Home > मॅक्स किसान > "शून्य खर्चाची नैसर्गिक शेती हेच उत्तर"

"शून्य खर्चाची नैसर्गिक शेती हेच उत्तर"

शून्य खर्चाची नैसर्गिक शेती हेच उत्तर
X

गेली काही वर्ष राज्यभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु असताना अचानक वरुण राजाच्या अगमनाच्या वेळी राज्यभरातील शेतकरी संपावर जाणे ही चांगली गोष्ट नव्हती. जगाचा पोशिंदा संपावर जाणे भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक काळा अध्याय असून देशभरातील शेतकरी प्रचंड अडचणीत आणि संकटात सापडल्याचे ते लक्षण आहे. यावर केवळ कर्जमाफी करून भागणार नाही तर भविष्यातील या संकटाकडे दुर्लक्ष न करता त्याची गंभीर चिकित्सा करत यावर कायमस्वरूपी दीर्घकालीन उपाययोजना करणे हे इथल्या मायबाप सरकारचे, सुजाण जनतेचे आणि बळीराजाचे आद्य कर्तव्य आहे. तरच आपली शेती, माती, नीती आणि नियती सुधारेल; अन्यथा आपल्याला वाचवायला साक्षात ब्रम्हदेव आला तरी आपल्याला कोणी तारू शकत नाही हे आजचे अत्यंत कटु वास्तव आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर उपाययोजना करण्यासाठी सरकार, विचारवंत, कृषी अभ्यासक, संशोधक डोके आपटत असताना एक योद्धा संन्यासी गेली 30 वर्ष या प्रश्नावर अखंड - अविरत - अविश्नांत काम करत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात हजारो - लाखो शेतकऱ्यांची निवासी प्रशिक्षण शिबिरे घेत त्यांना आत्महत्यांच्या खोल गर्त्येतून बाहेर काढत आहे. शेती, निसर्ग, पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीचे जनक "पद्मश्री" सुभाष पालेकर असे या 70 वर्षीय महात्म्याचे नाव. महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत सापडला असताना आणि सरकार कर्जमाफीच्या नावाखाली वरवरच्या उपाययोजना करण्यात गुंतले असताना आंध्र प्रदेश सरकारने सुभाष पालेकर गुरुजींना राज्याचे मुख्य कृषी सल्लागार नेमत आपल्या राज्यातील शेती 100 टक्के नैसर्गिक करण्याची जबाबदारी सोपवली आहे. यासाठी आंध्र प्रदेशातील अमरावती जिल्ह्यात त्यांना 100 एकर जागा उपलब्ध करुन देत नव्या 'नैसर्गिक शेतीच्या कृषी विद्यापीठा'ची घोषणासुद्धा केली आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी पालेकर गुरुजी कुठलाही आर्थिक लाभ वा पगारही घेणार नाहीत. 'अमरावती ते अमरावती' असा या कृषी महात्म्याचा संघर्षमय, प्रेरणादायी आणि रोमहर्षक प्रवास पूर्ण झाला आहे. हा केवळ योगायोग नाही तर 'नियतीचा आणि नितिचाच' खेळ आहे हे स्पष्टपणे याठिकाणी नमूद करावे लागेल. ज्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात ते जन्मले त्या राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील सरकारला आणि सरकारसोबत या प्रश्नांची उकल करू पहाणाऱ्या मीडियाला त्यांची साधी दाखलही घ्यावीशी वाटली नाही यासारखे आपले कुठलेही दुर्दैव नाही. आपल्यासारखे नाठाळ आपणच आहोत. मात्र "कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही" हेही या बुद्धिवादयांना कुणीतरी सांगण्याची वेळ आता येवून ठेपली आहे.

कृषी पदवीधर असणाऱ्या सुभाष पालेकरांनी 10 वर्ष आपल्या शेतीत विविध प्रयोग केले. खरंच आपल्या शेतीला आणि पिकांना वरुन देण्यात येणाऱ्या रासायनिक खतांच्या मात्रांची गरज आहे का ? आपल्या काळ्या आईच्या उदरात खरेच इतक्या पोषण द्रव्यांची कमतरता आहे का? यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी संशोधन केले. फळझाडांना, पिकांना लागणारी पोषणद्रव्य, झाडांची अन्न निर्माण करण्याची प्रक्रिया, देशी आणि संकरीत बियाणांचा वापर, रासायनिक खते आणि औषधांचे परिणाम यांसारख्या विषयांवर शेकडो प्रयोग केले. सरकारची शेती धोरणे, हरित क्रांतीचे फायदे- तोटे, देशविदेशातील शेती, निसर्ग, पर्यावरण, परदेशी कंपन्या, भारतीयांची जीवनपद्धती यांचा खोलात जाऊन अभ्यास केला आणि याच्या आधारे जे सत्य सापडले त्याआधारावर त्यांनी "शून्य खर्चाच्या नैसर्गिक आद्यात्मिक शेतीचा" सिद्धांत मांडला. हा सिद्धांत आता भारतीय शेतीसाठी, मातीसाठी आणि भारतीयांसाठी वरदान ठरत आहे.

"शून्य खर्चाची नैसर्गिक शेती" म्हणजे घरच्या घरी तयार केलेली देशी बियाणी, खते, औषधे वापरत आपल्या शेतीतील उत्पादन खर्च संपूर्ण कमी करणे. एका देशी गाईच्या आधारे उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करत शेती करणे आणि मुख्य पिकाचा व शेतीचा खर्च इतर आंतरपिकांतून भागवणे. यासाठी पालेकर गुरुजींनी शेतीसाठी अमृत ठरणारे जीवामृत, घनजीवामृत, आच्छादन, वापसा पद्धती, दशपर्णी अर्क, निमस्त्र, ब्रम्हास्त्र, अग्निअस्त्र असे विविध प्रयोग सांगितले आहेत. ज्याच्या आधारे शेतकरी घरच्या घरी खते आणि कीटकनाशक बनवून आपली शेती सुधारू शकतो.

देशी गाईला भारतीय संस्कृतीत प्रचंड महत्व आहे. देशी गाईला गोमाता म्हणून गौरवण्यात येत आहे. ते तिचे धार्मिक महत्व आहे म्हणून नव्हे तर ते तिचे शेतीच्या - शास्त्राच्या आणि शरीराच्या दृष्टिने अन्योन्यसाधारण उपयुक्ततामुल्य आहे म्हणून पूर्वी राजांची श्रीमंती त्यांच्याकडे असणाऱ्या गोधनावरुन ठरवली जायची. एखादा राजा परकीय आक्रमण करायचा; तेथील गोधन चोरुन आणायचा आणि आपल्या संपत्तीत वाढ करायचा. भगवान श्रीकृष्णाचे गोकुळ दूधा - तुपाने समृद्ध होते. शेतकऱ्यांची श्रीमंतीही गोधनावरुन ठरवली जायची. शेतकऱ्यांच्या गोठ्यातील हे गोधन शुद्ध खतांचे आणि आरोग्याचे प्रचंड मोठे कारखाने होते. गाय, बैल हे शेतीसाठी - शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त पशू होते. त्यांची उपज खाण्यापिण्यासाठी व मटणासाठी कधीच केली जात नव्हती. मात्र आधुनिकतेच्या नावाखाली आणि बाजारू व्यवस्थेला बळी पड़त जास्त प्रोटिन आणि स्वस्त बीफ हवे म्हणून आपण पोटासाठी कत्तलखाने उभारत हे खतांचे कारखानेच उध्वस्त केले आहेत. पर्यायाने शेती, शेतकरी उध्वस्त झाला आहे. आपण मात्र गाय कापून खायची की नाही, गोमाता विरुद्ध गाय खाता या लढाईत आपण अडकलो असून यावरून धर्मयुद्ध पेटले आहे. तथाकथित बुद्धिवाद्यांनी आपली बुद्धी गहाण टाकली आहे आणि देश दुहेरी संकटात सापडला आहे.

भारतीय संस्कृतीतील देशी गाईंचे हे महत्व लक्षात घेत सुभाष पालेकरांनी देशी गाईवर संधोधन करत दुधा - तुपापेक्षा तिच्या शेण - गोमूत्रात किती ताकत आहे हे प्रयोगानिशी सिद्ध केले आहे. त्याआधारे त्यांनी शेतकऱ्यांना घरच्या घरी जीवामृत आणि घनजीवामृत, बीजामृत तयार करण्याचा फॉर्मूला दिला आहे. या जीवामृतामुळे शेतीचा पोत प्रचंड सुधारतो. झाडांना प्रचंड शक्ती आणि प्रतिकारशक्ती प्राप्त होते. बाहेरुन अतिरिक्त रासायनिक खते आणि किटकनाशके देण्याची अजिबात गरज उरत नाही. पालेकर गुरुजीनी घरच्या घरी तयार करायला सांगितलेली निमास्त्र, ब्रम्हास्त्र यांसारखी नैसर्गिक किटकनाशने, बुरशीनाशके प्रचंड उपयुक्त असून पिकांवरील रोगांचा आणि किडींचा समूळ नायनाट करते. शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी कुठल्याही प्रकारची निविष्टा, रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके बाजारातून विकत आणण्याची आवश्यकताच उरत नाही. बाजारातील लुटीपासून, दलालांपासून, खते - बियाणे- किटकनाशके तयार करणाऱ्या कंपन्यांपासून शेतकऱ्यांचा बचाव होतो. गावातला पैसा गावात रहातो.

पालेकर गुरुजींची महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश, तमिलनाडू, कर्नाटक, गुजरात या राज्यांसह देशभरात शेकडो शिबिरे होत असतात. 5, 10, 15 दिवसांच्या निवासी शिबिरांमध्ये एकाच वेळी दिड ते दोन हजार शेतकरी प्रशिक्षण घेत असतात. आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडूमध्ये तर हा प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांचा आकडा 5 ते 8 हजारांपर्यंत जातो. कुठलाही गाजावाज़ा न करता, प्रसिद्धी न करता, सरकारपुढे हात न पसरता अगदी 500 ते 1000 रुपये इतक्या नाममात्र दरात भोजन - निवासव्यस्थेसह शेतकऱ्यांची व्यवस्था केली जाते. कुठलाही बड़ेजाव न मिरवता, राजकीय थाटमाट न करता, शिबिरासाठी एक रूपयाही शुल्क न घेता सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पालेकर गुरुजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे पांढरे हत्ती ठरत असताना महाराष्ट्र सोडून आंध्र, केरळ, हिमाचल, तामिऴनाडू सहित अनेक कृषी विद्यापीठांमध्ये नैसर्गिक शेतीचा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. एकीकडे लाखो रुपये ख़र्चुन शासनाच्या शिबिरांकड़े शेतकरी फिरकतही नाहीत तर पालेकर गुरुजींच्या शिबिरांना हजारोंच्या संखेने मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. अतिशय शांततेत शेतकऱ्यांची शिवारक्रांती सुरु आहे. रासायनिक खते आणि केमिकल्सवर अघोषित बहिष्कार घालत ते मोठे देशकार्यही करत आहेत.

रासायनिक खते आणि केमिकल्सच्या प्रचंड वापराने आपले अन्नधान्य - शेतीही दूषित झाली आहे. देशात कँन्सर, मधुमेह, मेंदुचे विकार, रक्तदाब, हृदयविकार यांचे भयावह प्रमाण वाढले आहे. हरितक्रांतीचे अग्रणी राज्य पंजाब - हरियाणा बंजर आणि कँन्सरची भूमी बनले आहेत. त्यामुळे आता देशाचे आरोग्य सांभाळायचे असेल तर आपल्या ताटात विषमुक्त अन्न आले पाहिजे. पालेकर गुरुजींच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून देशात विषमुक्त अन्नाची चळवळही चालवली जात आहे.

आपल्या प्रत्येक शिबिरात पालेकर सरकारच्या दांभिकतेवर, कृषीविद्यापीठांच्या अपयशावर आणि बाजारू व्यवस्थेवर प्रहार करत असतात. " सरकारच्या आशिर्वादाने खते, बियाणे, औषधे कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या लूटीची व्यवस्था उभी केली आहे. हरितक्रांतिच्या नावाखाली पारंपारिक आणि नैसर्गिक शेतीव्यवस्था संपवून जमिनींना रासायनिक खतांच्या सवयी लावल्या. अधिक उत्पन्न मिळवण्याच्या हव्यासापोटी अधिक खतांच्या - औषधांच्या मात्रा दिल्या जाऊ लागल्या. अधिक खते औषधे देण्याच्या नादात शेतकरी कर्जबाजारी झाला. भिकेला लागला आणि देशभरात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु झाले. शेतकरी शोषणकारी व्यवस्थेचा बळी ठरला ". पालेकर गुरुजी जेव्हा लूटीचे अर्थशास्त्र मांडत असतात तेव्हा हा बळीराजा धीरगंभीर चेहऱ्याने सर्व ऐकत असतो. "आता ही लूट थांबली पाहिजे, शेतकऱ्यांनी बाजारातून काहीही विकत आणायचे नाही, खते, बियाणे - औषधे घरच्या घरीच तयार करायची आहेत. गावातला पैसा गावातच राहिला पाहिजे. शहरातला पैसा गावात आला पाहिजे आणि देशातला पैसा देशातच राहिला पाहिजे". पालेकर गुरुजी ग्रामविकासाचे तत्वद्यान मांडत असतात आणि समस्त शेतकरी वर्ग टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करत असतो.

बाजारात विकत मिळणारी महागड़ी रासायनिक खते, बियाणे, औषधे आज शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास बनला आहे. ही महागड़ी खते - बियाणे घेण्यासाठी शेतकरी बँकांची - सोसायत्यांची कर्ज घेतात. 20 ते 50 हजार रुपये घेतलेले कर्ज व्याजासहित लाख - दीड लाखांवर पोहोचते शेतकरी कर्ज़ाच्या खाईत लोटला जातो आणि हेच कर्ज त्याच्या गळ्यातील फास बनतो. रासायनिक खते- केमिकल कंपन्यांचे दलाल सरकार चालवतात, राजकारण्यांची घरे भरतात हे विदारक वास्तव आहे. महागड़ी औषधे, खते बियाणे विकून सिजेंटा, माईको, बायर, भारत फर्टिलायझर यांसारख्या अनेक देशी - विदेशी कंपन्या गब्बर झाल्या. शेतकरी मात्र देशोधड़ीला लागला आणि आत्महत्यांच्या खाईत लोटला गेला.

आता तरी शेतकऱ्यांनी बदलले पाहिजे आणि स्वताःलाच कर्जाच्या खाईत लोटणारे दृष्टचक्र भेदले पाहिजे. पद्मश्री सुभाष पालेकर गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली शुन्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीची कास धरली पाहिजे. बाजारात मिळणाऱ्या महागडया रासायनिक खते - बियाणे - कीटकनाशकांवर बहिष्कार घातला पाहिजे. तरच शेतकरी कर्जमुक्त आणि स्वाभिमानाने जगू शकतो. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा पर्याय नाही. कर्जमुक्ती हाच खरा पर्याय आहे. कर्जमाफी मिळवून आपण एकवेळ कर्जमुक्त झालो पण देश कर्जाच्या खाईत लोटला जात आहे याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे.

कर्जमाफ़ीच्या नावाखाली सरकारची आणि विरोधकांची श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. सर्वजण आपल्या सोईचे राजकारण करणार पण मुळ प्रश्न अनुत्तरीतच आहे. कर्जमाफीने फक्त बँकांचा - सोसायटयांचा आणि सरकारचा खरा फायदा होणार आहे. नव्याने पिककर्जाच्या नावाखाली आत्महत्यांचा नवा फास शेतकऱ्यांच्या गळ्यात बांधला जाणार आहे. खते - किटकनाशके कंपन्यांना अनुदाने वाटली जाणार आहेत आणि शेतकरी आत्महत्यांसाठी शेतकऱ्यांच्याच जमिनी भुसभुशित केल्या जाणार आहेत. रात्र वैऱ्याची आहे, शेतकरी राजा जागा हो.

कर्जमाफीच्या नावाखाली सरकार सोईचे राजकारण करेलही पण या स्वाभिमानी शेतकरी राजाने विषमुक्त अन्न चळवळीत सामिल होत स्वहित आणि राष्ट्रहितही जपले पाहिजे. तरच उद्याचा आदर्श, स्वावलंबी आणि आरोग्यदायी भारत उभा राहिल !!

जय हिंद, जय किसान ..!!!

- अॅड. विवेक ठाकरे, मुंबई

8888878202

Updated : 29 Jun 2017 6:43 PM GMT
Next Story
Share it
Top