Home > मॅक्स किसान > शेतकरी आत्महत्यांची वेटिंग लिस्ट

शेतकरी आत्महत्यांची वेटिंग लिस्ट

शेतकरी आत्महत्यांची वेटिंग लिस्ट
X

शेतकरी आत्महत्यांची वेटिंग लिस्ट वाढत आहेत. मुख्यमंत्री साहेब, जरा अभ्यास लवकर उरका. अभ्यासाचा एक दिवस राज्यात एक-दोन शेतकऱ्यांचा जीव घेवून जातोय. त्यामुळे कळकळीची विनंती आहे. अभ्यासात तुम्हाला किती मार्क्स मिळाले, हे शेतकरी विचारणार नाही. शेवटी तुमच्या गुणपत्रिकेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा गुणांपेक्षा मोठा नसायला हवा. तुम्ही २०१९ च्या निवडणुकीच्या परिक्षेत पास होण्यासाठी अभ्यास सुरु केला आहे, याची जाणीव सर्वांनाच आहे. आमचे शेतकरी पण आडाणी नाहीत. त्यामुळे अभ्यास लवकर उरकून तुम्ही कर्जमाफी करा, आमचा शेतकरी २०१९ च्या परिक्षेत तुम्हाला विसरणार नाही.

साहेब, तुम्ही अभ्यासात व्यग्र होतात, म्हणून तुम्हाला फार डिस्टर्ब न करता एकट्या मार्च महिन्यात २२५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली जिवनयात्रा संपवली. या शेतकऱ्यांच्या ‘मैतीत’तल्या डफऱ्याचा आवाजही आम्ही तुमच्या कानापर्यंत पोहोचू दिला नाही. लोडशेडिंगच्या काळोखात आणि दारिद्र्याच्या अंधारात २२५ शेतकऱ्यांच्या जळत्या सरणाचा उजेडही तुम्हाला दिसू दिला नाही. लिपलिपणाऱ्या पणत्यांसारखे शेतकरी गेलेत आणि राख न उडवता त्यांचे सरणंही विझले. ‘आम्ही मातीतच जन्मलो आणि जीवनाची माती करत एंडरिंग प्यालो’ म्हणत, एका महिन्यात सव्वादोनशे शेतकरी जग सोडून गेलेत. साहेब, तुमचं सरकार त्यांना एक लाख रुपये देवून मोकळं होणार. पण या ‘मेलेल्या’ शेतकऱ्यांची मुलं-मुली सध्या काय करतात, त्यांच्या विधवा बायका सध्या काय करत आहेत, घरच्या कर्त्या पुरुषाचा व्यवस्थेनं बळी घेतला, त्याची विधवी पत्नी मरणाच्या दारात उभी आहे, थोड्याच दिवसात शाळा सुरू होणार आहे, त्याच्या मुलांना शिकायचं आहे, पण पाटी-पुस्तकाला पैसै कुठून आणायचे, आईचं मंगळसूत्र गहाण ठेवून शाळेची सोय झाली, तरीही बाबांनी आत्महत्या केल्यानंतर खुट्याला बांधलेली बैलाची जोडी रोज हंबरडा फोडते. मग त्या मुलांचं शाळेत मन कसं रमणार? ‘साहेब, आमची शाळा जावू द्या, पण तुम्ही अभ्यास लवकर करा, आमच्या वडीलांसारखी वेळ कुणावर येऊ देऊ नका’ कारण की वेटिंग लिस्ट मोठी आहे.

साहेब, तुमचा अभ्यास सुरू आहे. आणि इकडे शेतकरी आत्महत्यांची भलीमोठी वेटिंग लिस्ट आहे. लिस्ट मध्ये कुणाचं नाव आज लिहीलंय, तर कुणाचं उद्या. आजचं जाणार हे नक्की, किमान उद्याचा जगेलं याचं तरी बघा प्लिज. गेल्यावर्षी वेटिंगलिस्टवर असलेले यंदा गेलेत, २०१७ वर्ष उजाडलं तेव्हापासून ७०० च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता जूनपासून जे वेटिंग लिस्टवर आहे त्यांचं बघा. मे-जूनमध्ये शेतीच्या पेरणीचं टेन्शन, मुलांचं शिक्षण आणि तुरीला (शेतमालाला) भाव न मिळाल्यामुळे मुलीच्या राहिलेल्या लग्नाची शेतकऱ्यांना मोठी चिंता आहे, हिच चिंता शेतकऱ्याला चितेवर नेत असते. म्हणूनच याकाळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात.

साहेब, तुमच्या जलयुक्त शिवार योजनेनं काही भागात पाणी अडलं... तर काही भागात पैसे मुलरे. पाणी अडलं तिथं चांगलं पीक आलं आणि पैसा मुरला तिथे बिल्डिंगी उभ्या राहिल्या. पण त्या पिकाला बाजारात भाव नाही. मग वाढलेल्या उत्पादनाचा फायदा काय? शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करण्याची भाषा गल्लीपासून तर दिल्लीपर्य़ंत केली जाते. पण कसं ते माहित नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना वाटतंय ‘यांचा नाही, आमचा बाप शेतात राबतोय, बापाला रक्ताचं पाणी करावं लागतंय, तो शेती पिकवतो सुद्धा, यंदा तुरी दुप्पट पिकवल्या, पण फायदा काय? आम्हीच झालो ‘साले’ शेवटी आणि तुम्ही दाजींचे कैवारी’ म्हणून शेतापर्य़ंत फक्त पाणी पोहोचवून काहीही होणार नाही, शेतमालाला भाव द्या. आणि तो भाव पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दानुसार द्या.

साहेब, १ जूनपासून शेतकरी संपावर जाण्याची चर्चा गावा-गावात पोहोचली आहे. पण आमचे शेतकरी आत्महत्येच्या वेटिंगलिस्टवर असूनही कामबंद करु शकत नाही. कामबंद केलं तर ‘खुट्याला’ बांधलेली बैले चारायचे कुणी आणि तहानलेल्या पिकांना पाणी पाजायचं तरी कुणी? पण फार खुश होऊ नका. आमच्या शेतकऱ्यांचा संप काम बंद करण्याचा नाही, तर अन्नधान्याची नाकेबंदी करण्याचा असेल, प्रत्येक शेतकरी ठरवेल कुटुंबाला हवं तेवढंच अन्नधान्य पिकवायचं... आणू द्या या सरकारला आफ्रीकन तुरडाळ, अमेरिकेतला गहू-निलो, आणि चायनाचा तांदूळ. हा संप महागात पडणारा असेल. म्हणून शेतकरी अशा संपावर जाणार नाहीत, याची काळजी घ्या... अभ्यास उरका आणि कर्जमाफी करा. वेटिंग लिस्ट मोठी आहे.

साहेब, काँग्रेस-राष्ट्रवादीनं २००९ च्या निवडणुकांचं गणित पाहून २००८ साली कर्जमाफी केली. पुढच्या वर्षी शेतकरी आत्महत्या कमी झाल्या होत्या. ७२ हजार कोटींच्या त्या कर्जमाफीनं हजारो शेतकऱ्यांचे जीव वाचले. आता ते तुमच्या हातात आहे. वेळ घालवू नका. कारण तुमच्या अभ्यासाचा एक दिवस म्हणजे आमच्या एक-दोन शेतकऱ्यांचं सरण रचणारा ठरतोय. शेतकरी आत्महत्यांची वेटिंग लिस्ट मोठी आहे.

गजानन उमाटे, ब्युरो चीफ, महाराष्ट्र१, नागपूर

९९२०७८५५२६

Updated : 31 May 2017 6:17 AM GMT
Next Story
Share it
Top