Home > मॅक्स किसान > रेशीम शेती – समृध्दीची नवी संधी

रेशीम शेती – समृध्दीची नवी संधी

रेशीम शेती – समृध्दीची नवी संधी
X

तुतीची लागवड करुन रेशीम किडे पालनाद्वारे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या रेशीम शेतीमुळे चांगलंच चलन मिळवून देत आहे. कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. मोताळा तालुक्यातील प्रमोद पाटील यांनी गेल्यावर्षी रेशीम शेती व्यवसायाला सुरुवात केली आणि वर्षभरातच त्यांना चक्क १० लाखांचा नफा झालाय.

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील अंतर्गत येणार तपोवन हे गाव अत्यंत दुर्लक्षित गाव असून येथे पोहोचण्यासाठी धड रस्ता सुद्धा नाही. परंतु अशा गावखेड्यातही रेशीम शेतीचा धाडसी निर्णय प्रमोद पाटील यांनी घेतला. मुलीच्या लग्नात ४ पैठण्या जवळपास १.५० लाख रुपयांना विकत घेताना प्रमोद पाटील यांच्या मनात अचानक हा विचार आला. आपण चांगल्या प्रकारे रेशीमची शेती करू शकतो असा त्यांना मनोमन विश्वास वाटत होता. याच विश्वासातून त्यांनी कोणत्याही शासकीय योजनेची वाट न पाहता रेशीम उद्योग सुरु केला आहे. जून २०१६ पासून सुरु केलेल्या या रेशीम शेतीला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

रेशीम शेतीसाठी शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येण्यासारखा व्यवसाय आहे. तुतीच्या झाडावर रेशमाच्या किड्यांची पैदास होत असते. निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत तुतीची लागवड करता येते़. तुतीला लागणारे पाणी ऊसाला लागणाऱ्या पाण्याच्या तीनपट कमी असते. म्हणजेच एक एकर ऊसाला लागणाऱ्या पाण्यात तीन एकर तुतीची शेती होते. तुतीच्या झाडाचं वैशिष्ट म्हणजे एकदा लागवड केल्यावर ती किमान १५ वर्षांचं जिवीत राहते. त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो. एप्रिल-मे च्या कोरड्या वातावरणातही तुतीला पाणी मिळाले नाही तरी तुती तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा खूप मोठा फायदेशीर व्यवसाय ठरत आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनाही हा व्यवसाय करता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेषतः दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना रेशीम शेती व्यवसाय हा चांगला पर्याय ठरतोय. त्याशिवाय आपल्याकडे सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रत्येकाला या व्यवसायाचा विचार प्रामुख्याने करता येईल. आणि यातून गावखेड्यातूनही समृध्दीची एक नवी संधी उपलब्ध झालेली आहे.

Updated : 12 Nov 2017 11:04 AM GMT
Next Story
Share it
Top