी केली. हवालदिल झालेले शेतकरी आंदोलने करत सरकारवर तुरखरेदीसाठी दबाव टाकत होते. आणि इकडे दानवेसारखा दानव शेतकऱ्यांच्याच मनगुटीवर बसत अन्नदात्याला "साले" म्हणून हिणवत शेतकऱयांच्या जखमांवर मीठ चोळत होता. दानवे फक्त येणाऱ्या प्रत्येक सरकार नावाच्या पोलादी व्यवस्थेची एक कडी आहे. सर्व सरकारेच व्यापाऱयांची बटीक बनून शेतकऱयांच्या जीवावर उठली आहेत.

आता यावर संपूर्ण क्रांतीचा एकच उपाय राहिला आहे तो म्हणजे आमदार बच्चू कडू यांनी सांगितलेला "शेतकऱयांचा कट्टरवाद". मोदी सरकारने शेतमालाच्या हमीभावाची आणि स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीची दिलेली आश्वासने हवेत विरल्यानंतर शेतकऱयांच्या झालेल्या घोर फसवणुकीविरोधात आमदार बच्चू कडू यांनी नागपूर ते वडनगर (CM to PM) असा भव्य "शेतकरी आसूड मोर्चा" काढला होता. नागपूरपासून महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमधून निघालेल्या या आसूड मोर्चाला शेतकऱयांचा, कष्टकऱयांचा आणि तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात होणाऱ्या सभांना हजारोंच्या संख्येने गर्दी होत होती. एका अपक्ष आमदारांच्या आसूड यात्रेला मिळणारा हा प्रतिसाद खरंच अचंबित करणारा होता. प्रत्येक सभेत आमदार बच्चू कडू मोदी सरकारने आणि आतापर्यंतच्या सरकारांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणुकीविरोधात आणि लुटीविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडत होते. गेल्या साठ वर्षात शेतकऱयांच्या, कष्टकऱयांच्या आणि कामगारांच्या नावाने निवडून येणारी सरकारे सत्तेवर बसताच व्यापाऱ्यांची कशी झाली. प्रत्येक सरकारने उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव देऊन आजपर्यंत शेतकऱयांची कशी लूट केली. आणि या लुटीचे आकडे हजारो कोटींमध्ये कसे आहेत हे पुराव्यांसहित पटवून दिले. देशात तुरीचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला तेव्हा सरकारने विदेशातून 18 हजार रुपये क्विंटलने बंपर तूर खरेदी केली. मात्र शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तुरीला सरकार साडेतीन हजार रुपये क्विंटल भाव देते हे लुटीचे अर्थशास्त्र जेव्हा बच्चू कडुंनी शेतकऱयांना पटवून दिले. तेव्हा शेतकऱयांच्या हृदयात कालवाकालव होत होती. "आम्हाला कर्जमाफीही नको…. सरकारने आतापर्यंत केलेल्या लुटीचा हिशेब द्यावा; आम्हीच सरकारला कर्ज देऊ" असे बच्चू कडू सभांमध्ये संतापून सांगत होते.

"आता शेतकऱयांनी लाचार नाही तर कट्टर झाले पाहिजे. तुम्ही धर्माचा कट्टरवाद पाहिला असेल, जातीचा कट्टरवाद पहिला असेल आता शेतकऱयांचा कट्टरवाद पाहा... धर्माच्या नावाने एक माणूस मेला तरी दंगे होतात. इथे आतापर्यंत साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण, कोणीच का पेटून उठत नाही?" असा सवाल करत बच्चू कडू यांनी "बस झाला आता जातीवाद आणि धर्मवाद...आता शेतकरी हाच आमचा धर्म आहे आणि त्यांचे हित हाच आमचा कट्टरवाद असेल," अशी नव्या विचारांची मांडणी केली. "आमची लूट करणाऱ्याविरोधात, फसवणूक करणाऱ्यांविरोधात आम्ही आता पेटून उठणार आहोत. आता आत्महत्या बस झाल्या. आपल्या जीवावर बसलेल्या सरकारच्या छाताडावर बसायची वेळ आली आहे ", असे शेतकरीराजाला पटवून आणि पेटवून देत त्यांनी "शेतकरी कट्टरवादाची" हाक दिली आहे. "आम्ही आधी गांधींची भाषा बोलतो; मग भगतसिंगांची भाषा बोलतो. बहिऱ्या झालेल्या सरकारला जागे करायला "धमाकेकी" जरूरत है. त्यामुळे आम्ही मंत्रालयावरही बॉम्ब टाकायला मागेपुढे पहाणार नाहीत.." असे बच्चू कडू यांनी वेळोवेळी सरकारला ठणकावून सांगितले.

आमदार बच्चू कडू यांनी आसूड यात्रेत सांगितलेला "शेतकरी कट्टरवाद" हाच शेतकऱयांच्या आजच्या विपन्नावस्थेवरचा जालीम उपाय आहे. येणारी प्रत्येक सरकारे ही केवळ उद्योजकांसाठीच काम करतात. शेतकऱयांच्या मरण्यावरच सरकारं, उद्योजक जगत असतात हे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. कांद्यावर, कापसावर निर्यातबंदी, मात्र मसाल्यांच्या पदार्थांवर- कापडावर निर्यातबंदी नाही. ही शेतकरी मारून उद्योजक जगवण्याचीच धोरणं आहेत. शेतकरी सुखी झाला तर सरकारला, कारखानदारांना जमिनी मिळणार नाहीत, स्वस्तात शेतकऱयांची लूट करता येणार नाही. हेच शेतमालाला भाव न देण्यामागचे आतापर्यंतचे षडयंत्र आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकऱयांनी संघटित होऊन आमदार बच्चू कडू यांनी सांगितलेल्या शेतकऱयांच्या कट्टरवादाचा नवा मार्ग स्वीकारला पाहिजे. मार्ग खडतर आहे पण रोज मरण्यापेक्षा एकदाच काय ती आरपारची लढाई लढू. जिंकलो तर जन्माचे सार्थक होईल. पुन्हा एकदा शेतकरी राजाला सोन्याचे दिवस येतील...

चला... पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली....!!

-- अॅड. विवेक ठाकरे

Updated : 18 May 2017 7:29 PM GMT
Next Story
Share it
Top