Home > मॅक्स किसान > शहरं आवरा शिवारं सावरा

शहरं आवरा शिवारं सावरा

शहरं आवरा शिवारं सावरा
X

भारतीयांनी दहा हजार वर्षे उत्कृष्ट शेती केली. येथील निसर्गाच्या जडणघडणीला धरून शेतकऱ्यांनी अन्नाची सुलभता, विपुलता व विविधता निर्माण केली. ब्रिटिशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकविण्यासाठी तेथील सुवर्णपदक विजेते रासायनिक शेती तज्ञ डॉ. सर अल्बर्ट हॉवर्ड यांना सन १८९५ मधे भारतात पाठवले.

हॉवर्ड हे कोपर्निकस, ब्रुनो व गॅलिलिओ या शास्त्रज्ञांच्या परंपरेतले खरे शास्त्रज्ञ होते. त्यांना भारतीयांच्या शेतीविषयी कुतूहल होते. त्यांनी ठरवले की, प्रथम भारतात फिरून हा कृषिप्रधान देश हजारो वर्षे शेती कशी करतो ते पाहू. ते पाच वर्षे भारतात विविध ठिकाणी फिरून शेती समजून घेत होते. ते त्यांच्या "अॅन अॅग्रिकल्चरल टेस्टामेंट" या ग्रंथात म्हणतात, "भारतीय शेतकरी माझे गुरू आहेत. त्यांच्याकडून मी शिकलो की निसर्ग हा खरा शेतकरी आहे. एकाच खाचरात जमिनीचा कस वाढता ठेवून हजारो वर्षे शेती करणे भारतीयांकडून शिकावे. ते मिश्र व फिरती पिके घेतात. या पध्दतीची जाण आम्हा ब्रिटिशांना १९व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत, सन १८८९ पर्यंत नव्हती."

हॉवर्ड पुढे लिहितात "रसायन हे खत नसून विष आहे, ते पिकांचे अन्न नाही." हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे. आजही तो शेतीविषयक प्रमाणभूत मानला जातो. युरोपियनांची साम्राज्ये ही मूलतः वेगळ्या बैठकीवर आधारीत होती. ती बैठक होती यंत्राची. यंत्रामुळे होणाऱ्या लाखो करोडो वस्तूंच्या उत्पादनामुळे तंत्रज्ञानाची. या अमर्याद वस्तु उत्पादनाला ग्राहक हवा, बाजारपेठ हवी होती. यामुळे व्यापार मुख्य झाला. भारतात राज्य करणारी 'ईस्ट इंडिया' ही कंपनी होती. या व्यापारावर उभारलेल्या साम्राज्याला, बाजारपेठ म्हणजे शहरे निर्माण होणे हवे होते. परंतु त्यांच्यासाठी भारतीय शेती हा मुख्य अडथळा होता. शाश्वत अन्न देऊ शकणारी तिची क्षमता, तिने निर्माण केलेली समाधानावर, साधेपणावर व शहाणपणावर आधारलेली जीवनपध्दती हा अर्थव्यवस्थेसाठी अडथळा होता. शेतकरी स्वावलंबी होता ही औद्योगिकरण व शहरीकरणासाठी समस्या होती. अशा स्थितीत बाजार निर्माण होत नाही. म्हणून मोठ्या पगाराचे आमिष देणाऱ्या नोकऱ्या ब्रिटिशांनी तयार केल्या. शेतकरी व शेती मोडली जाईल अशी धोरणे राबवली. कसेही करून शेती सोडून शहरांकडे स्थलांतर करण्यास शेतीत सामावलेल्यांना भाग पाडले. त्यातून उत्तम व्यापार, मध्यम नोकरी व कनिष्ठ शेती अशी नवी व्यवस्था निर्माण झाली.

डॉ. अल्बर्ट हॉवर्ड यांनी वनस्पती व प्राणी यांच्या कुजण्यातून 'ह्युमस' निर्मितीतून अनेक पिकांबाबत शेती उत्पादनात काही पट वाढ करून दाखवली होती. त्यांचा वरील ग्रंथ सन १९४० मधे प्रथम लंडन मधे प्रकाशित झाला होता. सन १९५६ पर्यंत त्याच्या सात आवृत्त्याही निघाल्या होत्या. त्यांनी यंत्र व रसायनांचा शेतीत प्रवेश करण्यातील धोका दाखवला असूनही स्वतंत्र भारतात स्वामिनाथन सारख्या कुठलीही प्रतिभा नसलेल्या, कंपन्यांच्या शेतीतील हितसंबंधाचा पुरस्कार करणाऱ्या, स्वतः शेती न करणाऱ्या सुमार माणसाच्या नावाचे वलय निर्माण केले गेले. भारतीय शेतकऱ्यांचे व शेतीचे वाटोळे करण्याचे ब्रिटिशांना न जमलेले काम या स्वामीनाथनांनी करून दाखवले. करोडो भारतीयांना विषारी अन्नाद्वारे कॅन्सर, हृदयविकार व इतर व्याधी देऊन यमसदनाला पाठविण्याचे महापाप यांनी केले. 'स्वामिनाथन' हे स्वत: जणू एक औद्योगिक, कृत्रिम उत्पादन आहेत. ही भारतीयांत रुजलेली पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारी एक दांभिक प्रवृत्ती आहे.

युध्दात स्फोटकांच्या निर्मितीसाठी रसायने बनवणाऱ्या कारखान्यांना युध्दानंतर काम नसे व या रसायनांचे करायचे काय? हा प्रश्न होता. ती रसायने शेतीत खत म्हणून आणली गेली. यातून एनकेपी (नायट्रोजन, पोटॅशियम,फॉस्फरस) खतांचा भडीमार झाला. हे औद्योगिकरणासाठी शेतीला वापरणे होते. रासायनिक खतांना गंधकाम्लाचा (सल्फ्युरिक अॅसिड) पाया असतो. त्यामुळे जमिनीतील जिवाणू, गांडुळे मृत झाली. रासायनिक खतांच्या वापरास मूळ पिके प्रतिसाद देईना. ती खाली पडू लागली. म्हणूनपृथ्वीवरील जैविक विविधतेचा भाग म्हणून अस्तित्वात असलेल्या, परंतु काड व पानांचा अभाव म्हणून वापरात नसलेल्या, मेक्सिकोतील गहू व थायलंडमधील तांदळाच्या मूळ बुटक्या वाणांचा संकर करून गहू व तांदळाच्या नव्या खुज्या जाती आणल्या.

यामुळे बियाणांची स्वयंपूर्णता नष्ट झाली. शेतकरी पूर्वी बियाणे विकत नव्हता ते फक्त दिले घेतले जात होते. बियाण्यांना व एकूणच शेतीला पावित्र्य होते.हरित क्रांती नामक फसव्या शेतीमुळे शेती संस्कृती मोडली. औद्योगीकरणामुळे सगळ्याचेच वस्तूकरण झाले. खरा शेतकरी मेला. तथाकथित हरितक्रांतीने हजारो वर्षे नसलेला घटक म्हणजे उत्पादन खर्चाला जन्म दिला.निसर्गत: मोफतउपलब्ध पाऊस, बियाणे, गोमूत्र, शेणखत; गुरांसाठी चरणात सहज सोय; शेतांभोवतीच्या जंगलातून मध, फळे, कंदमुळे; उन्हाळ्यात भोपळा, कलिंगडतरपावसाळ्यात खेकडे वगैरेची लयलूट; वाहते झरे, नद्या, तुडुंबविहिरी, शुध्द हवाअसे गणित कालबाह्य ठरून शहरीकरणाची दिशा लाभली… सुबत्तेला ‘विकासा’ची दृष्ट लागली.

या नव्या संकरित जाती व रासायनिक खतांमुळे तात्कालिक वाढलेल्या उत्पादनाचे गाजर शेतकऱ्यांना दाखवले गेले. परंतु याचे दुष्परिणाम नंतर समजणार होते.५० वर्षांपूर्वी याचे व्यसन लावण्यासाठी बियाणे व खते फुकट दिली गेली.

गांधीजी म्हणत की, "भारतातील प्रत्येक शेत ही एक प्रयोगशाळा आहे व प्रत्येक शेतकरी हा शास्त्रज्ञ." जंगलाला कुणी खत देत नाही. पाणी देत नाही. नांगरणी करत नाही. तरीही जंगल करोडो वर्षे आहे. आजही जंगलाकडून बोध घेतला तर आपत्तीतून सुटका होऊ शकते. लोकांनी पैशामागे धावणे थांबवले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जातील. पैशामागे धावणारा समाज असलेली शहरे ही चूक आहे हे समजून घेतले पाहिजे. विदर्भासारख्या फक्त ४०० ते ६०० मि.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रातही घनदाट जंगल होते. ही जंगलाची क्षमता गळणाऱ्या पानांच्या, वनस्पतींच्या व प्राणी- पक्ष्यांच्या अवशेषांच्या व उत्सर्जनाच्या जमिनीवर सतत निर्माण होणाऱ्या थरामुळे, आच्छादनामुळे आहे. त्याचे विघटन करून पचवणाऱ्या जिवाणू व गांडुळांमुळे आहे. त्यांनी झाडांना पुरवलेल्या पोषक द्रव्यांमुळे आहे. जमीन सच्छिद्र केल्यामुळे पाणी व हवा खेळल्यामुळे, निचरा करण्यामुळे आहे.

संकरित बियाणामधे किडीला तोंड देण्याची क्षमता नव्हती. शिवाय तणे जास्त उंच ठरू लागली. मग कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके बनवणाऱ्या कंपन्या वाढीस लागल्या. तण, कीटक, बुरशीने रसायनांना तोंड देण्याची क्षमता वाढवली की, अधिकाधिक विषारी रसायने शेतात ओतण्यात आली. एक दुष्टचक्र सुरू झाले.रासायनिक खतांना तिप्पट-चौपटपाण्याचीगरज; ती भागवण्यासाठी धरणे व सिंचन; बोअरवेलने भूजलाचा उपसा; रसायनांमुळे सर्वच कीटक नष्ट; त्यांचे भक्षण करून पक्षी नष्ट... असे ते चक्र! रसायनांमुळे जमिनीतील सच्छिद्रता संपल्याने ती टणक झाली. मग ट्रॅक्टर वापरले जाऊ लागले. गाई - गुरे निरूपयोगी ठरू लागली. त्यांच्या शेणाची,खताची व नांगरणीची गरज संपली असे मानले गेले. बुटक्या वाणांमुळे काड, पाने कमी झाली. त्याचा चारा, जमिनीत खत होणे, जळण म्हणून उपयोग होणे थांबले! हा सारासार विचार-व्यवहार आता पुनश्च सुरू व्हायला हवा.

जंगलांची क्षमता सर्वात वरच्या पालापाचोळा व अवशेषांच्या कुजत असलेल्या मातीच्या थराने बाष्पीभवन थांबवण्यामधे आहे. निसर्गाचे चक्राकार संतुलन राखण्यात आहे. जैविक नियंत्रणात आहे. स्वतःचे थंड वातावरण निर्माण करण्यात आहे. अधिक गुंतागुंतीच्या तरीही सुनियोजित विलक्षण अद्भूत कार्यपध्दतीमधे आहे. त्याचे आकलन अबोध सजीवांना व आदीम जमातींना आहे. म्हणून वादळे, पाऊस, भूकंप, सुनामी इत्यादींचा मागोवा त्यांना आधी लागतो. परंतु स्वतःला बुध्दिवान म्हणवणाऱ्या शिक्षित मानवाला याचे ज्ञान नाही. माणसाने या आधुनिक बनण्याच्या चुकीच्या प्रक्रियेत अनेक नैसर्गिक क्षमता गमावल्या आहेत.

आपण फक्त दहा ते बारा हजार वर्षापूर्वी जंगल सोडले आणि अगदीच थोड्या म्हणजे सुमारे ५० ते २५० वर्षांत जंगल आपणास जगवते हे भानही सोडले. भारतात फक्त १०० वर्षांपूर्वी भाताच्या २ लाख जाती होत्या. अनेक प्रांतांत तर खाचरागणिक वेगळी जात होती. पूर्वी अन्न उत्पादन हा हेतू होता. आता पैशांचे उत्पन्न हा हेतू बनला. असा शहरी समाज वाढवला जात आहे. कृत्रिमरीत्या उद्योगातून बनलेल्या असंख्य वस्तू चलनाद्वारे मिळविण्याच्या मागे लागणे ही आधुनिक जीवनशैली. हा वस्तुनिर्वाह आहे. मात्र यांना जगवणारा मूलभूत गरज असलेले अन्न पिकवणारे शेतकरी मात्र यांच्या एखाद्या महिन्याच्या पगारापेक्षाही कमी रकमेचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या करू लागले. अशी विषम बेगडी व्यवस्था बदलण्याचा तो प्रयत्न करत नाही. समाजदेखील ही खोटी, अन्यायकारक, अशाश्वत व्यवस्था बंद करू असे म्हणत नाही. कर्जमाफी, खत, वीज, पाणी, बियाणे घरे इ. फुकट किंवा सवलतीच्या दरात मिळविण्यासाठी मागण्या होत आहेत. मरत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तर हवीच, परंतु खते, वीज, पाणी, बियाणी कशाला? यामुळे तो पुन्हा औद्योगिकरणाने निर्माण केलेल्या सापळ्यात अडकतो. यापूर्वी हजारो वर्षांत त्याने अशा मागण्या त्या काळातील सत्ताधारी राजांकडे केल्या नव्हत्या. तो स्वावलंबी, स्वतंत्र होता. तोच राजा होता. त्याच्या गावांच्या स्वयंपूर्णतेमुळे भारतात स्वराज्य होतेच.

अॅड गिरीश राऊत

निमंत्रक : भारतीय पर्यावरण चळवळ/ वसुंधरा आंदोलन

दू . क्र. ९८६९ ०२३ १२७

०२ २ ४३७ ८९

Updated : 26 Sep 2017 12:21 PM GMT
Next Story
Share it
Top