Home > मॅक्स किसान > वीर 'लाल्या' अमर रहे 

वीर 'लाल्या' अमर रहे 

वीर लाल्या अमर रहे 
X

लाल्यानं गोठा अमीर केला

रंगानं लाल म्हणून लाल्या

गोकुळी गाईचा शेवटचा खोंड

बाप कोण माहिती नाही

लाल्या वासरू एकदम शांत

दिसायला फार गोंडस नाही

खुंट्यावरुन सोडताना घाई नाही

उड्या मारत पळणं नाही

गोकुळी रानातून आली की डोळ्यात चमकायचं एक समजूतदार समाधान

दुस-याच वर्षी लाल्या नांगराला जुपला अन लाल्यानं तास धरली ती कधीच सोडली नाही, लाल्या पेठला

लाल्याचं शरीर जेमतेम पण कामाला चिवट अन शिंगं कानाखाली रुतलेली

बापानं लाल्या चेमटला पण लाल्याला ताकदीचा माज नव्हता,तारुण्याची मस्ती नव्हती

कोणत्याही गाईकडे त्यानं वाकड्या नजरेनं पाहिलं नाही

फार तर पाठीमागून हुंगायचा, तोंड वासून आभाळाकडं पहायचा नि आल्या वाटेनं निघून जायचा

लाल्या स्वत: होवून डरकायचा नाही

विनाकारण झुंजायचा नाही

एखादा मुजोर बैल त्याच्याकडं पाहून खुरानं माती उधळायचा, शिंगं मातीत रुतवून डरकायचा,अंगं ताणायचा,पण लाल्या त्याच्याकडं साफ दुर्लक्ष करायचा

त्याच्या समोरुन सावकाश निघून जायचा

तो बैल मात्र चितागती पडायचा

अन शरमेनं कान पाडून पाठमोर्या लाल्याकडे पहात रहायचा

लाल्या म्हणजे जिगरबाज बैल

त्यानं पडित माळरानं वहित केली

बरडाची वांझ मातीही हिरवी केली

त्या काळात घरात कठणाला उत यायचा

लाल्या कणग्यांचं वैभव वाढवायचा

गुडाची गाडी कुठं चढाला अडली की कुणीही यायचं दावणीचा लाल्या हक्काने घेउन जायचा

लाल्या सगळी ताकद एकवटायचा

गुढघे टेकून गाडी चढवायचा

त्याच्या बाजूचं चाक मारायचीही गरज नसायची

काम फत्ते झालं की, लाल्या पातळ पातळ हगायचा

गोकुळी मेल्यावर तो रात्रभर

डोळ्यातून टीपं गाळत राहिला

चा-याला तोंडही लावलं नाही

लाल्या आयुष्यभर इमानानं राबला

म्हतारा झाला तरी खांद्यावरची जू कधी ढळू दिली नाही अन लाल्या मेलाही पेरणीच्या दिवसात खांद्यावर जू घेवूनच

मेल्यानंतरही आठ दिवस गावठाणातल्या बेवारस कुत्र्यांचं पोट जगवलं

लाल्यानं माती कसली,जगवली,पिकवली मातीची सेवा करता करता त्याला वीरमरण आलं

आज कुठल्याही दप्तरात त्याच्या पराक्रमाची नोंद नाही

मात्र लाल्याची आठवण अजूनही मातीनं जिवंत ठेवली आहे

ही माती अजूनही विजांच्या लखलखाटात, ढंगांच्या गडगडाटाबरोबर गर्जत असते

वीर लाल्या अमर रहे

वीर लाल्या अमर रहे

-सुदाम राठोड

Updated : 21 Aug 2017 7:28 AM GMT
Next Story
Share it
Top