शिवार

शिवार
X

आता माणसासारखीच शेतीही बदलली आहे. सकस बियाणे जाऊन त्या जागी संकरित, सुधारित जातीची, कमी कालावधीत येणारी नवीन बियाणे आलीत. नैसर्गिक खते जाऊन रासायनिक खते आलीत. खतांसोबत नवीन तणेही आलीत. औषधांच्या मारल्या जाणाऱ्या फवाऱ्यामुळे आता तुडतुडे, भुंगे, टोळ, वाणीकिडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ते आता शेतातून पाहिल्यासारखे उडताना दिसत नाहीत. आधुनिक शेतीच्या नावाखाली आम्ही या नैसर्गिक वैभवाला कायमचं गाडून टाकतोय.

वैशाखाच्या महिन्यातलं ऊन अंग अंग जाळत जायचं. रापलेल्या जिवांची घालमेल व्हायची. मग शेतात राबणारी माणसं बांधावरच्या झाडाखाली जागोजागी कलंडलेली दिसायची. कुठूनतरी अचानक आकाशात ढगांची वेल जमू लागायची. वाऱ्याचा वेग शिवरातनं धावू लागायचा. आकाशात धुळीचे लोट पसरत जायचे. विजांचा प्रचंड कडकडाट करीत वळीव यायचा. माणसं गुराढोरासहित घराच्या ओढीनं गावाकडं धावत सुटायची. मातीचा सुगंध वाऱ्याच्या झुळकेसोबत पळत यायचा. ओढ्या वगळींना आलेलं गढूळ पाणी उतारानं सुसाट खळखळाट करीत वाहत जायचं. पांदीत चिखल व्हायचा. पाऊस ओसरायचा. पुन्हा रात्र झाली की विजांचा गडगडाट करीत पाऊस कोसळायचा. गावाबाहेरून वाहणारी नदी वाढणाऱ्या पाण्यासोबत फुगत जायची.

मग शेतीच्या कामांना जोर चढायचा. शिवारातनं माणसं दिसू लागायची. कुळव फिरू लागायचे. बायामाणसं कुळवाच्या मागं सड-काशी वेचायची. अन बगळे किडे टिपत राहायचे. बैलांना उद्देशून म्हटली गेलेली गाणी सारा आसमंत दणाणून सोडायची. घराघरात गाडग्या मडक्यात भरून ठेवलेलं बी-बियानं बाहेर निघायचं. तोपर्यंत मृग नक्षत्र निघालेलं असायचं. मागचा पाऊस सुरू व्हायचा. माती गारेगार होऊन जायची. ओलसर मातीला घात आली की शेतात पेरणीच्या कामांना वेग चढायचा. कुरीच्या चाढ्यावर मूठ धरली जायची. कुरीच्या मागं कासोटा घातलेल्या बायका मोगण घालत चालत रहायच्या. मधूनच पावसाचा शिडकावा होत राहायचा. मग डोक्यावर बारदाने पांघरली जायची. भिजून गेलेले बैलाचे जू फडक्यानं पुसलं जायचं. पुन्हा मोठ्यानं बैलांची नावं घेतली जायची. गाणी सुरू व्हायची. बघता बघता साऱ्या गावाची पेरणी संपून जायची. मग एखांद्या आडल्या नडल्या दावणीला जनावर नसलेल्या शेतकऱ्याची सगळे मिळून पेरणी करून द्यायचे.

मग काही काळानं शिवारातल्या मातीतून कोवळे अलगद कोंब तोंड वर काढू लागले की शेतकऱ्याच्या आनंदाला पारावर उरायचा नाही. बघता बघता सारी रानं हिरवीवार होऊन जायची. कोवळ्या पिकावरून थंडगार वारा वाहत राहायचा. बराच काळ गायब झालेल्या किड्या मुंग्या आता जाग्या झालेल्या असायच्या. त्या वाढण्याऱ्या पिकावरून खेळत राहायच्या. तुडतुडे, भुंगे, टोळ उडत राहायचे. भुईमुगाच्या शेतातून फिरणारा पैसा किडा हातात घेतला की गोल पैशासारखा ओंजळीत चिकटून बसायचा. माळावर पिवळी धमक सूर्यफूलं दिसू लागली की त्या शेतातून हमखास गोगलगाई फिरताना दिसायची. तिला स्पर्श करताच ती अंग आकसून घ्यायची.

पावसानं गावाबाहेची नदी दुथडी भरून वाहत जायची. ओढ्या वगळीना आता खळखळ करीत संथ पाणी वाहत राहायचं. मग त्या पाण्यात मासे खेकडे पकडायला वेग यायचा. पांदीतली घाणेरी मातलेली असायची. सोबत माळावर लाल, पिवळी धमक फुले उमललेली असायची. त्यावरून बागडणारी रंग बिरंगी फुलपाखरे चिमटीत पकडली की अलगद निसटून जायची. भोपळ्याच्या, गुळवेलीच्या, दोडक्याच्या, काकडीच्या वेली जागोजागी लगडलेल्या दिसायच्या. कुरणात गायी म्हशी चरायच्या. शिवारात भुईमुगाची फुले झडून, आरा सुटून त्यांना शेंगा लागलेल्या असायच्या. पोटऱ्यातनं हिरवीगार जोंधळ्याची कणसं फुटू लागायची. त्याच्यावरचा फुलोरा झडून गच्च भरलेल्या दाण्याचं कणीस मोत्यासारखं दिसायचं.

दिवाळीच्या आधी सुगी सुरू व्हायची. मग बाया माणसांची तारांबळ उडायची. म्हाताऱ्याकोताऱ्या माणसासहित भल्या पहाटे चांदणी उगवायला शेताकडं कामाची झुंबड उडायची. दसऱ्याला पूजलेली हत्यारे नव्या दमानं रानातनं खेळू लागायची. कापलेल्या बोटांना फडकी गुंडाळली जायची. एकमेकांना मदत करीत सुगी पुढे सरकत राहायची. मग शेतातल्या वस्तीवर खळी केली जायची. पाणी मारून रोळ फिरवून तुडवून तुडवून जमीन घट्ट केली जायची. शेणानं सारवलेल्या खळ्यावर जोंधळ्याची कणसं पसरली जायची. बैलांची जोडी दगडी रोळ खळ्याभोवती गोल गोल फिरवून टपोऱ्या कणसाच्या पिश्या करायचे. बायका उरलेल्या पिश्या बडावण्याने बडवयाच्या. गडीमाणसं माचव्यावर उभे राहून बुट्टी घेऊन वाऱ्यावर उफणणी करायचे. पांढऱ्या शुभ्र मोत्यासारखा दिसणारा जुंधळ्याचा ढीग मग पोत्यात भरला जायचा. उभी केलेली पोत्याची ठेल बैलगाडीची वाट पाहात घराच्या ओढीनं खळ्यात सांज होईपर्यंत उभी असायची. गाव धन धान्यांनी भरून जायचे. तोपर्यंत थंडीची चाहूल आलेली असायची. शेकोट्या पेटल्या जायच्या. सारा गाव धुक्याची झालर पांघरून घ्यायचा. दिवाळी दारात आलेली असायची आणि मातीचा सुगंध संपून आता घराघरातल्या चुलीवर कढई चढायची. अन वाफाळणाऱ्या कढईतून खमंग सुवास घराघरातील दारातून बाहेर पसरायचा...

...आता माणसासारखीच शेतीही बदलली आहे. सकस बियाणे जाऊन त्या जागी संकरित, सुधारित जातीची, कमी कालावधीत येणारी नवीन बियाणे आलीत. नैसर्गिक खते जाऊन रासायनिक खते आलीत. खतासोबत नवीन तणे आलीत. औषधांच्या मारल्या जाणाऱ्या फवाऱ्यामुळे आता तुडतुडे, भुंगे, टोळ, वाणीकिडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ते आता शेतातून पाहिल्यासारखे उडताना दिसत नाहीत. आधुनिक शेतीच्या नावाखाली आम्ही या नैसर्गिक वैभवाला कायमचं गाडून टाकलंय. आता पूर्वीसारखा म्हातारा,मघा-रोहिणीतला पाऊस खेड्यावरून बरसत नाही. तोही बेभरवशी झालाय. इथल्या माणसासारखाच. आताच्या पावसाने गावाबाहेरून वाहणाऱ्या नद्या फुगत नाहीत. एके काळी ज्यांच्या जिवावर शेती चालायची ती लाकडी अवजारे कधीच सांगाडे बनून गोठ्यात अडगळीत पडलीत.

पूर्वीसारखे बैलही आता घरापुढच्या गोठ्यात दिसत नाहीत. आता त्यांच्या गळ्यातून निघणारा घुंगरांचा मंजुळ स्वर राहिला नाही की चाबकाच्या वादीचा फट फट निघणारा आवाजही उरला नाही. आता खळ्यात मळणी होत नाही की माचव्यावर उभे राहून वाऱ्याच्या दिशेने जुंधळं सोडत डोकं बांधलेल्या बायकाही उरल्या नाहीत. आता गोफणीतून दगड सुटत नाही की पहाटेपासून हाक्यांनी रान दणाणून सोडलं जात नाही. शिवारात सरमाडानं शेकारलेली खोप उरली नाही की आत उन्हाला विसावा घेणारी माणसंही उरली नाहीत. बदल बदल आणि बदलाच्या नावाखाली मातीतून आलेलं सृष्टीचं वैभव आम्ही मातीतच गाडू पाहतोय...

ज्ञानदेव पोळ

[email protected]

Updated : 29 Sep 2017 3:30 AM GMT
Next Story
Share it
Top